...सनदशीर 'क्रांतिकारक'! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 21, 2020

...सनदशीर 'क्रांतिकारक'! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख!

 ...सनदशीर 'क्रांतिकारक'!


भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी क्रांतीमार्गाने, काहींनी सत्याग्रहासाख्या सनदशीर पद्धतीने तर काहींनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून सबळ लढा दिला. त्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळेच ब्रिटिशांना देश सोडावा लागला. गेल्या शतकाच्या सुरुवातीसच, १९०७ मध्ये जर्मनीत स्टुटगार्ड येथे 'स्वतंत्र' भारताचा ध्वज फडकवून भारतीय स्वातंत्र्याची घोषणा मादाम भिकाईजी कामा यांनी आजच्या दिवशी केली. ही खरे तर 'क्रांती'च होती.


फ़्रेंच नागरिकत्व असूनही भारतीय स्वातंत्र्याची आस बाळगणाऱ्या व त्यासाठी लंडन व युरोपात अन्यत्र राहणाऱ्या व क्रांतिकार्यास सक्रिय मदत करणाऱ्या  या वीरांगनेस मानाचा मुजरा.


मुंबईत सधन पटेल कुटुंबात जन्मलेल्या भिकाईजी इंग्रजीतच शिकल्या. रुस्तुम कामा या उद्योगपतीशी त्यांचा विवाह झाला.


मुंबईत प्लेगची साथ आली तेव्हा त्यांनाही प्लेगची लागण झाली. उपचारासाठी त्यांना विलायतेला पाठवण्यात आले. तिथे त्या दादाभाई नवरोजी यांच्या सचिव बनल्या.  पुढे त्या पॅरिसला स्थायिक झाल्या.


लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये राहणाऱ्या तरुण क्रातिकारकांशी त्यांचा संपर्क आला.  त्यांना ब्रिटिश शासनाबद्दलची माहिती कामा वेळोवेळी देत असत. 


कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले त्यांनी विशेषत: देशभक्तिपर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे '१८५७ चा स्वांतत्र्य लढा' हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी मदत केली. 


स्वांतत्र्य मिळविण्यासाठी झटणाऱ्या क्रांतिकारांना आर्थिक तसेच अनेक प्रकारची मदत त्या करत.


१९०७ साली जर्मनीतल्या स्टुटगार्ड येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मादाम कामांनी साडी नेसून व हातात  भारतीय ध्वज घेऊन लोकांना भारताबद्दल माहिती दिली. हा ध्वज त्यांनी त्यांच्या कल्पनेनेच बनवला होता.


तिथे कुणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी भारताचा पहिला ध्वज फडकविला. त्यात हिरवा, पिवळ्या व लाल रांगाचे पट्टे होते. तसेच ८ कमळाची फुले तत्कालीन भारताच्या ८ राज्यांचे प्रतीक होते. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये  ध्वजाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर सूर्य आणि चंद्र हे हिंद्-मुस्लिम विश्वासाचे प्रतीक होते. 


हा ध्वज आजही पुण्यातील केसरी-मराठा संस्थेच्या संग्रहालयात उपलब्ध आहे.


भारत हा देश ब्रिटिश सत्तेचा अंकित असताना युनियन जॅक नाकारून स्वतंत्र ध्वज फडकवण्यात हा खरे तर ब्रिटिशांच्या दृष्टीने 'द्रोह' होता. पण मादाम कामांनी ही जोखीम हसतमुखाने पत्करली. त्या दृष्टीने त्या सनदशीर 'क्रांतिकारक'च होत्या.


डॉ.भारतकुमार राऊत

No comments:

Post a Comment