Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

नाथाभाऊंनी पक्षात येताना एकही अपेक्षा व्यक्त केली नाही. पक्षात येवून कष्ट करण्याची भूमिका नाथाभाऊंनी व्यक्त केलीय - शरद पवार

 नाथाभाऊंनी पक्षात येताना एकही अपेक्षा व्यक्त केली नाही. पक्षात येवून कष्ट करण्याची भूमिका नाथाभाऊंनी व्यक्त केलीय - शरद पवार

राष्ट्रवादीत एकनाथ खडसे यांचा दिमाखात प्रवेश;राष्ट्रवादी कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी...

महाराष्ट्र मिरर टीम--मुंबई 

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता खांद्यावर झेंडा घेवून सर्वसामान्य लोकांचे काम करतोय त्यात आता नाथाभाऊंची भर पडली आहे. आमची बैठक झाली. त्यांनी पक्षात येताना एकही अपेक्षा व्यक्त केली नाही. पक्षात येवून कष्ट करण्याची भूमिका नाथाभाऊंनी व्यक्त केली आहे. वाहिन्यांवर अनेक बातम्या येत आहेत परंतु काहीही बदल नाही. आहे तसेच राहणार आहे. हे सर्व प्रदेशाध्यक्ष जयंतरावांच्या नेतृत्वाखाली काम करतील असा विश्वास शरद पवार यांनी आज व्यक्त केला

भाजप नेते एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. 

आज आनंदाचा दिवस आहे. नवीन पिढी पक्षात सहभागी होते आहे. प्रत्येक कार्यकर्ता काम करतोय. परंतु आम्हाला धुळे, जळगाव, नंदुरबार येथे अधिक काम करायचे आहे. पक्षात अजून गती यायची असेल तर नाथाभाऊंची गरज आहे असे सांगतानाच खान्देश हा गांधी, नेहरू यांच्या विचाराने वाढलेला आहे. कॉंग्रेसच्या विचाराचा हा खान्देश आहे. पक्षावर आणि विचारांवर निष्ठा असलेले लोक घराघरात आहेत. याशिवाय आलेल्या पाहुण्यांना आदराने खादीचा टॉवेल देणारा आणि खादीवर प्रेम करणारे जुनेजाणते लोक या जिल्ह्यात होते याची आठवण शरद पवार यांनी केली. 


अनेक नेत्यांनी आपलं आयुष्य या जिल्ह्यासाठी दिले आहे. एका निष्ठेने काम करणारा हा जिल्हा मध्यंतरी असा एक काळ आला तिथे नवी पिढी उदयाला आली ती पिढी उभी करण्याचे काम नाथाभाऊने केले. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात हा जिल्हा तयार झाला आणि आता दुसरा टप्पा सुरू होतोय हा जिल्हा राष्ट्रवादी विचाराने चालणारा असेल असे नाथाभाऊंनी सांगितले आहे. हा जाहीर शब्द नाथाभाऊंनी दिला आहे. दिलेला शब्द ते पाळतात असेही शरद पवार म्हणाले. मध्यंतरी मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आजच सरकारच्यावतीने शेतकर्‍यांना १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांची जमीन खरवडून गेली आहे. त्याची देखभाल करावी लागणार आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी मजबुतीने राहिल असा विश्वास शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिला. टिव्ही चॅनेलवर सध्या एकच चर्चा सुरू आहे. नाथाभाऊंच्या प्रवेशाची. वेळप्रसंगी जनतेशी बांधिलकी असणारे हे नेते आहेत. लोकांमध्ये जावून काम करतात. त्यामुळे त्यांना संकटाना सामोरे जावे लागते. लोकांच्यामध्ये आहोत म्हणून संकट येत आहेत असेही शरद पवार म्हणाले. आता नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पुढे जळगावला जावू. नवे - जुने लोक घेवून पक्षाची ताकद ते दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. 



'टायगर अभी जिंदा है' आणि 'पिक्चर अभी बाकी हैं; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जोरदार बॅटींग...

विधानसभेच्या सभागृहात मी भाजप नेत्यांना 'कटाप्पाने बाहुबली को क्यू मारा' हा प्रश्न केला होता. आजही ते टिव्ही बघत असतील आणि त्यांना आता कळेल 'टायगर अभी जिंदा है' आणि 'पिक्चर अभी बाकी है' अशा शब्दात एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाचे स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार बॅटींग केली. एकनाथ खडसे सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. मात्र त्यांना भाजपाने मागच्या रांगेत बसवण्याचे काम केले.

सुसंस्कृत महाराष्ट्रात जाणीवपूर्वक चांगलं राजकारण चव्हाणसाहेबांनी रुजवलं परंतु आज राजकारणातून संपवण्याचे राजकारण घडत आहे याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केली. पवारसाहेबांनी घडवलेले नेते ऐन निवडणुकीत पक्षाला सोडून गेले. परंतु पवारसाहेबांचा विचार मानणारे कार्यकर्ते त्यांच्यामागे उभे राहिले आणि त्यांचे विचार पुढे महाराष्ट्र स्वीकारेल हे आज सिद्ध झाले.पवारसाहेबांच्या अपार कष्टाने आज पक्ष आणि पक्षातील तरुण कार्यकर्ते उभे राहिले आहेत असेही जयंत पाटील म्हणाले. 

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज तात्काळ देण्याचे आमच्या सरकारने जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना उभं करण्याचे काम सरकार करत आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात शेतकर्‍यांवर संकट आणि कामगारांवर संकट आले आहे. परंतु त्यांच्या संरक्षणाला धक्का लावण्याचे काम केंद्रातील सरकारकडून केले जात आहे त्यासाठी आमची सत्ता असली तरी शेतकर्‍यांच्या व कामगारांच्या पाठीशी ताकदीने उभे राहिले पाहिजे असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी दिला. 

कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करणारा पक्ष आहे. सुखदुःखात धावुन जाणारा पक्ष आहे. 

पवारसाहेब ही पक्षाची ताकद आहे. जिव्हाळाच्या या पक्षात तरुणांना संधी दिली जाते. महाराष्ट्र उभा करायचा म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर पवारसाहेबांनी त्यावेळी जबाबदारी टाकली ती जबाबदारी आम्ही पेलल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

भाजप पक्ष वाढवण्याचे काम खडसे यांनी केले आहे. काही कानामागून आले आणि तिखट झाले असा प्रकार घडला आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना लगावला. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यासाठी खडसे प्रयत्न करतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. आम्ही सर्वांनी खडसे यांना काही देतो असं सांगितलं नाही त्यामुळे मिडियाने चुकीचं काही पसरवू नये अशी विनंती जयंत पाटील यांनी यावेळी केली. 

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागत केले. 


त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन - एकनाथ खडसे

भाजपात असतानाचे अनेक प्रसंग एकनाथ खडसे यांनी मांडले...

द्वेषाचे राजकारण केले नाही. पाठीत खंजीर खुपसला नाही. समोर ठेवून राजकारण केले नाही. मी लेचापेचा नाही. त्यांनी ईडी लावली तर सीडी लावेन  असे जाहीर आव्हान दिले असल्याचे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आज पक्ष प्रवेशाच्या वेळी सांगितले. 
पक्षाच्या उभारणीनंतर ४० वर्षे भाजपमध्ये काम केले. विधानसभेत किती मानहानी करण्यात आली. माझा गुन्हा काय हे वारंवार विचारत आलो. या क्षणापर्यंत मला उत्तर मिळाले नाही. मी खूप संघर्ष केला. संघर्ष करणं हा माझा स्थायीभाव आहे असेही एकनाथ खडसे म्हणाले. 
भाजपाने अडगळीत टाकले होते. रोहिणी खडसेला तिकीट जबरदस्तीने दिले. पक्षाला मी एवढं दिलं तर मग त्यांनी दिलं तर काय झालं असा सवालही एकनाथ खडसे यांनी केला. 
मी कोणत्याही अपेक्षेने राष्ट्रवादीत आलो नाही. जेवढं भाजपाचं निष्ठेने काम केलं त्यापेक्षा जास्त राष्ट्रवादीचं काम करु. पाठीशी भक्कम राहिलात तर मी कुणाला घाबरत नाही असा विश्वासही एकनाथ खडसे यांनी दिला. 
शंभर टक्के पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य आले आहेत. पुढच्या निवडणुकीत आमची काय ताकद आहे हे दाखवून देवू असे जाहीर आव्हान एकनाथ खडसे यांनी यावेळी दिले. 
कार्यकर्त्यांची अपेक्षा होती राष्ट्रवादी येण्याची तशीच इच्छा दिल्लीतील वरिष्ठांनीही माझ्याशी व्यक्त केली आणि मला राष्ट्रवादीत जाण्याचा सल्लाही दिल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला. यापुढच्या काळात जळगावात सागर मैदानावर राष्ट्रवादीचा मोठा कार्यक्रम घेवू असे जाहीर निमंत्रण एकनाथ खडसे यांनी शरद पवारसाहेबांना दिले. 
आज डोक्यावरचं ओझं कमी झालं आहे. हलकं हलकं वाटत आहे असा रिलॅक्सपणा व्यक्त करतानाच खोट्या केसेस कशा दाखल करण्यात आल्या त्यातून आता बाहेर आलो आहे. माझ्यावर भूखंडाच्या चौकशा लावल्या गेल्या. आता थोडे दिवस जावू दे कुणी किती भूखंड घेतले हे दाखवून देतो असे जाहीर आव्हान एकनाथ खडसे यांनी दिले. 
मी राजकीय जीवनातून संपलो होतो. तुम्ही ज्येष्ठ आहात आता पक्षाला मार्गदर्शन करा असे भाजपचे लोक सांगत होते. पण निर्णय झाला होता. आता वर्षभराच्या आत बदल दिसेल असा विश्वासही एकनाथ खडसे यांनी यावेळी दिला. 

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या सोबत नंदुरबार तळोदाचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे - खेवलकर, बोदवडचे कृउबा सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळच्या सभापती मनिषा पाटील, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सुर्यवंशी, जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्षा मंदाताई खडसे, मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी,औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे आदींनी प्रवेश केला. 



या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे,माजी मंत्री गुलाबराव देवकर, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, अनिल गोटे आदी मान्यवर उपस्थित होते.जयंत पाटील यांनी यावेळी भाजप नेते एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागत केले. माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies