Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

तेरा जाना, दिल के अरमानों का...! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख

 तेरा जाना, दिल के अरमानों का...!

डॉ.भारतकुमार राऊत

(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत.)


'अनाडी' चित्रपटात पियानोवर बसलेली नूतन सूर आळवते, 'तेरा जाना, दिल के अरमानों का लूट जाना..!' ...आणि लाखो तरूणांच्या काळजाला भोकं पडतात. लताबाईंच्या स्वराला सुरांचा तितकाच मौल्यवान साज चढवणारे संगीतकार जयकिशन. त्यांचा आज ४९ वा स्मृतीदिन! त्यांच्या मुलायम सुरावटींना आदरांजली!


गोरापान चेहरा, गोबरे गाल व कपाळावर रुळणाऱ्या रेशमी काळ्याभोर बटा - एखाद्या हिरोला लाभावे असे व्यक्तिमत्व. पण टेबलवरील हार्मोनियमवर बोटे फिरू लागली की, त्यातून स्वर्गीय गोडीचे सुर पाझरू लागत. संगीतकार जयकिशन यांचे हेच तर वैशिष्ट्य होते.हिंदी चित्रपटसृष्टी तब्बल दोन दशके गाजवणाऱ्या शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील जयकिशन आजच्याच दिवशी १९७१ साली जयकिशन यांचे अकाली निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय जेमतेम ४१ वर्षांचे होते.


राज कपूरचा अभिनय, मुकेश-लता मंगेशकरांचा आवाज, शैलेंद्रचे शब्द व शंकर-जयकिशन यांचे संगीत यांची भट्टी 'बरसात'पासून अशी जमली की त्यांनी प्रत्येक संधीचे सोने केले. या जोडीने संगीत दिलेल्या गाण्यांनी लोकप्रियतेचे विक्रम तर मोडलेच शिवाय त्यामुळेच चित्रपटही हिट होत राहिले.


जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९चा. लहानपणापासूनच ते हार्मोनियमवर गाणी वाजवत. सुप्रसिद्ध गुजराती दिग्दर्शक चंद्रवदन भट्ट यांच्याकडे संधीसाठी चकरा मारत असतानाच त्यांची गाठ शंकर या आणखी एका होतकरू संगीतकाराशी पडली. शंकरही संधीच्या शोधात फिरत होते.जयकिशन त्या काळी पृथ्वी थिएटरसाठीसुद्धा काम करत. त्यामुळे पृथ्वीराज कपूर यांच्याशी ओळख झाली. त्यामुळेच राज कपूर यांनी 'बरसात'साठी त्यांना काम दिले. या सिनेमातील सर्वच गाणी कमालीची हिट झाली व बघता बघता शंकर-जयकिशन ही यशस्वी जोडी बनली.


शंकर-जयकिशन या संयुक्त नावाने ते संगीत देत असले तरी ते स्वतंत्रपणे वेगवेगळ्या गाण्यांना संगीत देत असत. जयकिशन यांचे १९७१ साली निधन झाले तोपर्यंत हाच रिवाज चालू राहिला.हे दोघेही राज कपूरकडे संगीतकार म्हणून करारबद्ध होते. त्यांची अनेक गीते राज कपूरनी रेकाॅर्ड करून ठेवली होती. त्यामुळे जयकिशन यांचे निधन झाल्यानंतरही अनेक वर्षे त्यांच्या संयुक्त नावाने गाणी येत राहिली.


आजही पाऊस पडू लागला की, त्यांनी बांधलेल्या चालीचे 'बरसात में हमसे मिले तुम सजन' हे गाणे तोंडावर येते आणि जयकिशनचा चेहराही मन:चक्षूंसमोर येतोच.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies