पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या "धडाडी पथकाच्या"
कामगीरीने गुन्हेगारी क्षेत्रात धाबे दणाणले
20 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात
मिलिंद लोहार-पुणे
चेतन फक्कड दंडवते (वय 28, रा. मलठण-आंब्रेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (वय 25, रा. जि. जळगाव. सध्या रा. अकोले, शिरुर), अक्षय शिवाजी काळे (वय 25, रा. पाचर्णे मळा, ता. शिरुर), संजिवकुमार बन्सी राऊत (वय 44, रा.झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (वय 31, रा. मुजफ्फरनगर. सध्या रा. नोएडा) अशी सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती पाहता पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा तपास पथके स्थापन केली. त्यामध्ये पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, सहाय्यक निरीक्षक राम गोमारे, अंबरीश देशमुख, प्रशांत महाले आणि उपनिरीक्षक चामले यांचा समावेश होता.
या पथकांनी वेगवेगळ्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली. या पथकांनी सुरुवातीला किरण राजगुरू, अशोक संकपाळ, किरण काळे या आरोपींना अटक केली. त्यांनी या गुन्ह्यातील ड्रग्ज हे रांजणगाव येथील संयोग बायोटेक प्रायवेट लिमिटेड या कंपनीत बनवले असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ड्रग्ज बनवण्याच्या मशिनरीसह कंपनी सील केली आहे.
या प्रकरणात मुख्य सूत्रधार तुषार सुर्यकांत काळे (रा. बोरीवली) आणि राकेश श्रीकांत खानिवडेकर उर्फ रॉकी (रा. वसई) हे असल्याचे समोर आले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सहा पथकांनी कांदिवली, मुंबई, वसई, पालघर, नाशिक, नवी मुंबई कर्जत आणि सहारा विमानतळ, मुंबई येथे सात दिवस पहारा देत दोन्ही सूत्रधारांना ताब्यात घेतले. या दोन्ही सूत्रधारांचा एनसीबीची पथके देखील शोध घेत आहेत. मात्र, एनसीबीच्या अगोदर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्यासोबत पोलिसांच्या हाती एक नायजेरियन व्यक्ती देखील आला. या नायजेरियन व्यक्तीचा देखील या प्रकरणात समावेश आहे. झुबी इफनेयी उडोको असे या नायजेरियन व्यक्तीचे नाव आहे. झुबी एका अमली पदार्थांच्या प्रकरणात कोल्हापूर कारागृहात दहा वर्ष शिक्षा भोगून आला आहे. त्याने त्याच्या व्हिजा मध्ये देखील छेडछाड केली आहे. त्याबाबत त्याच्यावर स्वतंत्रपणे कारवाई केली जात आहे.
सुरुवातीला अटक केलेला आरोपी अक्षय काळे, चेतन दंडवते, आनंदगीर गोसावी यांनी डिसेंबर 2019 मध्ये तुषार सुर्यकांत काळे, किरण राजगुरू, कुलदीप इंदलकर, ऋषिकेश मिश्रा, जुबेर मुल्ला यांच्या मदतीने रांजणगाव एमआयडीसीमधील संयोग बायोटेक लिमिटेड या बंद असलेल्या कंपनीत सुमारे 132 किलो एम डी ड्रग्ज बनवले होते. त्यातील 112 किलो एम डी ड्रग्ज हे तुषार काळे याने यापूर्वीच नेऊन त्याची बाजारात विक्री केली होती.
राहिलेले 20 किलो ड्रग्ज हे अक्षय काळे याने त्याच्या घरी ठेवले होते. त्याची विक्री करण्यासाठी जात असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चाकण-शिक्रापूर रोडवर सापळा लाऊन त्यांना अटक केली होती.
किरण काळे हा रांजणगाव एमआयडीसी मधील एका दुस-या कंपनीत संचालक म्हणून काम करत आहे. त्याने यासाठी अक्षय काळे, चेतन दंडवते, आनंदगीर गोसावी, किरण राजगुरू व तुषार काळे यांना अशोक सपकाळ यांची बंद पडलेली कंपनी एम डी ड्रग्ज बनवण्यासाठी उपलब्ध करून दिली होती.
यासाठी किरण काळे याने त्याच्या कार्यालयात आरोपींसोबत मिटिंग घेऊन एक किलो ड्रग्ज बनवण्यासाठी 60 हजार रुपये असा दर ठरवला होता. तुषार काळे याने त्या बदल्यात एकूण 67 लाख रुपये दिले होते. या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याने पोलिसांनी सर्व आरोपींची बँक खाती फ्रीज केली आहेत.
आरोपी तुषार सुर्यकांत काळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खंडणी, जबरी चोरी, हत्यार कायद्याचे एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. त्याचा मुंबईतील कुख्यात छोटा राजन या गुन्हेगारी टोळीशी संबंध आहे.
रांजणगाव एमआयडीसीमध्ये बनवलेल्या 132 किलो इमडी ड्रग्ज पैकी 112 किलो ड्रग्ज तुषार सुर्यकांत काळे याने नायगाव वसई येथे राहणा-या जुबी उकोडो नावाच्या नायजेरियन व्यक्तीला विकले होते. तुषार काळे याला राकेश खानिवडेकर याने ड्रग्ज बनवणे, विकणे आणि पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली आहे. राकेश हा एमडी ड्रग्ज रॅकेट मधील प्रमुख सूत्रधार असून त्याला यापूर्वी डी आर आय च्या अधिका-यांनी पालघर येथील एका कंपनीत अमली पदार्थ बनवण्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
तुषार काळे आणि राकेश खानिवडेकर यांच्याकडून ड्रग्ज विक्रीतून आलेले 85 लाख रुपये रक्कम जप्त केली आहे. तुषार काळे याने पालसाई, ता. वाडा, जि. पालघर येथे 75 लाख रुपये किमतीची दोन एकर जागा विकत घेतल्याची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. ती शेतजमीन ड्रग्ज विक्रीच्या पैशांतून घेतली असल्याने ती मालमत्ता देखील ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. तुषार काळे त्या जमिनीवर स्वतःची एक कंपनी सुरु करणार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तुषार आणि राकेश यांनी आणखी तीन ठिकाणी एमडी ड्रग्ज बनवले आहेत. त्याबाबत देखील पोलिसांचा तपास सुरु आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 20 कोटी 90 लाख 23 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक निरीक्षक राम गोमारे, अंबरीश देशमुख, प्रशांत महाले, उपनिरीक्षक चामले, काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी शाकीर जिनेडी, राजन महाडिक, राजेंद्र बांबळे, प्रदीप शेलार, शकूर तांबोळी, मयूर वाडकर, स्वामिनाथ जाधव, धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, दिनकर भुजबळ, फारूक मुल्ला, गणेश मालुसरे, संतोष दिघे, संदीप पाटील, संदीप ठाकरे, प्रसाद कलाटे, श्यामसुंदर गुट्टे, शैलेश मगर, नितन बहिरट, प्रसाद जंगीलवाड, सावन राठोड, ज्ञानेश्वर गाडेकर, राजकुमार इघारे, अशोक गारगोटे, अजित कुटे, प्रवीण कांबळे, दयानंद खेडकर, दादा धस, गोपाल ब्रह्मांदे, धनंजय भोसले, भरत माने, प्रदीप गुट्टे, पांडुरंग फुंडे, अनिता यादव यांच्या पथकाने केली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ही कामगिरी करणा-या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांचे विशेष पुरस्कार देऊन अभिनंदन केले आहे.