संगीतसूर्य! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, October 3, 2020

संगीतसूर्य! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख

 संगीतसूर्य!

डॉ.भारतकुमार राऊत

(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत)ज्या काळात बाल गंधर्व, मास्टर दीनानाथ ही मंडळी संगीत रंगभूमी गाजवत होती, त्याच काळात केवळ कलागुण व अथक परिश्रम यांच्या ज़ोरावर कमालीची लोकप्रियता मिळवणारे संगीत अभिनेता केशवराव भोसले यांचा आज १०० वा स्मृतिदिन.मराठी संगीत नाट्यरंगभूमीवरील एक अतिशय गुणी नट आणि उत्तम गायक या त्यांच्या ख्यातीमुळेच त्यांना 'संगीतसूर्य' ही उपाधी मिळाली.

आपल्या क्षेत्रात पुढे जाताना दुसऱ्यांनासुद्धा बरोबर घेऊन जाणे, आपल्याकडे नसलेली कला दुसऱ्यांकडून विनयाने आत्मसात करणे आणि असलेली कला दुसऱ्यांना देणे असे हे व्यक्तिमत्व होते.


केशवरावांचा जन्म ९ ऑगस्ट १८९० रोजी कोल्हापूरमध्ये झाला. वयाच्या अवघ्या ४थ्या वर्षी त्यांनी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत प्रवेश घेतला. 'संगीत शारदा' नाटकातील 'मूर्तिमंत भीती उभी' या पदाने त्यांना प्रसिद्धी दिली. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी हुबळीमध्ये ललितकलादर्श नाटक मंडळी स्थापन केली. या नाटक मंडळींचे पहिले नाटक 'संगीत सौभद्र' १९०८ मध्ये गणेशपीठ, हुबळी येथे सादर केले गेले. नंतर हे नाटक महाराष्ट्रातही आले. त्यांच्या स्वत:च्या कोल्हापूर शहरातून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.


केशवरावांनी संस्कृत नाटक 'शाकुंतल'मध्येसुद्धा काम केले. त्यांच्या 'राक्षसी महत्वाकांक्षा' नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथे झाला. वेल्वेट कापडाचा पडदा प्रथमच मराठी रंगभूमीवर वापरण्यात आला होता. केशवराव हे कलाप्रेमी व कल्पक होते. त्यांनी वेळोवेळी केलेल्या अनेक गोष्टींचा वापर लोकांना खूप आवडला. संगीत सौभद्र मध्ये त्यांनी वापरलेले तुळशी वृंदावन ख़ास आकर्षण ठरले.


जेव्हा केशवरावांनी १९२१ साली 'संयुक्त मानापमान' नाटकात बालगंधर्व यांच्याबरोबर काम केले, तेव्हा ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. या नाटकाची तिकिटे १०० रुपये दराने विकली गेली होती (१०० रु. हि त्यावेळची फार मोठी किंमत होती). हा भारतीय रंगभूमीवरील अनोखा प्रयोग होता.


मामा वारेरकर यांच्या 'संगीत संन्याशाचा संसार' या नाटकातील केशवरावांची डेविडची भूमिका अविस्मरणीय ठरली. राजश्री शाहू महाराजांच्या विनंतीनुसार त्यांनी 'संगीत मृच्छकटिक' नाटकाचा प्रयोग कोल्हापूर महालाच्या प्रांगणात सदर केला. हा त्या नाटकाचा खुल्या रंगमंचावरील पहिलाच प्रयोग होता.


संगीत नाटकांमधील त्यांच्या अथक योगदानामुळे त्यांना 'संगीतसूर्य' म्हणून नावाजले गेले. त्या आधी १९१३ साली गेझेट ऑफ इंडियाचे संपादक गोर्डन यांनी केशवरावांचा महावस्त्र आणि सुवर्णपदक देवून गौरव केला. त्याप्रसंगी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी केशवरावांच्या गायन शैलीवर भाषण केले.१९२१ सालची 'संगीत शाह शिवाजी' नाटकातील शिवाजी महाराजांची भूमिका ही त्यांच्या आयुष्यातील शेवटची भूमिका होती. 


केशवरावांना केवळ ३१ वर्षांचे आयुष्य लाभले.  ४ ऑक्टोबर १९२१ रोजी केशवराव काळाच्या पडद्याआड गेले. 'संगीत सूर्य' मध्याह्नीलाच कायमचा मावळला.No comments:

Post a Comment