Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

ना ढोल ताश्याचा गजर, ना वाजत - गाजत मिरवणूक

 ना ढोल ताश्याचा गजर, ना वाजत - गाजत मिरवणूक...


कोरोनाच्या सावटाखाली वरोराकरांचा बाप्पाला साधेपणाने निरोप


                    राजेंद्र मर्दाने-वरोरा चंद्रपूर



  शहरात दरवर्षी अनंत चतुर्दशीला ढोल -  ताश्याच्या गजरात, वाजत-गाजत जल्लोषात गणरायाला निरोप दिला जातो.  मात्र कोरोनामुळे यंदा  लाडक्या बाप्पांना साधेपणाने भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत पहायला मिळणारी गर्दी आणि भक्ताचा उत्साह, वाद्यांचा दणदणाट यावर्षी पाहायला मिळाला नाही. कोरोना संसर्गाचे संकट वाढत असल्याने यंदा गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले. त्यामुळे शारीरिक अंतर, शांतता आणि शिस्तबद्धता ठेवून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे  " गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या " , " एक दो तीन चार, गणपतीचा जयजयकार " , " एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला ".. या घोषणांच्या निनादात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जवळील  सार्वजनिक तलावात गणेश मूर्तिचे विसर्जन करण्यात आले.


          कोरोना पार्श्वभूमीवर  शहरात मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपला सहभाग दर्शविला. गणेश चतुर्थीला यावर्षी ५० सार्वजनिक व हजारोंच्या वर घरगुती गणपतीची स्थापना करण्यात आली होती. यातील  शेकडो घरगुती गणपती बाप्पाचे दीड, पाच, सात दिवसांनी विसर्जन करण्यात आले.   तर अनंत चतुर्दशीपर्यंत २१ सार्वजनिक गणेश मंडळांसोबत अन्य गणेश भक्तांनीही अनंत चतुर्दशीलाच बाप्पांचे विसर्जन केले.

      शहरातील दिमाखदार गणेश विसर्जन मिरवणूक आबालवृद्धांसाठी एक पर्वणीच असते. याउत्सवात सहभागी होऊन आनंद लुटण्यासाठी हजारो गणेशभक्त तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून येतात व  मिरवणुकीत विविध रंगाच्या गुलालात रंगून जातात. भव्य पद्धतीने निघणाऱ्या या मिरवणुकीची वर्षभर श्रद्धाळू आतुरतेने वाट पहात असतात. कारण गणेशोत्सव दरम्यान लागणारी विविध दुकाने व त्यामाध्यमातून मिळणाऱ्या नाना प्रकारच्या वस्तू प्रत्येकांसाठी अनमोल ठेवा असतो. तसेच मिरवणुकीच्या आदल्या दिवशी सायंकाळनंतर मंडळाचे कार्यकर्ते ट्रॅक्टर -  ट्रॉली  घेऊन मिरवणुकीमध्ये यायचे, त्यानंतर रांगा लावणारे कार्यकर्ते, मिरवणुकीत त्यांच्या मार्गावर असणारा पोलीस बंदोबस्त. कोरोनामुळे यंदा हे दृश्य पहायला मिळाले नाही. गणेशोत्सव दरम्यान जल्लोषात निघणाऱ्या  मिरवणुकीला निर्बंध असल्याने  कार्यकर्त्यांसमवेत भक्तगणही हिरमुसले. 


          अनंत चतुर्दशीला सकाळी ११ वाजताच्या सुमारास परंपरेनुसार मोठे विठ्ठल मंदिराच्या गणेशाचे सर्व प्रथम आगमन झाले. महर्षी वाल्मिकी प्रवेशद्वारावरच पूजा अर्चा करून सार्वजनिक तलावात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. तदनंतर  आळीपाळीने सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार भव्य सोहळ्याला फाटा देत शिस्तबद्ध पद्धतीने भावपूर्ण वातावरणात " गणपती बाप्पा मोरया " या उत्साहवर्धक घोषणांनी आसमंत दुमदुमून गणेश मूर्तिचे विसर्जन केले.


  प्रशासनाने दरवर्षी ठेवण्यात येणारा बंदोबस्त कायम ठेवल्याने व पोलिसांनी दंडेली न केल्याने तसेच गणेश भक्तांनी समंजसपणा कृतीत उतरविल्याने विसर्जन मिरवणूक सोहळा निर्विघ्नपणे पार पडला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies