आदर्श प्राथमिक विद्यामंदिर शाळेचा प्रबोध शिर्के स्कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्यात चमकला
रविंद्र कुवेसकर -उतेखोल/माणगांव
महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. सन २०१९/२० या शैक्षणिक वर्षात झालेल्या या शिष्यवृत्ती परीक्षेत माणगांव तालुक्यातील आदर्श प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील कु. प्रबोध दत्ताराम शिर्के हा विद्यार्थी उज्वल यश संपादन करून संपूर्ण माणगांव तालुक्यात प्रथम तर रायगड जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाने यशस्वी झाला आहे. त्याचे वडील दत्ताराम शिर्के हे सुद्धा प्राथमिक शिक्षक म्हणून ज्ञानगंगेच्या प्रवाहात आहेत.
प्रबोध यास आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अमोल जंगम तसेच शिक्षिका कांबळे व डांगोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे त्याला त्याचे आई वडील तसेच विठोबा उभारे सर, उणेगांव सरपंच राजू शिर्के, सुभाष केकाणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. प्रबोध हा केवळ अभ्यासातच नव्हे तर सर्व सहशालेय उपक्रमांत अग्रेसर आहे. संपूर्ण माणगांव तालुक्यातून तसेच मित्रपरिवारां कडून, ग्रामस्थांकडून त्याचे तोंडभरुन कौतुक केले जात आहे.