Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

'बिनधास्त' 'मर्तिक'!डॉ भारतकुमार राऊत यांचा लेख

 'बिनधास्त' 'मर्तिक'!


चिंचपोकळीमधील डिलाईल रोडच्या फुटपाथवरचे साई बाबांचे मंदिर. रस्त्यावर भरपूर गर्दी असली, तरी मंदिरात तशी सामसूमच. याच मंदिराच्या एका कोपऱ्यात छातीपर्यंत रुळणारी पांढरी शुभ्र दाढी, अंगावर भगवी कफनी व डोळ्यावर जाडसर चष्मा लावलेले चंद्रकांत खोत काही तरी वाचताना दिसायचे.
ते कुठे राहायचे? मंदिरात का बसायचे? मधल्या काळात ते कुठे हरवले होते? याची कुणालाच फारशी कल्पना नव्हती. ते या मंदिराच्या आवारातच या जगाचा निरोप घेऊन २०१४च्या १० डिसेंबरला निघून गेले.अशा जगावेगळ्या वाटेने आयुष्यभर भरकटत राहिलेल्या चंद्रकांत खोत यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त या कलंदर कलावंताचे आज स्मरण.खोतांचा जन्म ७ सप्टेंबर १९४० रोजी भीमाशंकरला झाला. घरच्या स्थितीमुळे त्यांना सातवीनंतर कमाईसाठी घराबाहेर पडावे लागले. पण प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ते एम ए झाले. त्यांना डाॅक्टरेट मिळवायची होती पण गाईड मिळाला नाही. दैवगती अशी की, डाॅक्टरेट करू न शकलेल्या खोतांच्या साहित्यावर त्यांच्याच गावच्या विद्यार्थ्याने पीएच डी मिळवली.खोतांची साहित्यसेवा 'मर्तिक' या कविता संग्रहापासून सुरू झाली. नंतर लैंगिक जीवनावरील बिनधास्त लिखाणामुळे ते सतत वाद व चर्चेत राहिले. ते जसे लिहायचे तसेच बिनधास्त बोलायचेसुद्धा.


खोतांच्या 'उभयान्वयी अव्यय' या समलिंगींच्या मानसिकतेवरील कादंबरीने बरेच वाद ओढवून घेतले. त्यांनी 'बिनधास्त' या शीर्षकाची कादंबरीही लिहिली. 


खोतांचे लेखन चमचमीत वाटत असले, तरी त्यात शाश्वत सत्य दडलेले असे. त्यामुळेच लेखनासाठी खोतांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यविश्वात ’लिटल मॅगेझिन‘ चळवळ उभारुन त्यांनी खळबळ उडवून दिली होती. पठाणी वेश, डोक्‍यावर फरकॅप, डोळ्यांत सुरमा अशा टेचात ते मराठी साहित्यसृष्टीत वावरत असत. त्यानी 'अबकडइ' हा आगळा वेगळा दिवाळी अंक तब्बल १५ वर्षे चालवला.


मात्र १९९५ मध्ये ते अचानक गायब झाले ते १५ वर्षांनी पुन्हा अवतरले. पण आता ते पूर्णपणे बदलून अध्यात्माच्या मार्गाला लागले होते. त्यांनी आता 'अलख निरंजन', 'गण गण गणांत होते', 'सन्यासाची सावली' अशा वेगळ्याच घाटणीच्या साहित्याची निर्मिती केली.सर्व सामाजिक परिमाणे व रुढ संकेत   धुडकावून वावरलेला हा अवलिया अखेरपर्यंत बेघरच राहिला. खोतांनी राज्य सरकारकडे मुख्यमंत्री कोट्यातून घर मागितले होते. पण ते मिळाले नाही. ही खंत वृत्तपत्रांनी मांडल्यानंतरही महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. 


ते गेले त्याच्या काही काळ आधी ७ सप्टेंबर २०१४ला मित्र परिवाराने त्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा त्यांचा विरोध झुगारुन साजरा केला होता. त्यांच्या भणंग आयुष्यात असे प्रसंग क्वचितच आले.


डॉ.भारतकुमार राऊत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies