येरवडा ते शिक्रापूर रस्ता होणार सहा पदरी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 28, 2020

येरवडा ते शिक्रापूर रस्ता होणार सहा पदरी

येरवडा ते शिक्रापूर रस्ता होणार सहा पदरी..

नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी सुटणार
प्रस्ताव पाठविण्याचे उपमुख्यमंत्र्याचे आदेश
तरोनिश मेहता -महाराष्ट्र मिरर टीम पुणे

नगर रस्त्यांवरील वाहतुक कोंडीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी येरवडा ते शिक्रापुर हा मार्ग सहा पदरी  करण्यासंबधीचा प्रस्ताव सादर करावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी) अधिकार्‍यांना शुक्रवारी दिले. याबाबत पवार यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही निधीबाबत चर्चा केली असून गडकरी यांनी यासंबधीचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे.
       नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. त्यामधील महापालिकेच्या हद्दीतील येरवडा ते खराडी पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो. नगर रस्ता हा राज्य मार्ग असल्याने राज्य शासनाने पिंपरी चिंचवड शहरातून जाणार्‍या सिग्नल फ्री जुन्या पुणे-मुंबई रस्त्याच्या धर्तीवर हा रस्ता विकसीत करण्यात यावा आणि त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांच्याकडे केली होती. त्यावर पवार यांनी शुक्रवारी यासंदर्भात पीडब्लूडी आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकिला आमदार टिंगरे यांच्यासह महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पीडब्लूडीचे मुख्य कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकित नगररस्त्यावरील वाहतुक कोंडीसंदर्भात चर्चा झाली. त्यात पवार यांनी येरवडा ते शिक्रापुर हा रस्ता सहा पदरी करण्याबरोबर कोणत्या ठिकाणी उड्डाणपुल आणि ग्रेड सेपरेटर करायचे यासंबधीचा आराखडा करावा अशी सुचना केली. त्यासाठी जवळपास 3 हजार कोटींचा खर्च येईल असा अंदाज पीडब्लूडीच्या अधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात आला. त्यावर पवार यांनी या रस्त्यासाठी केंद्राकडूनही निधीची मदत घेता येईल असे स्पष्ट केले. त्यावर त्यांनी तात्काळ केंद्रिय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला. तसेच पुणे-नगर रस्त्यांवरील येरवडा ते शिक्रापुरपर्यंत सहा पदरी रस्त्यासाठी केंद्रानेही निधी उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती केली. त्यावर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यासंबधीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा असे सांगितले असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.
       त्याचबरोबर आळंदी रस्ता हा पालखी महामार्ग असल्याने विश्रांतवाडी येथील मुख्य चौकात उड्डाणपुल आणि ग्रेडसेपरेटरसाठीही केंद्राच्या माध्यमातून निधी उभारण्याच्या सुचना पवार यांनी केल्या असल्याचे टिंगरे यांनी स्पष्ट केले.
-----------------------------
शहरातील सर्वांत वाहतुक कोंडी नगर रस्त्यांवर असल्याचे एका सर्व्हेतून समोर आले आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर सिग्नल फ्रि नगररस्ता करावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती केली होती. त्यानी तात्काळ कार्यवाही केल्याने लवकरच हा प्रश्न सुटेल.
                                 सुनिल टिंगरे, आमदार वडगाव शेरी.

----------------------------------

No comments:

Post a Comment