मूकपट ते रंगीतपट! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख! - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, September 21, 2020

मूकपट ते रंगीतपट! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख!

 मूकपट ते रंगीतपट!

डॉ.भारतकुमार राऊत

(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत.)

मूक चित्रपटांपासून ते आधुनिक चित्रपटांपर्यतच्या प्रवासात मुगले आजम, बावर्ची अशा चित्रपटांत संस्मरणीय भूमिका करणा-या दुर्गा खोटे यांची आज पुण्यतिथी... 


चित्रपट कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टीकोन दूषीत होता त्या काळात दुर्गा खोटे यांना चित्रपटात येणे भाग पडले. मुलीने चित्रपटात काम करणे घरच्या लोकांना पसंत नव्हते. 

पारंपरिकतेला चिटकून असणा-या ब्राह्मण परिवारात १४ जानेवारी १९०५ रोजी जन्माला आलेल्या दुर्गा खोटे यांच्यावर कमी वयातच मोठ्या  जबाबदारीला सामोरं जावं लागलं...त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आणि दोन मुलांना सांभाळण्‍यासाठी त्यांनी चित्रपटात काम करण्याचा मार्ग स्वीकारला. 

दुर्गा खोटे यांनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात येऊ शकतात असा एकप्रकारे संदेशच त्यांनी दिला. सुरूवातीस त्यांनी छोट्या भूमिका केल्या आणि लवकरच त्यांना नायिकेची भूमिका मिळाली. प्रभात फिल्म्सचा १९३२मध्ये प्रदर्शित झालेल्या अयोध्येचा राजा या ‍चित्रपटाने तर त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. मराठी आणि हिंदीमध्ये बनलेल्या या चित्रपटात त्यांनी राणी तारामतीची भूमिका केली. 


त्यावेळी स्टूडियो सिस्टमचा जमाना होता त्यावेळचे कलाकार ठरावीक पगारावर स्टूडियोमध्ये काम करायाचे. पण, आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी फ्रीलांस काम करण्यास सुरूवात करून ही पध्दत मोडीत काढली. न्यू थियेटर्स, ईस्ट इंडिया फिल्म कंपनी, प्रकाश पिक्चर्स आदींसाठी त्यांनी काम केले. १९३०च्या शतकाच्या अखेरीस त्या निर्माता आणि दिग्दर्शक बनल्या आणि त्यांनी चरणों की दासी, भरत मिलाप अशा एकावर एक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांनी त्यांचा गौरव वाढवला. 

चित्रपटांबरोबरच दुर्गा खोटे यांनी मराठी रंगभूमीवरही आपली कारकिर्द गाजवली. इंडियन पीपल्स थियेटर एसोसिएशन (इप्टा) च्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीसाठी भरीव कार्य केले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. शेक्सपीयर यांच्या मॅकबेथवर आधारीत राजमुकूट या नाटकातील त्यांचा अभिनय वाखणण्‍याजोगा होता. 

१९३१मध्ये सुरू झालेला त्यांचा चित्रपट प्रवास अनेक दशके प्रेक्षकांना सुखावत राहिला. या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्‍यात आले. 

नायिकेच्या भूमिकांनंतर त्यांनी रंगवलेल्या चरित्र भूमिका प्रेक्षकांना भावल्या. मुगले आजम, बॉबी, बावर्ची अशा चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही स्मरणात आहेत. त्यांनी लिहलेल्या आत्मकथेचा इंग्रजी अनुवाद 'दुर्गा खोटे' या नावाने प्रकाशित झाला. २२ सप्टेंबर १९९१ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या या प्रवासात त्यांनी चित्रपटातील महिला कलाकारांना दर्जा प्राप्त करून दिला.

( मराठी वेबदुनिया यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे )

No comments:

Post a Comment