Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

श्रीवाकडाईच्या दर्शनाला रीघ, दार उघड बयेंचा धावा !

 श्रीवाकडाईच्या दर्शनाला रीघ, दार उघड बयेंचा धावा !

रविंद्र कुवेसकर-उतेखोल/माणगांव 


तालुक्यातील जागृत देवस्थान ग्रामदैवत श्रीवाकडाई देवीच्या दर्शनासाठी घटस्थापने पासूनच भाविकांची आतुरता मंदिरा जवळ दररोज सुरक्षित अंतर राखुन बंद देवळातील देवीला डोळे भरुन पाहताना मनभरुन आल्याच्या भावना व्यक्त करीत, आलेले संकट टळू देत, कोरोना राक्षसाचा नाश कर, सगळ्यांना भयमुक्त कर, मोकळाश्वास घेऊ देत ! असे मनोभावे साकडे घालीत दार "उघड बयें दार उघड ! असा धाव करीत भाविकांची लांबूनच दर्शन घेण्यासाठी रीघ लागली आहे.  देवी ही भोयी समाजाचे कुलदैवत असल्याने पुणे येथुन या समाजाचे अनेक भाविक चैत्र पौर्णिमेला तसेच नवरात्र उत्सवात येथे नेहमी दर्शनाला येतात. त्यांची येथे राहण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. 


        देवीच नयनरम्य मंदीर उतेखोल गावाचे वेशीवर एकांतात आहे. श्रीवाकडाई ही जंगलनिवासीनी समजली जाते. देवीचे स्थान असलेला उतेखोल येथील परिसर  पूर्वीच्या काळी असाच वनसंपदेने नटलेला होता. या दिवसात येथिल वाटेवरुन दुतर्फा हिरवी पिवळी सोन्यासारखी शेती न्याहाळंत सकाळी धुक्यातून अनवाणी पायी चालत जाऊन देवीचे दर्शन घेण्यात एक वेगळाच अवर्णनिय आनंद मिळतो मन प्रसन्न होते असे भाविक सांगतात. काही महिन्यापूर्वीच मंदिराचा जिर्णोध्दार झाला असुन सुंदर बांधकाम तसेच रंगकाम करण्यात आले आहे. देवीचा मुखवटा, अलंकार आणि हिरव्या रंगाची साडी, गोंड्याची आणि रानभेंडीची पिवळी, भगवी, पांढर्‍या फुलांनी सजवलेले रुप विलक्षण तेजःपुंज दिसत आहे. 


         येणार्‍या प्रत्येक भाविकांना देवीच्या दर्शनाने समाधान वाटत आहे. महिलांची देवीची खणानारळाने ओटी भरण्यासाठीची लगबग आजही कायम आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत मंदिर परिसरात भक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सध्या नवरात्रौत्सवा निमित्ताने नऊमाळांना नित्य नेमाने येथिल पुजारी रजनिकांत मढवी, नामदेव बोडेरे, लक्ष्मण लांघे हे देवीची पुजाअर्चा मनोभावे पार पाडत आहेत.


माणगांवकरांचे श्रध्दास्थान तसेच नवसाला पावणारी श्री आई वाकडाई देवीचा नवस फेडण्यासाठी अनेक  जोडप्यांची सध्या रीघ दिसून येत आहे. कोणतेही शुभकार्ये असो वा संकट समयी मोठ्या श्रध्देने देवीचा धावा करणार्‍या प्रत्येक भाविकांना देवीने भरभरून दिले असल्याचे अनुभव भाविक सांगतात. माणगांव मधील अनेक दुकानांवर वाहनांवर देवीचा नामोल्लेख ही माणगांवची ओळख आहे. माणगांव मधील अतिशय प्रेक्षणीय स्थळापैकी हे एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies