खारेपाटातील शेतीवर कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, September 3, 2020

खारेपाटातील शेतीवर कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव

 खारेपाटातील शेतीवर कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव


शेतकऱ्यांनी केली नुकसान भरपाईची मागणी


फवारणी करण्याचे कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
देवा पेरवी-पेण


  काही दिवसांपूर्वी येऊन गेलेले निसर्ग चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याने कष्टाणे केलेली भाताची पेरणी वाहून गेली आहे. त्यातच आत्ता पावसाने दडी मारल्याने आलेली रोपे करपू लागली आहेत. कोरोनातील लॉकडाऊनच्या  संकटात सुद्धा प्रतिकूल परिस्थितीवर शेतकऱ्याने दुर्लक्ष करत शेतीची लागवड केली परंतु गेल्या दहा-बारा दिवसांपासून पेण तालुक्यातील हमरापूर-जोहे विभागासह खारेपाटात मोठ्या प्रमाणात कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव भातशेतीवर दिसून येत आहे.भाताची पाती कापणारी किडही मोठ्या प्रमाणात भाताच्या पिकाला लागल्याने बळीराजा धास्तावला आहे. काही प्रमाणात आता भाताची रोपे फुलायला सुरुवात झाली असताना पाती कापणाऱ्या आळीने भात पिकावर जोरदार हल्ला चढवल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुसकान होत आहे. 


त्याचप्रमाणे कडा करपा रोग पडल्याने भात रोपांच्या पात्या पिवळ्या पडल्या असून वेळेवर उपाययोजना केल्या नाही तर एकेकाळचे रायगड जिल्ह्यातील भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण तालुक्यातील भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

   पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करताच कृषी अधिकारी अनिल रोकडे, कृषी सहाय्यक अनुजा गुंजाळ, माजी सरपंच काशिनाथ पाटील, शेतकरी बालकृष्ण पाटील, अशोक पाटील, ज्ञानेश्र्वर पाटील, विश्वास पाटील यांच्यासमवेत कृषी कर्मचाऱ्यांनी खारेपाटातील शेतीला भेट देऊन शेतीची पाहणी केली. आणि कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव, पाती कापणाऱ्या कीडीचा हल्ला थांबविण्याच्या दुष्टीने महत्वाची उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शनही केले.
 

प्रति 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड आणि 5 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन सल्फेट मिसळून संपूर्ण भात शेतीवर फवारणी करावी

- अनिल रोकडे, पेण तालुका कृषी अधिकारी 


 निसर्ग चक्रीवादळ, जोरदार पाऊस आणि करपा रोगामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शासनाने सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.

- काशीनाथ पाटील, माजी सरपंच जोहे ग्रामपंचायत

No comments:

Post a Comment