Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

नेताजी: का गेले?.. कुठे गेले..?डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख!

 नेताजी: का गेले?.. कुठे गेले..?


नेताजी सुभाष चंद्र बोस...! पारतंत्र्याच्या जोखडात अडकलेल्या स्वातंत्र्यदेवतेने पाहिलेले एक आश्वासक स्वप्न! हे स्वप्न का व कसे भंगले,   हे कुणाला कधी कळले नाही. 

आझाद हिंद सेनेचे प्रमुख व धडाडीचे क्रांतिकारक राष्ट्रभक्त नेताजी आकस्मिकपणे व गूढरित्या नाहिसे झाले, त्या घटनेला आज ७५ वर्षे झाली. 


नेताजी गुप्तपणे रशियाकडे जात असताना त्यांच्या विमानाला अपघात होऊन नेताजींचे निधन झाले, असे वारंवार सांगितले जात असले, तरी १९४५नंतर नेताजी बराच काळ हयात होते, असे मानणारे व तसे पुरावे देणारे अनेक आहेत.


नेताजी नंतर रशियात होते व भारत-पाकिस्तान ताष्कंद कराराच्या वेळी ते तिथे उपस्थित होते. ते भारतातही वेष व नाव बदलून राहात होते, असेही म्हटले जाते.


जी माहिती सरकारी दस्तावेजांमध्ये उपलब्ध आहे, त्यानुसार दुसर्‍या महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले. 

१८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. त्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.


जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने २३ ॲागस्ट १९४५ रोजी जगाला कळवले की, १८ ऑगस्ट रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.


असे सांगितले गेले की, अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाषचंद्रांसह त्यांचे सहकारी कर्नल हबिबूर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्‍नांची शर्थ केली, परंतु त्यांना यश आले नाही. मग नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या.


स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ आणि १९७७ मध्ये दोन वेळा वेगवेगळ्या आयोगाची नियुक्ती केली. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृत्यू ओढवला होता. मात्र या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्‍न केला नव्हता.


मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली १९९९ मध्ये तिसरा चौकशी आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. 


आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु  तेव्हाच्या मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.


१८ ऑगस्ट १९४५ च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे.


सुभाषचंद्र बोसांशी संबंधित शेकडो फायली भारत सरकारकडे होत्या.२०१५ च्या अखेरीस त्यातील बर्‍याच फायली सरकारने लोकांना बघण्यासाठी खुल्या केल्या आहेत. 


या फायलींचा संशोधकांनी अभ्यास केल्यानंतरच भारताच्या या सुपुत्राच्या कथित मृत्यूचे गूढ उलघडले जाण्याची आशा आहे.


डॉ.भारतकुमार राऊत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies