डॉ माधव जोशी यांचं निधन
गुरुनाथ साटेलकर-खोपोली
जोशी उभयतांच्या आशीर्वाद नर्सिंग होम मध्ये आणि हॉस्पिटलमध्ये कित्येकांना गुण आलाय. रात्री अपरात्री हे दांपत्य रुग्णांच्या इलाजासाठी आणि बाळंतपण सुखकर होण्यासाठी मनापासून काम करताना पाहण्याचा योग आला.
रुग्णांना आपल्या वाहनाने, स्वखर्चाने घरपोच सोडणारे हे डॉक्टर. गोरगरीब आदिवासी बांधवांच्या इलाजासाठी मोफत उपचार आणि पदरमोड करून औषधं ते देत असत.
डॉ माधव जोशींनी मंगल कार्यालय, हॉटेल इत्यादी व्यवसायामध्ये देखील लक्ष घातले होते. कायम हा माणूस बिझी असायचा. आपली डॉक्टरी सोडून डॉ हेमलता जोशी अमेरिकेत आपल्या कन्येकडे गेल्या, खोपोलीला कधीतरी त्यांचे येणे जाणे व्हायचे, मात्र डॉ माधव जोशी मात्र हमखास खोपोलीमध्ये असायचे. ते खोपोलीकरांच्या सुख दुःखात वाटेकरी व्हायचे.
सतत हसतमुख आणि हरहुन्नरी व्यक्तीमत्व असलेल्या डॉ माधव जोशींना दुर्धर आजाराने ग्रासले होते. अनेकांना आपल्या हातून बरे करणाऱ्याचा त्याच आजारात झालेला शेवट मनाला चटका लावून गेला.
खोपोली शहर हे प्रगतीच्या चरमसीमेवर असताना, उद्योगधंदे आणि व्यवसाय तेजीत असताना, नागरिकांच्या हिताची अर्थात आरोग्य विषयक बाजू ठामपणे सांभाळणारे मोजकेच डॉक्टर खोपोली शहरात आपलं योगदान देत होते, त्यांच्यातला एक अग्रणी चिरा आज निखळला असल्याच्या भावना खोपोलीतुन व्यक्त होत आहेत.