एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचा व्हिडिओ दिशाभूल करणारा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, September 12, 2020

एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचा व्हिडिओ दिशाभूल करणाराएका जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचा व्हिडिओ दिशाभूल करणारा

मशीनवर दिसणारे संगणकीय आलेख हे हृदयाच्या ठोक्यांचे नसून कृत्रिम श्वासोच्छवासाचे


दिशाभूल करणारा सदर व्हिडिओ प्रसारित न करण्याचे महापालिकेचे आवाहन

महाराष्ट्र मिरर टीम-मुंबईबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका रुग्णालयात एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर 'व्हायरल' झाला आहे. मुळात हा पेशंट अतिगंभीर परिस्थितीत अतिदक्षता विभागात भरती करून घेण्यात आला. डॉक्टरांनी त्याला वेळीच उपचार करून कृत्रिम श्वासोच्छ्वासाची नळी म्हणजे 'Intubate' करून प्रयत्नांची शर्थ केली. तथापि, दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाला. त्याची ईसीजी काढून हृदयक्रिया बंद पडल्याची ईसीजीची 'फ्लॅट लाईन' पेशंटच्या नातेवाईकांना दाखवत व वैद्यकीय उपचार क्रमानुसार आवश्यक ती तपासणी करून रुग्णाचा मृत्यू झाल्याचे निदान होते. 

..

परंतु रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या जमावाने कर्तव्यावर असणाऱ्या महिला डॉक्टरवर बळजबरी करत 'व्हेंटीलेटर' सुरू करण्यासाठी दबाव आणला. त्यानंतर डॉक्टरने व्हेंटिलेटर चालू केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असून व्हेंटिलेटर वरील लाईन 'फ्लॅट' नसल्याचेही दिसत आहे. मात्र सदर यंत्र हे 'ईसीजी मशिन' नसून कृत्रिम श्वासोच्छवास देण्यासाठी वापरण्यात येणारे 'व्हेंटिलेटर मशीन' आहे. त्यामुळे त्याच्यावर दिसणा-या आलेखीय रेषा या मशीनद्वारे देण्यात येणारा कृत्रिम श्वासोच्छ्वास दर्शविणाऱ्या असून हृदयाशी किंवा रुग्णाच्या श्वासोच्छवासाची संबंधित नाहीत नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.

..

व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या सदर रेषा (लाईन) ही कृत्रिम श्वासोच्छ्वासाची लाईन आहे. ज्याचा कोणत्याही अर्थाने पेशंट जिवंत आहे, असा अर्थ होत नाही. जमावाने अतिशय निर्दयपणे त्या विद्यार्थी महिला डॉक्टरला अतिशय आक्षेपार्ह व निषेधार्ह भाषेत अर्वाच्च शिव्यांची लाखोली वाहिल्याचे व तिच्या अंगावर धावून गेल्याचेही व्हिडीओ मध्ये दिसत आहे. सरकारी कामकाजात अडथळा आणणे, रुग्णसेवेत बाधा आणणे, शिवीगाळ करणे आणि के.ई.एम. रुग्णालयाची हेतुतः बदनामी करणे; या बाबींच्या अनुषंगाने नजीकच्या पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध 'एफ. आय. आर.' दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

..

सदर व्हिडिओ 'व्हाट्सअप', फेसबुक इत्यादी समाज माध्यमांवर बसण्यापूर्वी सदर बाबत शहानिशा करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता आणि कोणतीही खातरजमा न करता सदर व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसृत करण्यात आला. अशा प्रकारे दिशाभूल करणारे व्हिडिओ समाजाचे माध्यमांवर प्रसृत केल्या मुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अक्षरश: दिवस-रात्र कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांच्या आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच जी गोरगरीब व सामान्य जनता मोठ्या आशेने महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना उपचारासाठी घेऊन येते, त्यांच्या मनात असलेल्या आशेवर आणि विश्वासावर देखील अशाप्रकारच्या व्हिडिओ मुळे अत्यंत प्रतिकूल परिणाम होऊ शकतो ही बाब लक्षात घेणेही गरजेचे आहे.

..

*अत्यंत दिशाभूल करणारे असे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसृत केल्यामुळे त्याचा थेट परिणाम रुग्णांचा या सार्वजनिक रुग्णालयांवर असलेल्या विश्वासाला तडा जाण्यात होत आहे. तरी या निवेदनाद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन नागरिकांना आवाहन व नम्र विनंती करू इच्छिते की, नागरिकांनी कृपया असे दिशाभूल करणारे व्हिडिओ कृपया 'फॉरवर्ड' किंवा 'शेअर' करू नयेत आणि कोविड विरोधातील आपल्या वैद्यकीय लढाईस बळ द्यावे .

No comments:

Post a Comment