Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

ती `फुलराणी' डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख!!

 आज भक्ती बर्वेची जयंती. ती आपल्यात असती तर तिने आज तिचा ७२वा वाढदिवस साजरा केला असता. पण ती अर्ध्या वाटेवरूनच विंगेत कायमची निघून गेली. 


तिच्या फुलांसारख्या स्मृतींना तिच्या मित्राची ही फुलांजली...


ती '`फुलराणी'


मुंबई दूरदर्शन केंद्र नुकतंच सुरू झालं होतं, तेव्हाची गोष्ट. केंद्रात सारेच नवे. या नव्या माध्यमाचा अनुभव फारसा कुणालाच नाही. त्यातल्या त्यात काही मंडळी दिल्ली दूरदर्शनला जाऊन सहा महिन्यांचा कोर्स करून आली होती. तीच माणसं काय ती वासरातल्या लंगड्या गायी. सारेच चालताना अडखळत एकमेकांना हात देत चालत होते. त्यातच एक होती, भक्ती बर्वे. उंची जेमतेम पाच फूट, गोरापान नितळ सदैव हसरा चेहरा आणि गिड्डा बांधा. ज्या थोड्या लोकांना आपापल्या सर्कलमध्ये नाव होते, त्यातली एक भक्ती. ती आकाशवाणीवरून दूरदर्शनला आली होती. तिथे ती `विविध भारती'मध्ये काम करायची. पण ती दूरदर्शनला आली निवेदिका म्हणून. मुंबईच्या प्रायोगिक रंगभूमीवर तिचं नाव तेव्हा गाजत होतं. रंगायतन, थिएटर युनिट, इंडियन नॅशनल थिएटर अशा बड्या हौशी व प्रायोगिक नाटक संस्थांमध्ये तिचा बोलबाला होता.ती एक कसबी अभिनेत्री होती, इतकाच काय तो आम्हाला तिचा परिचय. याच काळात विजय तेंडुलकरांच्या `चार दिवस' या नाटकाच्या `चार दिन' या हिंदी

अनुवादाचं सादरीकरण टीव्हीच्या पडद्यावर झालं आणि भक्ती ही काय चीज आहे, हे आम्हा साऱ्याना  उलगडलं. श्रीमंतीचं स्वप्न पाहता पाहता त्या स्वप्नातच जगू लागलेल्या आणि त्यामुळेजळजळीत वास्तवाचं भान पार हरवून गेलेल्या एका चाळकरी कनिष्ट मध्यमवर्गीय तरुणीची ही छोटीशी पण भावनावेगी गोष्ट. त्यात भक्तीनं सादर केलेली `ती' वेडी मुलगी साऱ्यांच्याच काळजाला चटका लावून गेली.


या गोष्टीतली मुलगी स्वप्न जगत राहते, तश्शीच भक्तीसुद्धा आयुष्यभर स्वप्नात रमून राहिली. त्यातली तिची काही स्वप्नं प्रत्यक्षात आली; काही तिला सदैव हुलकावण्याच देत राहिली, तर काही स्वप्नांचा आनंद वास्तवात ती अनुभवत असतांनाच अचानक ती भंगली आणि भक्ती सैरभैर झाली. स्वप्न पाहात असतांनाच अचानक जाग येऊन सुंदर फुलपंखी स्वप्न भंग व्हावं, तसंच अखेर भक्तीचं झालं. अनेक दु:खांचे पहाड झेलत ती सुखाचं स्वप्न पाहात असतांनाच काळानंच तिच्यावर आघात केला आणि त्या स्वप्नासह तिलाही उचलून नेलं. पुन्हा कधीही

स्वप्न न पाहण्यासाठी.भक्तीची अनेक रुपं. रंगभूमीवर किंवा टीव्हीच्या सेटवर मेकअप करून ती उभी राहिली की, जशी वेगळीच दिसायची, तशीच प्रत्यक्ष जीवनातही ती वेगवेगळी रुपं घेऊन वावरली. त्यामुळेच असेल कदाचित, भक्ती कधी कुणाला कळलीच नाही. हत्ती आणि सहा अंधांच्या गोष्टीत जसं प्रत्येक आंधळ्याला हत्ती वेगवेगळा वाटतो, तसंच भक्तीच्या बाबतीत होत राहिलं. फरक इतकाच की, भक्ती एकाच माणसालाही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी वाटायची आणि भासायची. 


अनेकदा मैत्रिण म्हणून भक्ती जितकी प्रेमळ आणि हवीहवीशी वाटायची, तितकीच सहकारी म्हणून तापदायक ठरायची. काम चालू असताना अद्वातद्वा बोलणारी भक्ती बातमीपत्र झालं की, आग्रहानं चहाला बोलवायची आणि प्रेमानं तासनतास गप्पा मारायची. यातली खरी भक्ती कुठली? बातम्यांची तयारी चालू असताना जीणं नकोसं करणारी की चहाच्या टेबलवर गप्पा मारणारी? खरं तर भक्ती तीच, पण भूमिका बदलली की, त्याप्रमाणे तिचं वागणं-बोलणंही बदलत असे.

पण हे फारच थोड्यांना उमगलं.


दूरदर्शनमध्ये भक्तीच्या निकट सहवासात तब्बल पाच वर्षं काढली, यातला प्रत्येक दिवस वेगळा अनुभव आणि तितकाच आनंद देणारा होता, हे मात्र नक्की. ती पहिल्यांदा भेटली, तेव्हा माझं वय 19 आणि तिचं 26 होतं. त्यामुळे ती थोरल्या बहिणीच्या-ताईच्या नात्यानंच वागायची, तशीच काळजी घ्यायची आणि रागवायचीसुद्धा. मला प्रेमानं `भय्या' अशीच हाक मारायची. भक्तीनं हातात फुटपट्टी घेऊन माझ्या पाठीवर रट्टे दिल्याचे आजही स्मरते. अर्थात हे सारं माझी भाषा शुद्ध आणि उच्चार स्पष्ट व्हावेत, यासाठी. शब्दोच्चारांबद्दल ती कमालीची जागरुक. एखाद्या अमराठी नावाचा नक्की उच्चार काय, हे शोधण्यासाठी ती तासन्तास घालवायची; अनेकांना कामाला लावायची आणि स्वत:चं समाधान होईपर्यंत काम करत राहायची.


त्या काळात दूरदर्शनवर `साप्ताहिकी' नावाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांना कमालीची क्रेझ. हा कार्यक्रम यशस्वी होण्यात महत्त्वाचा भाग भक्तीच्या मेहनतीचा. छायागीतपासून`आमची माती आमची माणसं' किंवा `घर बेठां'सारख्या कार्यक्रमापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाची माहिती भक्ती स्वत:च जमवायची, त्यासाठी कार्यक्रमाच्या निर्मात्यांच्या मागे भुणभुण करत घोंघावत राहायची, पण अखेर संपूर्ण माहिती मिळवूनच परत यायची. त्यामुळेच कार्यक्रम कमालीचा यशस्वीसुद्धा व्हायचा. बातम्या वाचतानाही तिची अशीच कटकट चालायची. त्या काळात अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या वॉटरगेट प्रकरणाच्या बातम्या असायच्या. इस्त्रायल-अरब जगतात युद्ध पेटत होते, त्याच्या बातम्या ऐनवेळी यायच्या.  अमेरिकन आणि अरेबिक उच्चार यांच्यात कमालीचं अंतर. भक्ती ते सारे उच्चार आत्मसात करायची आणि मगच सेटवर जायची.प्रत्येक बातमी त्या त्या बातमीच्या मूडप्रमाणे वाचायची, हा तिचा खाक्या. पण हे करताना स्वत: व्यक्तिगत पातळीवर कधी भावनावश व्हायचं नाही, असं ती स्वत:ला समजावत असे. पण एकदा तिच्या मनाचा बांध फुटलाच. सुप्रसिद्ध अभिनेता शंकर घाणेकर यांचे अकाली निधन झालं, त्या रात्री भक्ती बातम्या वाचत होती. संध्याकाळपासूनच तिचा मूड गेलेला होता. `मला ड्युटी बदलून मिळेल का?' याचीही तिने चाचपणी केली, पण बातम्या तिलाच वाचाव्या लागल्या. अखेर ती दु:खद बातमी वाचताना भक्ती हळवी झालीच. तिच्या डोळ्यात अवचित अश्रू तरळले आणि आवाज जड झाला. तिनं ओठांचा बांध फोडून बाहेर येऊ पाहणारा हुंदका कसाबसा आवरला आणि ती बातमी पूर्ण केली. प्रेक्षकांना मात्र तो तिच्या अभिनयाचा आविष्कार वाटला आणि त्याबद्दल तिचं कौतुक आणि अभिनंदन करणारी पत्रं पुढे बराच काळ दूरदर्शनवर आणि वर्तमानपत्रांत येत राहिली.


भक्ती स्वत:तच मश्गुल असायची. ती दूरदर्शनमध्ये होती, तेव्हाही तिची नाटके चालूच होती. तेव्हा ग्रँट रोडच्या रॉबर्ट मनी शाळेत मराठी प्रायोगिक नाटकांचे प्रयोग होत. तिथे दिलीप कोल्हटकर यांनी दिग्दर्शित केलेल्या `बूट पॉलिश' या नाटकाचा प्रयोग होत असे. प्रयोगाला जेमतेम वीस-पंचवीस प्रेक्षक उपस्थित असायचे. इतकी मोठी व प्रसिद्ध अभिनेत्री असूनही भक्ती त्या नाटकातला म्हातारीचा छोटा रोल तन्मयतेनं सादर करायची.`ही रंगायतनची शिकवण', ती नंतर म्हणाली. भक्तीनं अनेक गंभीर भूमिका केल्या तरी तिचा मूळ स्वभाव विनोदाकडे झुकणारा असल्यानं, तशा भूमिका करताना तिला अधिक आनंद मिळायचा आणि तसं ती बोलूनही दाखवायची. `आपण स्टेजवर असताना प्रेक्षक खळाळून हसायला हवेत, ते रडून काय उपयोग?' असं ती विचारायची आणि म्हणूनच नंदकुमार रावतेंचं `पप्पा सांगा कुणाचे?', किंवा `हँड्स अप' ही नाटकं आणि `जाने भी दो यारो' हा हिंदी चित्रपट तिला खूप आवडायचा. पण तिचं नशीब असं की, तिच्या वाट्याला अती गंभीर भूमिकाच येत राहिल्या. त्या तिनं आव्हान म्हणून स्वीकारल्या

आणि त्यांचं सोनंही केलं.


पु. ल. देशपांडेंनी त्यांच्या `ती फुलराणी'साठी भक्तीला विचारलं, तो क्षण तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा. त्यामुळेच ती त्याबद्दल वारंवार बोलत राहायची. हे नाटक स्विकारायचं ठरवलं, तेव्हा भक्तीनं बराच गृहपाठ केला. जॉर्ज बर्नार्ड शॉचं मूळ `पिग्मॅलियन' तिनं वाचून काढलंच, शिवाय ते समजावून घेतलं. नंतर कुठल्याशा थिएटरमध्ये ती मला ओढून घेऊन गेली आणि आम्ही `माय फेअर लेडी' पाहिला. नंतर तिच्या प्रॉक्टर रोडवरच्या घरात बसून तिनं शेकडो प्रश्न विचारून मला हैराण केलं. पुलंची `फुलराणी' नेमकी कशी आहे, हे समजून घेण्यासाठी तिची ही सारी धडपड. 


`फुलराणी'च्या तालमी चालू असताना भक्तीनं रजा घेतली होती. मात्र तरीही अनेकदा रात्री ती दूरदर्शन केंद्रावर येत असे. फुलराणी नेसते, तशी साडी नेसून ती मेकअप रुममध्ये आरशासमोर उभी राहून एकटीच तालीम करायची. त्यातली स्वगतं दहादहा वेळा म्हणायची. `तुला शिकवीन चांगला धडा', हे जगप्रसिद्ध स्वगत तर तिनं साऱ्यांना कॉन्फरन्स रुमच्या टेबलावर उभं राहून करून दाखवलं. स्वत:च्या कामावर विलक्षण भक्ती हे भक्तीचे एक खास स्वभाव वैशिष्ट्य.


त्यामुळेच जर्मन क्रांतीकारक नाटककार ब्रेश्ट यांच्या `कॉकेशियन चॉक सर्कल'चं चिं. त्र्यं. खानोलकर यांनी केलेलं `अजब न्याय वर्तुळाचा' हे रुपांतर विजया मेहता यांनी फ्रिट्झ बेनेविट्झ यांच्या सहकार्यानं मराठी रंगभूमीवर आणायचं ठरवलं आणि त्यात भक्तीला मुख्य भूमिकेसाठी निमंत्रित केलं, तेव्हा भक्ती भारावून गेलीच, पण दुसऱ्याच क्षणी कामाला लागली. 


