आदिवासी वाड्यांचे शुक्लकाष्ठ संपेना रस्त्या अभावी आजारी लोकांसाठी करावा लागतोय डोलीचा वापर .. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 24, 2020

आदिवासी वाड्यांचे शुक्लकाष्ठ संपेना रस्त्या अभावी आजारी लोकांसाठी करावा लागतोय डोलीचा वापर ..

 आदिवासी वाड्यांचे शुक्लकाष्ठ संपेना 

रस्त्या अभावी आजारी लोकांसाठी करावा लागतोय डोलीचा वापर ..


 नरेश कोळंबे

महाराष्ट्र मिरर टीम कर्जत 

              

                   स्पेशल स्टोरी


  

  भिवपुरी माथेरान या डोंगरांमध्ये राहणारा आदिवासी समाज आजही उपेक्षित आहे. त्यांच्यापर्यंत  पुरेशी जीवनावश्यक साधने आजही पोचली नाहीयेत. त्यामुळे स्वातंत्र्याच्या 74 वर्षांनंतर ही त्यांच्या पदरी उपेक्षाच पडली  आहे. रस्ता नसल्याने त्यांना आजारी असणाऱ्या एखाद्या इसमाला अथवा गरोदर महिलेला दवाखान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक दिव्य पार करावे लागत आहेत. सागाची वाडी येथील तरुण पायाला दुखापत झाल्याने घरीच पडून होता , रस्ता नसल्याने कोणत्याही प्रकारे दवाखान्यात पोहोचणे शक्य होत नव्हते. तेव्हा गावातील  तरुणांनी डोली करून त्याला पावसापासून संरक्षण करत डोंगर उतरून दवाखान्यापर्यंत पोहोचविले.

   कर्जत तालुका हा आदिवासीबहुल तालुका मानला जातो. या तालुक्यात कातकरी, ठाकूर, महादेव कोळी, धनगर अशा विविध जमाती डोंगर कोपऱ्यात राहत आहेत. परंतु या लोकांपर्यंत साधी प्राथमिक सुविधादेखील नसल्याने या लोकांना अतोनात कष्ट होत आहेत. सागाची वाडी , नानाचा माळ,  चिंचवाडी, असलवाडी, पाली धनगरवाडी, बोरीची वाडी, धमन दांड  वाडी, भूतिवली वाडी, नानाचा माळ धनगरवाडा, या अस्सल ग्रामपंचायत मधील वाड्यांना आजतागायत पक्का रस्ता  न पोचल्याने त्यांना आजारपणात दवाखान्यात जायचे असेल तर मोठे दिव्य पार करावे लागत आहे.  या  वाडी मधून डोंगरावर पक्के रस्ते नसल्याने नेरळ किंवा कर्जतमधील दवाखान्यात  पोहोचण्यासाठी कच्च्या रस्त्यांचा वापर करावा लागत आहे. रस्ते नसल्याने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वाहनांना जाणे शक्य होत नाही. सागाची वाडी येथील त संदीप निरगुडे हा 25 वर्षीय तरुण पायाला दुखापत झाल्या कारणाने घरीच पडून होता. पावसाअभावी त्याला घरातून निघून हॉस्पिटलला जाणे शक्य होत नव्हते. पाऊस संपल्यानंतर तिसऱ्या दिवशी अक्षरशः गावातील तरुणांनी एकत्र येत त्यांना झोळी करत डोलीच्या सहाय्याने  दोन नद्या अनवाणी पायाने पार करत, नेरळ येथील सुविधा हॉस्पिटल पर्यंत  पोहोचविले. रस्ते नाहीत व नद्यांना साकव अथवा  पूल नाहीत म्हणून हे रस्ते अधिक कष्टाचे झाले आहेत. कोणतेही वाहन पावसाळ्यामध्ये या वाडीत पर्यंत पोचू शकत  नसल्याने आजारी लोकांना अक्षरशः झोळी मध्ये टाकून डोंगर उतरावा लागतो आहे. 


या लोकांचे प्रश्न कधी सुटतील? असा तीव्र सवाल या लोकांतून  विचारला जात आहे. एखाद्या पुरुषाला आजारपणात वा स्त्रीला गरोदरपणात दवाखान्यात उपचार करण्यासाठी घेऊन जाणे , हे खूप कष्टाचे काम होत असून एखाद्या माणसाचा ह्यात जीव गेल्यास ह्या गोष्टीला प्रशासन ज्याने आजतागायत वैद्यकीय सेवा दिली नाही व रस्ते बनवले नाहीत,म्हणून  जबाबदार राहील का ? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जातो आहे. तसेच स्थानिक नेते व पुढारी लोक लक्ष देत नसल्याचा ठपका ग्रामस्थांकडून ठेवण्यात येत आहे .No comments:

Post a Comment