अति आत्मविश्वास टाळून आजार अंगावर काढण्यापेक्षा चाचण्या करा
आमदार प्रतिभा धानोरकर
राजेंद्र मर्दाने-वरोरा, चंद्रपूर
कोरोना नियंत्रणासाठी राज्यभर " माझे कुटुंब, माझी जबाबदारी " अभियान राबविण्यात येत असून जनप्रतिनिधींनी आपापली जबाबदारी निष्ठेने पार पाडली व नागरिकांनी अति आत्मविश्वास टाळून आजार अंगावर न काढता सर्वेक्षण टिमला सहकार्य करीत वेळीच चाचण्या करून घेतल्या तर या जीवघेण्या संकटांवर हमखास नियंत्रण मिळवता येईल,असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आज येथे केले. पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत अधिकारी, व जनप्रतिनिधींना मार्गदर्शक करताना त्या बोलत होत्या.
बैठकीत उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, नगराध्यक्ष अहेतेशाम अली, तहसीलदार सचिन गोसावी, पंचायत समिती सभापती रवींद्र धोपटे, उपसभापती संजीवनी भोयर, वैद्यकीय अधीक्षक डॉ गोवर्धन दुधे, गटविकास अधिकारी संजय बोदेले, पोलीस निरीक्षक उमेश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार धानोरकर पुढे म्हणाल्या की, जनमानसामध्ये प्रशासनाला एका रुग्णामागे दीड लाख रुपये मिळतात. सोबतच कोरोना रूग्णांची किडणी काढल्या जात असल्याची चर्चा आहे. ही अफवा असून असा कोणताही प्रकार तालुक्यात होत नाही. पैसै मिळत असल्यामुळे रुग्णांची संख्या वाढविली जात असल्याचा गैरसमज चुकीचा असून यावर कुणीही विश्र्वास ठेवू नये, असे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने प्रामाणिकपणे मास्क वापरावा, शारीरिक अंतर पाळावे, नियमित हात धुवावेत. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या टीम कडून आपली, परिवाराची तपासणी करून घ्यावी व चाचण्यांसाठी इतरांना ही प्रेरित करावे. चाचण्या करा ते नुकसानीचे नाही उलट आपल्या सोबत दुसऱ्यांसाठी ही फायद्याचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. चाचण्या वाढवून रुग्ण शोधण्यावर भर दिला जात असल्याचे सांगताना माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान यासाठी पोषक ठरणारे असल्याचे त्या म्हणाल्या.
उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे म्हणाले की, वेळेवर उपचार झाला तर कोरोनावर शतप्रतिशत मात करता येते. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येतो त्यावेळी वाढलेल्या आजारामुळे अनेकदा रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य होत नाही त्यामुळे जराही शंका आल्यास किंवा लक्षणे दिसल्यास ताबडतोब चाचणी करून उपचार घ्या. सर्वांना आपल्या कुटुंबीयांची जबाबदारी घ्यायची आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात ,कोरोना केअर सेंटर मध्ये खाटांची उपलब्धता आहे .कोणत्याही संभ्रमात राहू नका असे त्यांनी आवाहन केले.
तहसीलदार सचिन गोसावी म्हणाले की, या अभियानात सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. ट्रेस, टेस्ट , ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा वापर करुन कोरोनावर नियंत्रण मिळवता येते. जोवर यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही तोवर यावर नियंत्रण मिळविणे कठीण होईल. जनप्रतिनिधींनी आपापल्या परीने प्रशासनाला योग्य सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ गोवर्धन दुधे यांनी ही कोरोना नियंत्रणासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले.
यावेळी जनप्रतिनिधीनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. जनप्रतिनिधी कडून योग्य सहकार्याची अपेक्षा वर्तविण्यात आली व कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाची टिम सज्ज असल्याचे त्यांना आश्वस्त करण्यात आले.
बैठकीत नगर परिषदचे उपाध्यक्ष सर्वश्री अनिल झोटिंग, जि. प. सदस्य सुनंदा जीवतोडे, पंचायत समिती सदस्य विकास डांगरे, रोहिणी देवतळे, विशाल पारखी, पार्वती ढोक ,खुशाल सोमलकर, शालिक झाडे, विजय आत्राम, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी नितीन मत्ते, विलास टिपले ,वैभव डहाने, डॉ भगवान गायकवाड, मिलींद भोयर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळू मुंजनकर, आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment