'...गर्जा महाराष्ट्र माझा!' डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, September 3, 2020

'...गर्जा महाराष्ट्र माझा!' डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख

 '...गर्जा महाराष्ट्र माझा!'


महाराष्ट्र राज्याची १ मे १९६० रोजी स्थापना झाली आणि शाहीर साबळेंची थाप डफावर कडाडली. राजा बढेंच्या शब्दांना तितकेच दमदार सूर गवसले :जय जय महाराष्ट्र माझा

गर्जा महाराष्ट्र माझा


या अभिमानगीताने अवघ्या महाराष्ट्राचे मन उचंबळून आले व गर्वाने छाती फुलली. आज ६० वर्षांनंतरही हे जणु महाराष्ट्राचा अविभाज्य घटक असे गीत बनले आहे.


अशा अनेक गीतांनी महाराष्ट्राचा वारसा व लोककला पुनरूज्जीवीत करणाऱ्या शाहीर साबळेंचा आज जन्मदिन. ते हयात असते तर आज आपण त्यांचा ९७ वा वाढदिवस साजरा केला असता पण २०१५ साली २० मार्च रोजी त्यांचे निधन झाले व महाराष्ट्राने आपला रांगडा गावरान आवाज कायमचा गमावला.मुक्तनाट्य हा लोककलेतील अभिनव आविष्कार निर्माण करणाऱ्या शाहीर साबळेना सुरांबरोबरच शब्दकळाही अवगत होती. त्यातूनच 'यमराज्यात एक रात्र', 'आंधळं दळतंय' या सारखी मुक्तनाट्ये आणि 'जीवाची सखी माझी पाटी ही मुकी...', 'अरे कृष्णा अरे कान्हा' ही विलक्षण गीते जन्माला आली.


शाहीरांनी 'महाराष्ट्राची लोकधारा' हा अफलातून संगीतमय कार्यक्रम रंगभूमीवर आणला. महाराष्ट्राच्या विस्मृतीत जात चाललेल्या लोकगीतांचे व लोकनृत्यांचे त्यामुळेच पुनरुज्जीवन झाले आणि कोळीगीते, पोवाडे, धनगरगीते यांनी शहरी जीवनात स्थान मिळाले.


सातारा जिल्ह्यात पसरणीला जन्मलेल्या कृष्णराव साबळेंच्या आयुष्याचा प्रवासही पसरणीच्या घाटासारखा नागमोडी अरुंद वाटेने झाला. अर्धवट शिक्षण व घरची हालाखी यामुळे कृष्णरावांना पडेल ती कामे करावी लागली. मुंबईच्या गिरणीत ते कामगार झाले. पण हे करताना त्यांनी आपले गाणे व लेखन जपले.


त्यांना अंमळनेरला साने गुरूजींचा सहवास लाभला. त्यांच्या शिकवणुकीचा खोल परिणाम त्यांच्या विचारांवर होत गेला. १९४२च्या 'चले जाव' आंदोलनात व नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते उतरले.महाराष्ट्राची स्थापना झाली, तेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरून राजा बढेंनी 'महाराष्ट्रगीत' रचले व श्रीनिवास खळे यांनी त्याची चाल बांधून ते रातोरात शाहीरांकडून गाऊनही घेतले. तेच गीत अजरामर झाले.


शाहीरांनी आयुष्यात जशा खस्ता खाल्ल्या, तसेच त्यांना सन्मानही नंतरच्या आयुष्यात लाभले. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्षपद मिळवणारे ते एकमेव शाहीर ठरले. त्यांना 'पद्मश्री' व नंतर 'महाराष्ट्र भूषण' सन्मानही मिळाले. संगीत नाटक अकादमीनेही त्यांचा गौरव केला.


शाहीर व त्यांच्या कुटुंबियांसमवेत गप्पा मारण्याचा अनेकदा योग मला आला. शाहीरांचे क्रमिक शिक्षण तुटपुंजे असले तरी ते केवळ कलावंत नव्हते. त्यांचा भारताच्या विविध प्रांतातील लोककलांचा दांडगा अभ्यास होता.


पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांना खुले व्हावे, म्हणून साने गुरुजींनी आंदोलन छेडले. त्याचा प्रसार करण्यासाठी शाहीरांनी महाराष्ट्र पिंजून काढला. गुरुजींच्या उपोषणानंतर अखेर मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळाला.११ जून १९५० रोजी गुरुजींनी मृत्यूला कवटाळले. ही बातमी ऐकून शाहीर सुन्न झाले. गुरुजींचे नाव पांडुरंग. त्यांनी पांडुरंगाच्या मंदिरात केलेले आंदोलन शाहीर व त्यांच्या पत्नी भानुमती यांना आठवले. भानुमती साबळे कवयित्री होत्या. त्यांना तेव्हाच ओळी सुचल्या. शाहीरांनी त्या सुरांत गुंफून चिरंतन केल्या.


पावन झाली चंद्रभागा
कृतार्थ पांडुरंग
झाला कृतार्थ पांडुरंग।।
हरिजन भेटी हरी रंगला
पंढरी झाली दंग... 
झाला कृतार्थ पांडुरंग।।
मृदंग नव्हता नव्हत्या चिपळ्या
नव्हते आर्त अभंग
झाला कृतार्थ पांडुरंग ।।
महाराष्ट्राची संत मालिका
ओवुनि घेई एक मणी
परंपरा ती ज्ञानेशांची
आली पुन्हा उधळुनी
मनामनातून एक दयाळू
प्रकटे श्रीरंग... 
झाला कृतार्थ पांडुरंग।।


डॉ.भारतकुमार राऊत

No comments:

Post a Comment