Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आरोग्याची महामेरू डॉ.शुभांगी अहंकारी

 

नवदुर्गा स्पेशल स्टोरी

आरोग्याची महामेरू,सकल जनांसी आधारू
डॉ.शुभांगी अहंकारी

संकलन-राम जळकोटे-उस्मानाबाद

@maharashtramirror.co.in


मराठवाडय़ातील उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथे गेली ३० वर्षे स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतितज्ज्ञ असलेल्या डॉ. शुभांगी अहंकारी लाखो ग्रामीण लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. आज त्यांच्या ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’तर्फे  तीन तालुक्यांतील सुमारे ९५ गावांमध्ये आरोग्यविषयक काम चालते. लातूर भूकं पाच्यावेळची भारतवैद्य ही संकल्पना असो, गर्भवती स्त्रियांसाठी विमा योजना, नर्सिंग महाविद्यालय उघडणे असो की सोनोग्राफी केंद्र सुरू करणे असो,

डॉ. शुभांगी यांनी ग्रामीण आरोग्याच्या क्षेत्रात नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले. इतके च नव्हे तर ग्रामीण गर्भवती महिला व किशोरवयीन मुली यांच्यातील रक्तक्षयाबाबत ब्रिटनमधील नॉटिंगहॅम विद्यापीठाबरोबर केलेल्या संशोधन प्रकल्पातही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. मराठवाडय़ातील या महिला आरोग्य सेवाव्रती आहेत यंदाच्या पहिल्या दुर्गा.

दुष्काळ आणि आर्थिक—सामाजिक मागासलेपण हीच ओळख असलेल्या मराठवाडय़ातील उस्मानाबाद जिल्ह्यात डॉ. शुभांगी अहंकारी या  तीन  तपांहून अधिक काळ ग्रामीण महिलांमध्ये  माता—बाल संगोपन व आरोग्यविषयक जनजागृतीचे तसेच  प्रत्यक्ष वैद्यकीय सेवा देण्याचे सेवाकार्य करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी या परिसरातील हजारो ग्रामीण महिलांना सहजी उपलब्ध न होणाऱ्या सोनोग्राफी आणि सुरक्षित प्रसूतीसेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.


मूळच्या मुंबईकर असणाऱ्या डॉ. शुभांगी अहंकारी यांनी  विवाहानंतर १९८०च्या दशकात मराठवाडय़ातील उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर या छोटय़ा खेडय़ात स्थायिक व्हायचा धाडसी निर्णय घेतला आणि त्यांची आयुष्यभराची दिशाच बदलून गेली. मुंबईतील गतिमान जीवन  मागे पडले आणि मराठवाडय़ातले दुष्काळाच्या दाहक वास्तवातले जीवन सुरू झाले. ग्रामीण भागात एम.बी.बी.एस. व स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतितज्ज्ञ असलेली महिला डॉक्टर निवासी उपलब्ध असणे याचे  मोल वेगळेच आहे! डॉ. शुभांगी अहंकारी यांनी मुंबईतून एम.बी.बी.एस.पर्यंतचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयातून स्त्रीरोगतज्ज्ञ पदविका (ऊॅड) घेतली. १९८३ मध्ये त्यांनी अणदूर येथे ‘जानकी’ हे छोटे रुग्णालय सुरू केले. ‘डॉक्टरबाईंचा दवाखाना’ म्हणूनच ते अधिक नावारूपाला आले. पुढे १९९२ मध्ये ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’ या न्यासाची रीतसर स्थापना केल्यानंतर मात्र त्यांच्या कामाला खऱ्या अर्थाने गती आली.


उस्मानाबाद जिल्ह्यात ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’च्या माध्यमातून सध्या तुळजापूर,लोहारा व उमरगा या तीन तालुक्यांतील सुमारे ९५गावांमध्ये प्राधान्याने ग्रामीण आरोग्यविषयक काम चालते. ग्रामीण भागातील दोन लाख लोकसंख्येसाठी हे आरोग्याचे काम चालू आहे. सध्या डॉ. शुभांगी अहंकारी ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’च्या सहकार्यवाह असून जानकी रुग्णालयात ‘मुख्य वैद्यकीय अधिकारी’ म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.


