मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, September 10, 2020

मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

 मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

        कर्जत येथे शेतकऱ्यांची बैठक संपन्न


ज्ञानेश्वर बागडे

महाराष्ट्र मिरर टीम -कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातर्फे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  यांच्या महत्वाकांक्षी ' विकेल ते पिकेल ' अभियानांतर्गत ' मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट)', ' ग्राम पातळीवर ग्राम कृषी विकास समिती स्थापना',  व ' पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना ', या तीन महत्वाच्या प्रकल्पांच्या ऑनलाइन उदघाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वदप  येथील प्रगतशील शेतकरी श्री कैलास दळवी  यांच्या शेतावर आयोजित केलेल्या कार्यक्रमास  कर्जत व खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत स्वागत केल्याने एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची नोंद झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असून बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.       मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, कृषिमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदीपन राव भुमरे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम व फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे इत्यादी मान्यवर ऑनलाइन शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्कंठा होती.महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन राज्यपातळीवर केले होते.डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या विस्तार शिक्षण संचालक कार्यालयाकडून सदर कार्यक्रम शेतकऱ्याच्या बांधावर आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्याने वदप येथील प्रगतशील शेतकरी कैलास दळवी यांच्या शेतावर २०० मीटर अंतरावरून इलेक्ट्रिक जोडणी घेऊन  लॅपटॉप, वायफाय, इन्व्हर्टर इत्यादींची सोय करीत सामूहिकरीत्या शेतकऱ्यांना सहभागी करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

      ऑनलाईन मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी बाजारपेठेचा कल ओळखून मूल्यसाखळी निर्माण करतानाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी ' विकेल ते पिकेल ' अभियान उपयुक्त ठरेल, अशी ग्वाही दिली.शेतकऱ्यांच्या मजबूत संघटनेची गरज प्रतिपादित करीत गटशेतीच्या माध्यमातून बाजारपेठ असलेला मालच शेतकऱ्यांनी उत्पादित करावा, असे आवाहन त्यांनी केले.शेतकरी हाच देव असल्याचे स्पष्ट करीत विविध योजनांद्वारे त्यांना बळकटी मिळवून देण्याचे प्रयत्न शासन करीत असून ज्यांच्या नावाने योजना कार्यान्वित होत आहे त्यांच्या नावाला साजेसे कार्य शेतकऱ्यांनी करून राज्याला नावलौकिक मिळवून द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.       दादाजी भुसे यांनी केलेल्या कार्याचा नेटक्या शब्दात आढावा घेतला.उपस्थित मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाने कृषिला ' अच्छे दिन ' येतील,अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या.

       या कार्यक्रमाचे नियोजन सहयोगी संशोधन संचालक डॉ रमेश कुणकेरकर व विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ रवींद्र मर्दाने यांनी केले.प्रगतशील शेतकरी निलिकेश दळवी, नयनिश दळवी व कैलास दळवी यांनी सर्व सुविधा बांधावर उपलब्ध करून देण्यासाठी अथक परिश्रम घेत सहभाग नोंदविला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत या कार्यक्रमात सर्वश्री अण्णा पवार, भरत देशमुख, यशवंत गायकवाड, दत्तात्रय देशमुख,अशोक ताम्हाणे, अनंत बासरे,प्रमोद पिंगळे, रवींद्र देशमुख, प्रवीण देशमुख,विलास पालकर,सुनील भागवत, जगदीश पवार,आप्पा गायकवाड,मच्छीन्द्र पारठे यांच्यासह खालापूर तालुक्याच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष गजानन दळवी प्रामुख्याने उपस्थित होते.

      उपस्थित शेतकऱ्यांचे आभार डॉ रवींद्र मर्दाने यांनी मानले.

No comments:

Post a Comment