या नाटकात भक्तीला एक अख्खं गाणं स्टेजवर गायचं होतं. `येतो महिना तसाच जातो, अजून ये ना कसा काय तो' असे त्याचे काहीसे शब्द होते. हे गाणं ध्वनिमुद्रित न करता प्रत्येक वेळी अभिनेत्रीनं म्हणजे भक्तीनेच गायला हवं, असा बेनेविट्झ यांचा आग्रह. भक्तीनं गाण्याचं अंग नसूनही हे आव्हान स्वीकारलं. झालं, तिचा संगीताचा अभ्यास सुरू झाला. ती विराणी होती. म्हणूनच विराणी म्हणजे काय, इथपासून तिनं सुरुवात केली. त्या काळात दूरदर्शनवर सुहासिनी मुळगावकर होत्या. त्या बिनीच्या शास्त्रीय आणि नाट्यगीत गायिका. भक्तीनं त्यांचा जणु गंडाच बांधला. दररोज ती स्वत: उशीरापर्यंत थांबायची आणि सुहासिनीबाईंनाही थांबवायची. त्यांच्याच खोलीत हार्मोनियमच्या साथीनं त्यांचा रियाझ चालायचा. अखेर भक्ती `गायिका' बनलीच. तिची ती विराणी बरीच गाजलीसुद्धा.


तिनं बहिणाबाईंच्या गाण्यांवर आधारित `बहिणाबाई' हा सांगितिक कार्यक्रम दूरदर्शनवर सादर केला, तेव्हा ती खास अहिराणी लकबीचे शब्दोच्चार शिकलीच, शिवाय जात्यावर बसून ओवी गाणारी बाई कशी बसेल, हे शिकण्यासाठी ती वेगवेगळ्या वयाच्या आणि जात-प्रांताच्या अनेक महिलांना भेटली, त्यासाठी मुंबई-पुण्यात भटकली.


या संपूर्ण काळात भक्तीबरोबर राहणं, वावरणं हा विलक्षण अनुभव होता. प्रेक्षकांच्या टाळया आणि वाहवा मिळवत असतांना भक्ती आतल्या आत एकटी होती, तो एकाकीपणा तिला क्षणोक्षणी मारत होता, हे जाणवायचं. तिचे वडिल शेअर बाजाराच्या व्यवहारात होते. त्यात बराच काळ नशीबानं साथ दिल्यानंतर एकदा दगा दिलाच. त्यामुळे हे कुटुंब खचलं होतं. त्या दु:खाचे व्रण भक्तीच्या बोलण्यात अधून मधून दिसायचे. मात्र या विषयावर ती कधी कुणाशी स्पष्टपणे बोलत नसे.


अशाच एकाकीपणाच्या काळात तिच्या आयुष्यात शफी इनामदार आला. ऊंचपुऱ्या भारदस्त शरीरयष्टीच्या शफीचा हिेंदी रंगभूमी आणि टीव्हीच्या पडद्यावर दबदबा होता. त्याची `ये जो है जिंदगी' ही मालिका प्रचंड गाजलेली होती. बघता बघता भक्ती त्याच्या प्रेमात पडली आणि कट्टर हिंदुत्ववादी विचारांची असूनही शफीबरोबर निकाह लावून मोकळी झाली.


आता भक्ती खूप आनंदात होती. बोलताना दर दोन वाक्यांनंतर ती शफीचा उल्लेख करायची. तो किती प्रेम करतो, ते सांगत राहायची. `मी स्वप्नातच आहे, असं वाटतं', असं ती एकदा भावनावश होऊन म्हणाली. ती इतकी शफीमय झाली की, आतापर्यंत `अरे देवा' असं किंचाळणारी कोकणस्थ भक्ती आता नकळत `या अल्ला' असं म्हणायला लागली होती. पण तिचं हे सुखद वास्तवही क्षणिक स्वप्नच ठरलं आणि ते तसंच भंगलंसुद्धा. 13 मार्च 1996ला शफी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं गेला.


