कशेडी घाटातील बोगद्याचे काम पोलादपूर बाजूने अर्धा किमी.चा टप्पा पूर्ण - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, September 7, 2020

कशेडी घाटातील बोगद्याचे काम पोलादपूर बाजूने अर्धा किमी.चा टप्पा पूर्ण

 कशेडी घाटातील बोगद्याचे काम पोलादपूर बाजूने अर्धा कि.मी.चा टप्पा पूर्ण.

खेड बाजूनेही घेतला कामाने वेग-निर्धारित वेळेत भुयारी मार्ग होणार खुला


शैलेश पालकर-पोलादपूरपोलादपूर तालुक्यातील मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणादरम्यान कशेडी घाटातील नियोजित बोगद्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या हेतूने दोन्ही बाजूने काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे. पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द गावापासून काही अंतरावर या भुयारी मार्गाच्या दुसरी बाजूचे उत्खनन सुरू झाले असून आतापर्यंत अर्धा किमी अंतराचा टप्पा पूर्ण झाला आहे. या टप्प्यात लगतच्या बोगद्यासोबत कनेक्टीव्हीटीचा भुयारी मार्ग पूर्ण झाला आहे. दरम्यान, गेल्यावर्षी खेड बाजूने सुरू झालेल्या बोगद्याचे कामही वेगाने सुरू असून पुढील 2021 वर्षाच्या प्रारंभी हा भुयारी मार्ग पुर्णत्वास जाणार आहे.


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून पोलादपूर तालुक्यातील भोगाव येथे भुयारी मार्गासाठी यंत्रसामुग्रीची जमवाजमव सुरू होऊन कामाला सुरूवात झाल्यानंतर आजपर्यंत तब्बल अर्धा किमी. अंतराचा टप्पा पूर्णत्वास गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील खवटी येथून 2019च्या पावसाळयापूर्वीच भुयारी मार्गाचे काम सुरू झाले. पोलादपूर ते खेड या दरम्यान असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगातून असणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या डोंगरातून खेड बाजूने हे काम सुरू झाल्यानंतर आजमितीस साधारणपणे 730 मीटर अंतराचा भुयारी मार्ग झाला आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 वरील कशेडी घाट हा कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जात असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे शापित ठरला आहे. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चे चौपदरीकरण सुरू असून या कशेडी घाटामध्ये रस्त्याचे चौपदरीकरण शक्य नसल्याने भारतीय पध्दतीचा भुयारी मार्ग खणून रस्ता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या घाटातील प्रस्तावित 3.44 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने निविदा मंजूर झाल्याने स्विकारले असून 441 कोटी रुपयांचा खर्च याकामी होणे अपेक्षित आहे.


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 म्हणजेच पुर्वीचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 च्या पुनर्वसन आणि सुधारणेसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2018 यावर्षी अभियांत्रिकी प्रॉक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन यांच्यासोबत 441 कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यामुळे कशेडी घाटातील प्रस्तावित बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविताना तीन पदरी दोन भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत. यातील करारानुसार 7.2 किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का रस्ताही प्रस्तावित असून या रस्त्याचे कामदेखील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच करीत आहे. 31 ऑॅक्टोबर 2017 पर्यंत टेंडर भरण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळे टेंडर प्रक्रिया 2018च्या सुरुवातीलाच पूर्ण झाली होती. नियोजित भुयारी मार्गापर्यंत सर्व अत्याधुनिक यंत्रसामुग्री जाण्यासाठी रस्त्यांचा ठेका घेतलेल्या कंपन्यांनी सक्षम रस्ते बनवल्यानंतर या कामाला सुरुवात झाली असून केवळ 30 महिन्यांमध्ये दोन्ही भुयारी मार्गाचे काम पूर्ण केल्यानंतर दोन्ही बोगद्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याचे कामदेखील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले आहे.


त्यामुळे कशेडी घाट व त्यावर असलेल्या नागमोडी वळणांचा, खोल दरीचा, डोंगरातून कोसळणाऱ्या दरडींचा, अचानक निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचा तसेच सर्व प्रकारच्या अपघातजन्य परिस्थितीचा विचार करून हे दोन्ही बोगदे तातडीने पूर्णत्वास जाण्यासाठी राज्य सरकार आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ह्या दोन्हींच्या समन्वयातून भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावला आहे.कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गासाठी एक अत्याधुनिक भुयार खोदकामाचे यंत्र म्हणजेच बुमर वापरण्यात येत असून याद्वारे तीन ते चार मीटर लांबीचे कातळ फोडले जात आहे. 20 मीटर रुंदी आणि 6.5 मीटर उंची अशा पध्दतीने भुयारी मार्गाचे खोदकाम करण्यास बूमर यंत्राचा उपयोग होत आहे. भुयारी मार्गामध्ये महत्वाच्या ठिकाणी सुरुंग स्फोटासाठी जिलेटिनचा वापर केला जात असून भुयारामध्ये पडलेले कातळ व मोठमोठे दगड बाहेर काढण्यासाठी अजस्त्र यंत्राचा वापर केला जात आहे. हे कातळाचे दगड मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामांमध्ये वापरण्यात येत असून दोन्ही भुयारी मार्ग एकमेकांपासून वेगवेगळे असणार आहेत. 


यासोबतच आपत्कालामध्ये उपयुक्त असलेले वायुविजन सुविधेचे एक भुयारदेखील यामध्ये समाविष्ट असून पोलादपूर बाजूच्या पहिल्या अर्धा किमी. अंतराच्या टप्प्यामध्ये दोन्ही भुयारी मार्गांना जोडणाऱ्या कनेक्टिव्हिटीचा भुयारी मार्ग तयार झाला असून आतील भागात परत युटर्न घेणाऱ्या वाहनांसह अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची सुविधा या कनेक्टिव्हिटी भुयारीमार्गाने होणार आहे. यासोबतच आपतकालामध्ये उपयुक्त असलेले वायुविजन सुविधेचे एक भुयारदेखील यामध्ये समाविष्ट आहे.2019 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू झालेले हे काम एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले यांनी यापूर्वीच दिली आहे.

No comments:

Post a Comment