Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पुणे स्मार्ट सिटी ॲडव्हायझरी फोरम'ची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

 'पुणे स्मार्ट सिटी ॲडव्हायझरी फोरम'ची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक


पुणे स्मार्ट सिटी’ ची कामे दर्जेदार आणि जलदगतीने पूर्ण करा

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश


         तरोनिश मेहता -पुणे, पुणे शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सुरु असलेली कामे शहराच्या सुविधा, सौंदर्य, वैभवात भर घालणारी असली पाहिजेत. ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. कामात पारदर्शकता असली पाहिजे. निधीचा योग्य उपयोग झाला पाहिजे. लोकप्रतिनिधींच्या व ‘स्मार्ट सिटी’ मिशनच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन ‘स्मार्ट सिटी’ संदर्भातील पुणे शहराचे राष्ट्रीय रँकिंग सुधारण्याचा प्रयत्न व्हावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. 


       'पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कोर्पोरेशन लिमिटेड'च्या 'स्मार्टसिटी ॲडव्हायझरी फोरम'ची पाचवी बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील विधानभवन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, अॅडव्हायजरी फोरमचे सदस्य सतीश मगर, अनिरुद्ध देशपांडे तसेच अन्य पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची कामे दर्जेदार झाली पाहिजेत. सर्व प्रकल्पांची कामे मुदतीत पूर्ण होण्यासाठी नियोजन करा. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य शासन आणि महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या निधीचे योग्य नियोजन करुन कामे वेळेत व्हायला हवीत. देशात पुणे स्मार्ट सिटीचे रँकींग सुधारण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

  प्रकल्प राबविताना लोकप्रतिनिधी व अनुभवी तज्ञांच्या सूचना विचारात घेऊन 'स्मार्ट सिटी मिशन' च्या मार्गदर्शक तत्वानुसार कामे  करुन घ्यावीत.  कामात पारदर्शकता ठेवून कोणतीही कसर राहणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना करुन विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वय ठेवून सुरु असणारी कामे लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावीत, असेही त्यांनी सांगितले.

 

खासदार गिरीश बापट यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींनी स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्पासंदर्भात अनेक उपयुक्त सूचना केल्या. या प्रकल्पाअंतर्गत सुरु असलेली विविध विकास कामे जलद पूर्ण करावीत, असेही त्यांनी सुचविले. 

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्मार्टसिटी अंतर्गत सुरु असणाऱ्या कामांचे सादरीकरण करुन माहिती दिली. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies