एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत करणार प्रवेश- जयंत पाटील यांची माहिती
महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली.
आज एकनाथ खडसे यांनी फोन करून भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत असेही जयंत पाटील म्हणाले.
गेले कित्येक दिवस भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती ती चर्चा आज संपुष्टात आली असून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले.
आता फक्त त्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत त्यांनाही काही दिवसात प्रवेश दिला जाईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.