कुरळप पोलिसांकडून साडेनऊ लाखांचा गुटखा जप्त
उमेश पाटील -सांगली
कुरळप पोलिसांनी पुणे-बैंगलोर महामार्गावर धडक कारवाई करत आज साडेपंधरा लाखाचा गुटखा जप्त केला.चालक सुरेश गंगाधर नतवाडे रा.रेंदाळ व त्याचा सोबती संदेश सदाशिव माळी रा.हुपरी (जिल्हा-कोल्हापूर)या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.कुरळप पोलिसांच्याआक्टोबर महिन्यातील या दुसऱ्या मोठ्या कारवाईमुळे महामार्गावरून अवैद्य गुटखा व दारूची वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
अधिक माहिती अशी,बुधवारी महामार्गावरून निपाणी व्हाया सातारा अवैद्य गुटख्याच वाहतूक होणार असल्याची खात्रीदायक माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती.त्या अनुषंगाने आज सकाळपासूनच कुरळप पोलिसांनी येलूर फाटा येथे पाळत ठेवली होती.कोल्हापूर हुन येणाऱ्या प्रत्येक चारचाकी गाडीची तपासणी करण्यात येत होती.दरम्यान सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापूर हुन बोलेरो पिकअप गाडी नं.एम एच ०९ एफ एल १३५९ साताऱ्याच्या दिशेने निघाली होती.
येलूर फाटा येथे आल्यानंतर चौकशीसाठी चालकाला विचारणा केली असता गाडीत भुस्सा भरला असल्याचे सांगितले.पोलिसांना शंका आल्याने गाडीची तपासणी करण्यात आली.यावेळी गाडीच्या बाहेरच्या बाजूला भुस्सा व आतमध्ये गुटख्याची पोती भरलेली होती.यामध्ये सुमारे साडेनऊ लाखाचा गुटखा वाहतूक करण्यासाठी वापरलेली सहा लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप असा एकूण साडेपंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक अरविंद काटे,पोलीस नाईक अनिल पाटील,सूर्यकांत पाटील,पोलीस कॉन्स्टेबल फत्तेसिंग पाटील,दीपक शिंदे,सचिन मोरे यांनी कारवाईत भाग घेतला.अधिक तपास स.पो.नि.अरविंद काटे करीत आहेतफोटो - कुरळप पोलिसांनी महामार्गावरून गुटख्याची अवैद्य वाहतूक करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले.