भाजीपाला विक्रीतून समृद्धी साकारणारे प्रभाकर चाफले ठरले शेतकऱ्यांसाठी आयकॉन
राजेंद्र मर्दाने-चंद्रपूर
वरोरा येथील पारंपरिक शेती पध्दतीला तिलांजली देत बाजारपेठ व नवतंत्रज्ञानाचा अभ्यास करून कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याने केवळ १५ हजार रुपये खिशात असताना १० गुंठे क्षेत्रात कामचलाऊ शेडनेट उभारून कोथिंबीर पिकाच्या लागवडीतून अवघ्या दोन महिन्यात ५० हजार रुपयांचा नफा मिळवित कुटुंबाची आर्थिक घडी व्यवस्थित करून समृद्धी साकारणारे व वर्षभरात भाजीपाला पिकातून अडीच ते तीन लाख रुपये नफा मिळविनच, असा विश्वास व्यक्त करणारे सुसा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी प्रभाकर नानाजी चाफले मनोबल खचलेल्या शेतकऱ्यांसाठी आयकॉन ठरले आहेत.
यावर्षी त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत कृषी सहाय्यक पी. एस. लोखंडे यांच्याकडून उन्हाळी भाजीपाला लागवडीची माहिती घेत शेडनेट योजना घेण्याचा विचार केला. परंतु सुरुवातीलाच १० गुंठे क्षेत्राकरिता साडे तीन ते चार लाख रुपये खर्च करण्याइतपत त्यांची आर्थिक स्थिती सक्षम नव्हती. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून तेवढ्या जागेकरिता लागणारे शेडनेट नागपूरवरून १२ हजारात खरेदी करून स्वतःकडील निलगिरीच्या बल्ल्या वापरून ८०×१० फुटाचे स्ट्रक्चर तयार केले. स्ट्रक्चर उभारण्यासाठी तीन हजार रुपये लागले.अशा एकूण १५ हजार रुपयात शेडनेटगृह तयार झाल्यावर मार्च महिन्यात वाफे करून घरी असलेले धने वापरून कोथिंबीर व सोबतच्या बल्ल्यानजीक कारले तसेच बॉर्डरला कोहळ्याची लागवड त्यांनी केली.
कोथिंबीर ही रोजच्या आहारात वापरली जाणारी महत्वाची पालेभाजी. कोथिंबीरची पाने चवीला किंचित तिखट व स्तंभक असून उचकी, दाह, कावीळ इ वर गुणकारी आहे. उडनशील तेलामुळे या वनस्पतीला सुगंध असतो व त्यात शरीराला आवश्यक असणारे लोह,फायबर, मँगॅनीजचे प्रमाणही जास्त असते. ही वनस्पती मधुमेहाचे प्रमाण कमी करते, कर्करोगापासून बचाव करते. खाद्यपदार्थाला सौन्दर्य व सुगंध तर प्राप्त होतोच शिवाय खाद्य पदार्थ आकर्षक दिसतात त्यामुळे या भाजीला वर्षभर हमखास मागणी असते. पेरणीपासून दोन महिन्यांनी कोथिंबीरला फुले येण्यास सुरुवात होते. कोवळी, हिरवीगार, लुसलुशीत,१५ ते २० सेमी वाढलेली, फुल न आलेली कोथिंबीर उपटून अथवा कापून त्याच्या ६० ग्रॅमच्या जुड्या बनवून १० रुपयाला एक याप्रमाणे परिसरात, गावात विक्री केली.स्वतःचा शेतमाल शहरी बाजारपेठेत निर्यात करण्यापेक्षा परिसरातील जनतेला पुरविण्याचा आनंद अवर्णनीय आहे, असे त्यांचे मत आहे. उन्हाळ्यात कोथिंबीरला चांगली मागणी असल्याने एप्रिल ते जून या दोन महिन्यात त्यांना ५० हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. ३० सप्टेंबरपर्यंत त्यांना ७५ हजार रुपये मिळाले. कोथिंबीर नंतर मेथी त्यानंतर पुन्हा कोथिंबीर ही पीकपद्धती अवलंबून वर्षाकाठी जवळपास अडीच ते तीन लाख रुपये नफा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी कष्ट घेण्याची तयारी व इच्छाशक्ती दांडगी असल्यास उन्नतीचा मार्ग निश्चित सापडतो. पारंपरिक पीक पद्धती बदलून उपलब्ध साधनसामग्रीचा वापर केल्यास व बाजाराची मागणी लक्षात घेऊन भाजीपाला लागवड केल्यास आर्थिक संपन्नता साधता येऊ शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. तालुका कृषी अधिकारी वाल्मिक प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक पी.एस.लोखंडे यांनी दिलेला सल्ला व तांत्रिक मार्गदर्शन बहुमोल ठरले, असे ते कृतज्ञतेने नमूद करतात.
चाफले यांनी केलेली शेती परिसरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी प्रेरणादायी व शासनाच्या धोरणाला चालना देणारी आहे. संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पुढाकार घेऊन सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांना उद्युक्त केल्यास मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड प्रकल्पातून परिसराचा निश्चित कायापालट होऊ शकतो.