Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

स्वयंशिस्त पाळून सुरक्षित अंतर ठेवा आणि मास्क वापरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन

 स्वयंशिस्त पाळून सुरक्षित अंतर ठेवा आणि मास्क वापरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन

महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई


महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर असून मला कोणताही लॉकडाऊन करायचा नाही पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.आज ते समाज माध्यमांवरून  राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते.

ते म्हणाले की, मला राजकारण करायचे नाही. पण कोरोना वाढला तर हे उघडा ते उघडावाले या परिस्थितीची जबाबदारी घेणार का? असा सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले की पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे देखील उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. आजपासून ४ दिवसांनी मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण होतील. शूरवीर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच कमांडोज यांनी प्राणपणाने अतिरेक्यांशी सामना केला. आजही  आपण काही महिन्यांपासून या कोविड नावाच्या छुप्या दहशतवाद्याशी कडवा मुकाबला करतो आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपले सण, उत्सव थांबलेले नाहीत. उत्तर भारतीयांची छट पूजा झाली. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे आपण सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करावे असे विनम्र आवाहन मी वारकरी बंधू भगिनींना करतो आहे.

यंदा दसऱ्याला शिवसेनेचा मेळावा देखील शिवतीर्थावर मोठेपणाने साजरा न करता साधेपणाने केला, मी आपला मुख्यमंत्री आहे त्यामुळे लोका सांगे ब्रह्मज्ञान असे असू नये म्हणून नियम माझ्यापासून काटेकोरपणे पाळले नाही तर तुम्हाला काही सांगायचा अधिकार नाही.  दिवाळीत फटाके वाजवू नका असे मी सांगितले आणि आपण माझे ऐकले आणि यंदा खूप कमी फटके उडाले. प्रत्येक गोष्टींसाठी कायदे करण्याची गरज नाही असेही ते म्हणाले. 

https://youtu.be/I1VPijEFk8M

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविताना यंत्रणेतील सर्व लोकांनी अफाट काम केले आहे. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जन जागृती करणे हे साधेसुधे काम नाही. या मोहिमेचा हेतू केवळ चौकशी करणे नाही तर आरोग्य नकाशा तयार करणे आहे. यामध्ये आपल्याला किती जणांना सहव्याधी आहे ते कळले. या सर्वांशी यंत्रणेतील लोकांनी एक जिव्हाळा दाखवून  संपर्क साधणे व चौकशी करणे महत्वाचे आहे. 

मला काहीशी नाराजी व्यक्त करायची आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  आपण कोरोना रुग्णांचे आकडे खाली आणले पण दिवाळी आणि नंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे तसे होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट नाहीसे झालेले नाही तर पाश्चिमात्य देशात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन लावले गेले आहे. दिल्लीत दुसरी तिसरी लाट आली आहे.  गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे. ही नुसती लाट नाही तर त्सुनामी आहे कीकाय असे वाटतेय. आपल्याकडे वैद्यकीय यंत्रणा तयार आहे पण त्यावर किती ताण टाकायचा याला काही मर्यादा आहेत. कृपा करून सगळं उघडे केले म्हणजे कोरोना गेला आहे असा अर्थ होत नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्यांना आहे. आजपर्यंत आपण त्यांना सांभाळून होतो. आता कोरोनाचा संसर्ग तरुणांमध्ये वाढतोय आणि त्यांच्या माध्यमातून घराघरातल्या ज्येष्ठ मंडळीपर्यंत होतोय हे निश्चितच खूप धोकादायक आहे.  आज आपल्या हातात लस नाही, कधी येईल ते सांगता येत नाही. आली तरी राज्यातल्या सर्व लोकांना अगदी दोन डोस द्यायचे म्हटले तरी २४ ते २५ कोटी जनतेला द्यावी लागेल.  

त्यामुळे केवळ मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा, हात धूत राहणे हीच त्रिसूत्री आहे. 

कोविडनंतर रुग्ण  खडखडीत बरे सुद्धा होत आहेत पण पण पोस्ट कोविड दुष्परिणाम सुद्धा दिसताहेत. आपण कशासाठी विषाची परीक्षा बघायची असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि,  . आपण शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन सावधपणे पावले टाकत आहोत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies