माथेरान मधील शौचालये उद्घाटनापूर्वीच डबघाईला
चंद्रकांत सुतार--माथेरान
पर्यटकांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी माथेरान मध्ये नगरपरिषदेमार्फत महत्वाच्या विविध ठिकाणी तयार शौचालय उभारली आहेत.ही शौचालय बांधून जवळजवळ वर्ष व्हायला आले तरीसुद्धा ह्याचे अनावरण, उद्घाटन सुध्दा झालेले नसून अनेक ठिकाणी या शौचालयांचे दरवाजे तसेच नळ कनेक्शन तुटलेले आहेत. अद्याप वापर सुद्धा न करता ही शौचालय खूपच डबघाईस आलेली आहेत. जर नगरपरिषदेला हा सर्व अनाठायी खर्च करावयाचा होता तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही कामगारांची नेमणूक करणे आवश्यक होते परंतु तसे काही करण्यात आलेले नाही.त्यामुळेच जवळपास लाखो रुपयांची नाहक वाताहत झालेली आहे. अशाप्रकारे पैशाचा चुराडा होत असेल तर माथेरान नगरपरिषदेचे भवितव्य पुढील काळात अंधकारमय असणार यात शंका नाही. यासाठी मुख्याधिकारी , संबधीत अभियंत्यांनी आणि विशेष म्हणजे अशाप्रकारची कामे लवकरच मार्गी लावण्यासाठी घाई करणाऱ्या लोकप्रतिनिधीनी सुध्दा कामे पूर्ण झाल्यानंतर त्याची नियमितपणे देखरेख राहावी यासाठी लक्ष केंद्रित करावे जेणेकरून जनतेच्या पैशाचा गैरवापर अथवा व्यर्थ जाणार नाहीत.अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.