भक्तीचं संपूर्ण आयुष्यच जणू कोलमडून पडलं. `चार दिन' मधल्या स्वप्न जगणाऱ्या तरुणीसारखीच भक्ती आपल्या भंगलेल्या स्वप्नांच्या काचांचे तुकडे वास्तवाच्या उकिरड्यात शोधत राहिली. पण असं झालं, तरी भक्ती काम करतच होती. आता तिनं `आई रिटायर होतेय' हे कमालीचं भावनाप्रधान नाटक केलं, ते खूप चाललं. भक्तीला मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं. त्यातलं तिचं भाषण गाजलं. पण भक्तीचा जीव कशातच रमत नव्हता, हे मात्र खरं. कधीही भेटली, तरी भक्ती शफीबद्दल बोलायची आणि त्याच्या आठवणी जागवताना तिला हुंदका आवरता यायचा नाही.


`कशाला वारंवार त्याचाच विचार करत राहतेस? त्याचा तुलाच त्रास होतोय.' एकाने तिला समजावण्यासाठी म्हटलं, तर भक्ती उसळून म्हणाली, `का नको त्याची आठवण काढू? तो इतका रोमारोमात भिनलाय की, त्याला विसरायचं तर मला स्वत:लाच विसरावं लागेल.' भक्तीचं शफीवर असं प्रेम होतं.


मग भक्तीनं `घरकुल' या टीव्ही सिरियलमध्ये भूमिका केली. ती पुन्हा मराठी घराघरात शिरली. प्रत्येक कुटुंबाचा जणू घटक बनली. तिनं `पुलं, फुलराणी आणि मी' असा एक एकपात्री कार्यक्रम बसवला आणि त्याचे प्रयोग करत ती दौरे करू लागली. असाच एक प्रयोग वाईला करून पहाटे मुंबईला परतत असताना तिच्या भरधाव गाडीला भयानक अपघात झाला आणि भक्ती कायमची निघून गेली. आपल्याला रात्री काय स्वप्न पडलं, ते दुसऱ्या दिवशी सांगण्याची तिला भारी हौस. 10 फेब्रुवारी 2001ला गाडीत साखर झोपेत असताना तिला काय स्वप्न पडलं होतं, ते तिनं सांगायचं मात्र राहूनच गेलं.


`फुलराणी' कवितेत बालकवी ठोबरेंनी पंक्ती लिहिल्या :


हिरवे हिरवे गार गालिचे

हरित तृणांच्या मखमालीचे

त्या सुंदर मखमालीवरती

फुलराणी ती खेळत होती ।।

...स्वप्न संगमी दंग होऊन

प्रणय चिंतनी विलीन वृत्ती

कुमारिका ही डोलत होती

डुलता डुलता गुंग होऊनी

स्वप्ने पाही मग फुलराणी

कुणी कुणाला आकाशात

प्रणयगायने होते गात

हुळुच मागुनि आले कोण

कुणी कुणा दे चुंबनदान

प्रणयखेळ हे पाहुनी चित्ती

विरहार्ता ती फुलराणी होती...


पुलंची ही फुलराणीसुद्धा अशीच विराणी गात अंतर्धान पावली.


भक्तीचं स्मरण करताना एक प्रसंग हमखास मनाच्या रिंगणात रुंजी घालायला लागतो. विजया मेहतांच्या खंडाळ्याजवळच्या एका टेकडीवरच्या बंगल्यात एकदा आम्ही राहायला गेलो होतो. भक्ती, गोविंद निहलानी असे निवडक मित्र. रात्री हायवेवरच्या गाड्यांचे अस्पष्ट आवाज कानावर येत होते. गप्पा रंगात आल्या असताना रस्त्यावर गाडीनं करकचून दाबलेल्या ब्रेकचा कर्णकर्कश्श आवाज ऐकू आला आणि भक्ती कासावीस झाली. हात घट्ट धरून ती म्हणाली, `मला स्पीडची खूप भीती वाटते रे!' नंतर रात्रभर ती अस्वस्थच होती. नंतरही गाडीतून जाताना ती सतत `स्पीड कमी, स्पीड कमी'.... चा जपच करत राहायची.


गाडीचा हा वेगच तिला या जगातून उचलून नेणार आहे, याची तिला कल्पना होती का?


आजही कुठेही गाडीच्या ब्रेकचा आवाज ऐकला किंवा गाडी चालवताना बे्रकवर पाय दाबला

की, डोळ्यासमोर ती पाच फूट उंचीची भक्ती उभी राहतेच!

........


'स्मरण' या माझ्या स्मृतिचित्र संग्रहातून...


डॉ.भारतकुमार राऊत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies