विद्यापीठ अधिनियम सुधारणा समितीवर अॅड. हर्षद भडभडे
यांची नियुक्ती
ओंकार रेळेकर-चिपळूण
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६मध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक समिती गठीत केली असून या समितीमध्ये चिपळूणचे सुपुत्र व मुंबई उच्च न्यायालयाचे नामांकित वकील हर्षद भडभडे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात या समितीचे अध्यक्ष असतील. जागतिकीकरणाच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी व देशाची प्रगती होण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण याचा दर्जा उंचावणे गुणवत्ता वाढवणे, त्यांचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे, तसेच राज्यपाल तथा कुलपती विविध लोकप्रतिनिधी व विद्यार्थी संघटना यांच्याकडून विद्यापीठाच्या अधिनियमात दुरुस्ती करण्याबाबत मागणी करण्यात येत होती. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६अन्वये कामकाज करताना विद्यापीठ, महाविद्यालये यांना अडचणी उद्भवत असल्याचे निदर्शनास आले, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ या अधिनियमात दुरुस्ती करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार ही समिती गठीत करण्यात आली असून महाराष्ट्र राज्याचे उपसचिव अ. म. बाविस्कर यांनी या समितीची घोषणा केली. समितीने सध्या अस्तित्वात असलेल्या अधिनियमातील सर्व कलमांचा अभ्यास करून सुधारणा करणे आवश्यक असून सुधारित नवीन अधिनियम हा केंद्र शासनाच्या सुधारित शैक्षणिक धोरणाची सुसंगत असावा, तसेच या समितीने तीन महिन्यात शासनाला आपला अहवाल सादर करावयाचा आहे.