१९९३च्या लातूर भूकंपाच्या वेळेस त्यांनी ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’च्या माध्यमातून मोठे वैद्यकीय मदतकार्य केले. त्यावेळी निवडक गावांमध्ये गावपातळीवरील ग्रामीण महिला आरोग्य कार्यकर्ती (भारतवैद्य) नेमण्याचा प्रयोग करण्यात आला. घरपोच व वेळेवर सेवा मिळण्यासाठी या भारतवैद्य प्रकल्पाची सुरुवात झाली. पुढे जवळपास एक तपाहून अधिक काळ  हा प्रकल्प सक्षमरीत्या चालला. या कालावधीत या भारतवैद्यांनी सुमारे  २ लक्षहून अधिक रुग्ण हाताळले. आत्तापर्यंत देशभरातील ४५०हून अधिक महिलांना भारतवैद्यचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात डॉ. शुभांगी अहंकारी यांचे मोठे  योगदान आहे. भारतवैद्य संकल्पनेवर आधारितच पुढे देशभरात ‘आशा कार्यकर्ती’ ही रचना शासनातर्फे अंगीकारली गेली. पुढे साधारणपणे २००६पासून गावपातळीवरील महिला बचत गट व अन्य विकासाचे विषय हाताळण्यास सुरुवात झाली. यात प्रामुख्याने कौटुंबिक हिंसाचार, स्त्रीभ्रूणहत्या व बालविवाह यांचा विरोध, स्त्री—पुरुष असमानता, कुपोषण आणि महिला सबलीकरण या विषयांचा समावेश होता. ‘संजीवनी महिला बचत संघा’च्या माध्यमातून ५००हून अधिक बचत गटांचीही उभारणी करण्यात आली आहे.



‘हॅलो’तर्फे  कौटुंबिक हिंसाचारविरोधी मार्गदर्शनपर आणि समुपदेशन केंद्रे सुरू करण्यात आली असून ७०० हून अधिक कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे हाताळण्यात आलेली आहेत. याशिवाय त्यांनी पुरुषांच्या व्यसनाधीनतेला अटकाव करण्यासाठी गावोगावच्या महिलांना एकत्र करून दारूबंदी अभियानही घडवून आणले. ऊसतोड मजुरी करणाऱ्या स्त्रियांचे  गरज नसताना गर्भपिशव्या काढण्याचे  घृणास्पद प्रकारही डॉ. शुभांगी यांनी उघडकीस आणले.  समुपदेशनाच्या कामाला त्यांनी वेळप्रसंगी संघर्ष व संशोधनाचीही जोड दिली. मराठवाडय़ातील ग्रामीण गर्भवती महिला व किशोरवयीन मुली यांच्यातील रक्तक्षय अर्थात अ‍ॅनेमियाबाबत ब्रिटनमधील नॉटिंगहॅम विद्यापीठाबरोबर केलेल्या संशोधन प्रकल्पातील


डॉ. अहंकारी यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. गर्भवती महिलांचा विमा काढण्याचा प्रयोग  देशभरात करणाऱ्या मोजक्या संस्थापैकी एक ‘हॅलो’ आहे. सुमारे ५ हजारांहून अधिक ग्रामीण महिलांना आरोग्य विमाछत्र उपलब्ध करून देण्यात आले.


फक्त सामाजिक नव्हे तर कौटुंबिक आघाडीवरसुद्धा डॉ. शुभांगी यांनी ध्येयवाद जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षण त्यांनी  जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच पूर्ण केले  हे विशेष. अलीकडे कर्करोगासारख्या दुर्धर रोगाचा सामना करून त्या जिद्दीने त्यातून बाहेर पडल्या. १९८३ पासून सुरू असणाऱ्या जानकी रुग्णालयाची नवीन सुसज्ज वास्तू ही अलीकडच्या काळात पडलेली मोठी भर आहे. या रुग्णालयाप्रमाणेच २० मुलींसाठीचे नर्सिग महाविद्यालयही अनेक तरुणींसाठी महत्त्वाचे ठरले आहे. सध्या ३० ग्रामीण पूर्णवेळ कार्यकर्ते तर सुमारे १५० अंशकालीन गावपातळीवरील कार्यकर्ते हॅलो मेडिकल फौंडेशनमध्ये कार्यरत आहेत. यापैकी ६० टक्के ग्रामीण महिला आहेत.

विविधांगी जबाबदाऱ्या डॉ. शुभांगी अहंकारी एकाच वेळी समर्थपणे पार पाडत असताना पती, डॉ. शशिकांत अहंकारी यांची भरभक्कम साथही मोलाची आहे. ग्रामीण भागात जाऊन वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. शुभांगी अहंकारी यांना  महाराष्ट्र मिररकडून मानाचा सलाम.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies