*‘माझा भास्कर आला आहे काय?’* - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Thursday, November 12, 2020

*‘माझा भास्कर आला आहे काय?’*

 ‘माझा भास्कर आला आहे काय?’

 ओंकार रेळेकर-चिपळूण


भास्करराव जाधव यांचा वरचा स्वभाव सर्वांना दिसतो पण, त्यांचं हळवं अंतर्मन खूप कमी जणांना माहित आहे. मध्यंतरी त्यांच्या पायाला झालेली दुखापत, त्यानंतर झालेल्या निवडणुका आणि गेल्या आठ महिन्यांपासून असलेला कोरोनाचा काळ असे जवळपास दीड वर्षांनंतर काल ते रत्नागिरीमध्ये गेले होते. यावेळी आठवणीने आणि आवर्जुन त्यांनी शिवसेनेचे जुने-जाणते, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेबांचे लाडके शिवसैनिक, माजी आमदार श्री. आप्पा साळवी यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.

भास्करराव त्यांच्या घरी पोहोचले आणि जेव्हा आप्पांना त्यांच्या कुटुंबियांनी ‘भास्करराव जाधव आले आहेत’ असे सांगितले तेव्हा नव्वदीतले आप्पा ‘माझा भास्कर आला आहे काय?’ म्हणत काठीच्या आधाराने बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद उमटला होता. भास्कररावांना पाहताच तो अधिकच ओसंडून वाहू लागला. आप्पांसोबत त्यांच्या पत्नीसुध्दा आल्या. भास्कररावांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली तेव्हा ‘अजून मी ठणठणीत आहे’ असे म्हणत काही जुन्या आठवणी त्यांनी ताज्या केल्या. त्यात १९९५ सालची एक आठवण त्यांनी सांगितली. ते म्हणाले, ९५च्या निवडणुकीत मला शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. पण, नंतर ती रद्द करण्यात आल्याचं मला कळलं. त्यावेळी मी तुझ्याच (भास्कररावांच्या) घरी होतो. मी जेव्हा ही बातमी सांगितली तेव्हा तु मला मुंबईत जाण्याचा सल्ला दिलास. लगेच गाडीची व्यवस्था करून दिलीस, थंडीचे दिवस होते म्हणून स्वेटर दिलास आणि थोडे पैसे देवून मला मुंबईला पाठवलेस.. त्यामुळे मी बाळासाहेबांना भेटू शकलो आणि त्यानंतर मलाच उमेदवारी देण्याचा पुन्हा निर्णय झाला. मी निवडून आलो, आमदार झालो.. आज हक्काची पेन्शन येते. आज तीच माझ्या म्हातारपणाची काठी आहे..

शिवसेनेच्या या दोन शिलेदारांमध्ये बराच वेळ गप्पा रंगल्या.. भास्करराव घरी आल्याचा आप्पांना कोण आनंद झाला होता. कुटुंबियांनाही त्याचे अप्रुप होते.

No comments:

Post a Comment