शेतजमिनीची वाटणी मागितली म्हणून भावास मारहाण : एका विरोधात गुन्हा दाखल.
उमेश पाटील -सांगली
शेत जमिनीची वाटणी मागितल्याचा रागातून सख्या भावाला भावाने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना सोमवार दि. ०९ नोव्हेंबर रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास मिरज तालुक्यातील समडोळी येथे घडली. या मारहाणीत भाऊ गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी अभय देवगोंडा पाटील (वय ३९ रा. समडोळी) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून भाऊ अनिल देवगोंडा पाटील (रा. समडोळी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी अभय पाटील व संशयित अनिल पाटील हे दोघे सख्खे भाऊ आहेत. दोघेही आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील समडोळी येथे राहतात. समडोळी गावच्या हद्दीत त्यांची शेतजमीन आहे. फिर्यादी अभय पाटील यांनी त्यांचा भाऊ अनिल पाटील यांच्याकडे शेत जमिनीची वाटणी काही दिवसांपूर्वी मागितली होती. याचा राग अनिल पाटील यांना होता. सोमवार दि ९ रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या घरात टीव्ही बघत बसले होते. त्यावेळी संशयित हे त्यांच्या हातात लाकडी दांडके घेऊन शेत जमिनीची वाटणी मागतोस का असे म्हणत फिर्यादी यांना दांडक्याने पायावर, मांडीवर व दंडावर मारहाण करून वळ उठेपर्यंत मारले आहे. फिर्यादी हे त्यांना मला मारू नका असे म्हणत असतानाही संशयित अनिल पाटील यांनी त्यांना दांडक्याने व हाताने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या आई या सोडवण्यासाठी आल्या असता त्यांना ही संशयिताने ढकलून देऊन घरातून निघून गेला असल्याची फिर्याद अभय पाटील यांनी पोलिसात दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी संशयित अनिल पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास आता पोलीस करत आहेत.
------------------
विश्रामबाग मध्ये घरफोडी : टीव्ही, सोन्याचांदीच्या दागिन्यांसह २१ हजारांचा मुद्देमाल केला लंपास.
विश्रामबाग परिसरात असणाऱ्या अण्णासाहेब पाटील नगर येथे एका घरातील कुटुंबीय गोकाक येथे गेले असता बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील ७ हजार रुपये व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सादर चोरीची घटना हि दि. ०७ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान घडली. या चोरी प्रकरणी रमूला मीट्टसाब कटकेवाडी (वय ४० रा. विश्रामबाग) यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रमूला कटकेवाडी हे विश्रामबाग परिसरातील अण्णासाहेब नगर येथे आपल्या कुटुंबियांसह राहतात. दि. ०७ नोव्हेंबर रोजी घरातील सर्व लोक हे सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास गोकाक जवळील शिंदीकुट येथे लग्नासाठी गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने बंद घरावर पाळत ठेऊन घराला लावलेलं कुलूप उचकटून आत प्रवेश करत घराच्या कपाटात ठेवलेले ७ हजार रुपये, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एलईडी टीव्ही लंपास केला. दुसऱ्या दिवशी लग्न आटोपून रमूला कटकेवाडी हे जेंव्हा रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी परत आले तेंव्हा त्यांच्या घराचे कुलूप तुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी घरात जाऊन पहिले असता घरातील टीव्ही, कपाटातील दागिने आणि पैसे लंपास झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती विश्रामबाग पोलिसात दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. विश्रामबाग परिसरात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
------------------
गुलमोहर कॉलनीत चोरट्यांनी घर फोडले, ११ हजार रोख, मोबाईल, घड्याळ, कागदपत्रे केले लंपास.
सांगली शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर असणाऱ्या एका घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी ११ हजार रुपये रोख, मोबाईल, महागडे घड्याळ यासह महत्वाची कागदपत्रे लंपास केली. सादर चोरीची घटना हि बुधवार दि. ११ रोजी साडे पाच ते सात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी विशाल लालचंद शंभवानी (वय ३०) यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, विशाल शंभवानी हे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर राहतात. सोमवार दि. ११ नोव्हेंबर रोजी ते घरामध्ये झोपले असताना त्यांच्या घरातील एका व्यक्तीने बाहेरून कडी लावून गेल्या होत्या. त्याचवेळी अज्ञात चोरट्याने घरात घुसून रोख रक्कम ११ हजार रुपये, एक मोबाईल, महागडे घड्याळ, पॅनकार्ड, लायसेन्ससह महत्वाची कागदपत्रे लंपास करत पोबारा केला. विशाल लालचंद शंभवानी जेंव्हा जागे झाले तेंव्हा त्यांचा मोबाईल, घड्याळ व रोख रक्कम लंपास झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कुटुंबियांना आल्यानंतर विचारले असता त्यांनाही याची कल्पना नव्हती. अखेर त्यांनी सांगली शहर पोलिसांना चोरीची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या चोरी प्रकरणी विशाल लालचंद शंभवानी (वय ३०) यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास आता पोलीस करत आहेत.
---------------------
आकाशवाणी जवळ घरात चोरी : चांदीचे दागिने केले लंपास.
कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी जवळ असणाऱ्या ठोमके प्लॉट मध्ये एका बंद घरात चोरट्यांनी घुसून चांदीचे ६ हजार २०० रुपयांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी गणेश निळकंठ ठोमके (वय ४०) यांनी सांगली शहर पोलिसात चोरीची फिर्याद दिली आहे. ठोमके हे दि. १२ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या दरम्यान बाहेर गावी गेले होते. याच वेळी घरातील चांदीचे दागिने, फिल्टर व गॉगल असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणी अधिक तपास आता शहर पोलीस करत आहेत.