होंटों पे ऐसी बात यूॅं...! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 8, 2020

होंटों पे ऐसी बात यूॅं...! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख

 होंटों पे ऐसी बात यूॅं...!


श्लोक-ऋचा-अभंगांपासून चित्रपट गीते, नाट्यपदे, लावण्या, पाॅप संगीत अशा संगीताच्या विविध दालनांना लीलया गवसणी घातल्यानंतरही आपला 'आशा छाप' कायम ठेवणाऱ्या आशा भोसले यांचा आज  वाढदिवस. त्यांच्या करोडो चाहत्यांतर्फे त्यांना लाख लाख शुभेच्छा!गायनातील एकही क्षेत्र असे नाही, ज्यावर आशाताईंनी हुकुमत चालवली नाही. मराठी व भारतीयांची मने त्यांनी रिझवलीच, शिवाय आशिया, युरोप, आफ्रिका, अमेरिका या खंडांतही त्यांनी हजारो चाहते जोडले.मंगेशकर घराण्याचा जबरदस्त वारसा लाभूनही या कुटुंबाच्या आखीव-रेखीव चौकटीत त्या बंदिस्त झाल्या नाहीत. मुळातच बंडखोरीची वृत्ती लाभलेल्या आशाताईंनी वैयक्तिक जीवनात वेगळ्या वाटा चोखाळल्या तशाच त्या गायकीमध्येही मळलेल्या पायवाटांवरून कधी चालल्याच नाहीत. त्यांनी परिस्थितीच्या जंगलात स्वत:चे रस्ते शोधून काढले. त्याचेच पुढे हमरस्ते झाले.


वयाच्या दहाव्या वर्षी १९४३मध्ये त्यांची संगीतातील कारकीर्द सुरू झाली, ती आज ८६व्या वर्षातही चालूच आहे. सचिन देव बर्मन यांनी आशाताईंना हिंदी पार्श्वगायनाची संधी दिली. तेव्हापासून किमान दोन डझन प्रथितयश संगीतकाराबरोबर काम करताना ए. आर. रेहमान या नव्या दमाच्या कलाकाराबरोबरही त्या तितक्याच उत्साहाने काम करत आहेत.
वैयक्तिक जीवनात त्यांनी अनेक दु;खे, आप्तजनांचे वियोग व गृहकलह सोसले, तसेच कारकीर्दीतही अनेक विरोध वाद व समस्यांशी लढा दिला व त्या सर्वांवर पाय ठेवून त्या उभ्या राहिल्या.


आशाताईंबद्दल सविस्तर लिहायचे, तर ग्रंथ तयार होतील. पण धावता आढावा घ्यायचा तरी काही पाने लिहावी लागतील.


 १९५७ मध्ये सचिन देव बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे अनेक चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले. पुढे त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही.


ओ. पी. नय्यर आणि आशाताई एक अफलातून जोडी होती. १९६० च्या सुमारास नय्यर यांचे संगीत असणारे ‘ऑखोसे जो उतरी है दिलमे’ (फिर वही दिल लाया हूँ ) हे गाणे; १९६५चे जाइये आप कहाँ (मेरे सनम); १९६८ मधील वो हसीन दर्द देदो (हम साया); चैन से हमको कभी - अशी अनेक प्रसिद्ध गाणी त्यांनी गायली.


राहुल देव बर्मन यांच्याबरोबर काम करताना आशाताई त्याच्या जीवनसाथीही बनल्या. पिया तू अब तो आजा हे १९७१चे कारवाँ चित्रपटातील गीत, १९७१ चेच फिल्मफेअर पुरस्कार विजेते ‘दम मारो दम’; ‘जाने जा’ हे १९७२ चे जवानी दिवानीतले गाणे, ही गाणी आशा भोसलेंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली. १९८१ चा ‘उमराव जान’ हा चित्रपट आशाताईंमधली गझल गायिका रसिकांसमोर घेऊन आला. 


खय्याम यांच्या सुरांना आशाताईंच्या स्वरांनी समर्थ साथ दिली. त्यांचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि दिल चीज क्या है, इन आँखोंकी मस्तीसारखी शब्दरचना हे सगळेच जमून आले. ‘दिल चीज क्या है’ या गीताला १९८१ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे ‘इजाजत’ चित्रपटातल्या ‘मेरा कुछ सामान’ या त्यांच्या गाण्यालाही १९८६ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.मराठी भवगीत, भक्तिगीत, नाट्यगीत, लोकगीत व चित्रपट गीत या सर्वच प्रकारांत आशाताईंची कामगिरी मोलाची आहे. सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक-गायिकांबरोबरची गाणी मराठी रसिकमनात घर करून राहिली आहेत. बा. भ. बोरकर, आरती प्रभू, ग. दि. माडगुळकर, शांता शेळके, सुरेश भट, सुधीर मोघे यांच्या कवितांबरोबर सौमित्रसारख्या नव्या दमाच्या कवींच्या कविताही आशाताईंच्याच आवाजात रसिकांपुढे आल्या.


आशाताईंची शेकडो मराठी गाणी - तरुण आहे रात्र अजुनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहूनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती - अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे. ‘रेशमाच्या रेघांनी’तला लावणीचा ठसका, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’तला कृतज्ञता भाव, ‘केव्हा तरी पहाटे’तली हुरहुर, ‘जे वेड मजला लागले’ची गोडी, सारे काही विलक्षण. इतके वैविध्यपूर्ण स्वर लाभलेला कलाकार विरळाच.


आशाताईंनी जे अनेक प्रयोग केले, त्यापैकी 'Rahul & I' हा अनोखा प्रकार कमालीचा गाजला. गाण्याबरोबरच उत्तम स्वयंपाक हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. आपल्या खास पाककृतींचे एक रेस्तराँ त्यांनी दुबईमध्ये चालवले.


वैयक्तिक आयुष्यात आशाबाईंनी जसे उत्कट आनंदाचे, यशाचे क्षण अनुभवले, तसेच त्यांच्यावर दु:खाचे डोंगरही कोसळले, ते त्यांनी स्वत:च्या ताकदीवर झेलले. पहिले पती गणपतराव भोसले व नंतर प्रसिद्ध संगीतकार राहुल देव भोसले यांचे अकाली निधन, कन्येचाही अचानक स्वर्गवास हे सारं त्यांनी सोसले व तरीही त्या हसतमुखाने उभ्या राहिल्या. 'ज्वेल थिफ'मधील लता मंगेशकर यांच्या आवाजातील 'होटों पे ऐसी बात यूॅं दबा के चली..' या गाण्यातले आयुष्य आशाबाई प्रत्यक्ष जगल्या.आशाताईंना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय  सम्मान व पुरस्कार लाभले. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण देऊन गौरवले.


अशा विविध गुणांनी नटलेल्या आशाताईंना Happy Birthday!


जीवेत् शरद: शतम् ।


डॉ.भारतकुमार राऊत

No comments:

Post a Comment