नुकसानग्रस्त शाळा या शिक्षण मंदिरांचा जिर्णोध्दार करण्याची ग्रामस्थांची मागणी
रविंद्र कुवेसकर-उतेखोल/माणगांव
उतेखोल गावातील श्री वाकडाई होळीच्या माळावरील जिल्हा परिषदेच्या गिरीजनवाडी प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडीच्या वास्तुंची निसर्ग चक्रीवादळात छप्पर उडून मोठी पडझड झाली आहे. शाळेवरील संपूर्ण पत्रे उडून लोखंडी फ्रेम मोडल्या, वाकल्या आहेत. तसेच मुसळधार पडणाऱ्या पावसाने बांधकाम तुटफूट व संपूर्ण रंगहिन व आतील जमिन लाद्या जिर्ण झाल्या. शाळेचे रेकाॅर्ड फाईल तसेच स्टेशनरी, प्रोजेक्टर, कपाटं, शैक्षणिक मार्गदर्शक फलक, चित्रे इत्यादी गोष्टींचे खुप मोठे नुकसान झाले आहे. या जिल्हा परिषद शाळेचा अर्थात शिक्षण मंदिराचा संपूर्ण नव्याने जिर्णोध्दार करण्याची येथिल ग्रामस्थांची मागणी आहे.
या आधी कोरोना संकटाने विद्यार्थ्यांचे शालेय वर्ष फुकट गेल्यात जमा आहे. सध्या तात्पूरते विद्यार्थ्यांचे नुकसान टळावे व शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शनासाठी जवळील महादेव कोळी डोंगर कोळी समाज मंदिरात विद्यार्थ्यांना बसविण्यासाठी सोय उपलब्ध करुन दिल्याची माहीती समाज मंदिराचे अध्यक्ष अनंता थळकर यांनी दिली. जवळपास पाच महिन्यांचा कालावधी उलटला, आता तरी या कडे संबंधित प्रशासनाने लक्ष वेधावे कारण आता हे वर्ष संपायला दोनच महिने शिल्लक आहेत. नविन वर्षाच्या मुहुर्तावर "पुनश्च हरिओम, मिशन बिगीन अगेन" प्रमाणे शाळा सुरु करायचा निर्णय झालाच तर मग या ठिकाणच्या शालेय विद्यार्थ्यांना कुठे बसविणार ? असा सवाल ऐरणीवर आला आहे.
गिरीजनवाडी शाळा ही गेली अनेक वर्ष निवडणूकीचे महत्वाचे मतदान केंद्र म्हणुन देखिल ओळखली जाते. नगरपंचायत निवडणुकही जवळ आली आहे या दोन्ही पार्श्वभुमीवर प्रभागातील नगरसेवक जयंत बोडेरे यांना विचारले असता शाळेच्या झालेल्या नुकसान संदर्भात नुकतेच पालकमंत्री ना. आदिती तटकरे या श्री वाकडाई देवी मंदिर येथे दर्शनासाठी आल्या असता त्यांना माहीती दिली आहे. व त्यांनी संबधित प्रशासनाचे अधिकारी यांना सूचना दिल्याचे सांगितले. तालुक्यात तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणीही असेच शालेय मंदिरांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. आता या शिक्षण मंदिराचा जिर्णोध्दार कधी होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.