ऐन नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांच्या दरात उसळी ,200 रुपये प्रतिकिलो ,निसर्ग चक्रीवादळ व परतीच्या पावसाचा परिणाम !
संतोष सुतार-माणगांव
नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला या वर्षीच्या नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांचे भाव वाढले असून निसर्ग चक्रीवादळ व परतीच्या पावसामुळे झेंडूचे उत्पादन कमालीचे घटले आहे.त्याचा परिणाम झेंडूच्या फुलांच्या पुरवठ्यावर झाला असून या वर्षी झेंडूची फुले 200 रुपये किलोने विकली जात आहेत.
नवरात्रोत्सवात पूजाअर्चा करण्यासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते .दरवर्षी नावरात्रोसवाच्या फुलांच्या मागणीचा विचार करून अनेक शेतकरी झेंडूची लागवड करतात. या वर्षी मात्र निसर्ग चक्रीवादळ व परतीच्या पावसाने झेंडूची शेती झोडपून काढल्यामुळे झेंडूच्या उत्पादनावर याचा परिणाम झाला असून जवळपास पन्नास टक्के झेंडू उत्पादन कमी होत आहे. यामुळे ऐन नावरात्रोसवाच्या हंगामात झेंडूची आवक कमी झाली असून बाजारपेठेत एक किलो झेंडू 200 रुपये पेक्षा अधिक किमतीने विक्री होत आहे.
प्रतिवर्षी 100 ते 120 रुपये किलोने मिळणारा झेंडू यावर्षी 200 रुपये पार झाल्याने भक्तगणात नाराजी आहे.मात्र पूजेसाठी आवश्यक असणारी फुले कमी प्रमाणात का होईना ग्राहक खरेदी करताना दिसत आहेत.
यावर्षी निसर्ग चक्रीवादळ व परतीच्या पावसाच्या तडाख्याने झेंडूची शेती नुकसानीत गेली आहे. जवळपास पन्नास टक्के रोपे कोलमडली आहेत.त्यामुळे उत्पादन कमी होत आहे. त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवर झाला असून यावर्षी 200 रुपये प्रति किलो झेंडू विकला जात आहे.
महेश दाखिनकर ,शेतकरी -विक्रेता.