दिवाळीतील किल्यांचा आनंद..एक समृद्ध परंपरा !
संतोष सुतार-माणगाव
सणांचा राजा म्हणून दिवाळी सणाला अनन्य साधारण महत्व आहे. लहान- थोर ,स्त्रिया -पुरुष,वृद्ध सर्वानाच या सणाने सामावून घेतले आहे. सर्वांच्याच आनंदाचा विचार या सणाने केला आहे.
दिवाळी म्हटले की आठवते खाऊ,फराळ,चकल्या, नवीन कपडे,फटाके आणि किल्ले.दिवाळीतील सर्वांच्याच आणि खास करून बालगोपालांच्या आनंदाचा भाग म्हणजे दिवाळी निमित्ताने गावोगावी, शहरात आणि गलोगली लहान तरुण बांधत असलेल्या किल्यांच्या प्रतिकृती होत.
रायगडात किल्यांची परंपरा फार मोठी आहे. साक्षात दुर्गदुर्गेश्वर स्वराज्याची राजधानी रायगड या जिल्ह्यात आहे.त्यामुळे गड किल्यांच्या सहवासात रमणाऱ्या रायगडातील बालगोपालांना या किल्यांचे आकर्षण अगदी उपजतच आहे.माती ,विटा, दगड जमा करून दिवाळीपूर्वी बांधले जाणारे हे किल्ले म्हणजे आनंदाच्या, प्रकाशाच्या सणातील सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
संपत्ती, समृद्धी, सत्ता आणि प्रगतीचे प्रतीक म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीत किल्याना महत्वाचे स्थान आहे. घराबाहेर अंगणात बांधले जाणारे हे किल्ले शालेय मुलांच्या भावविश्वातील आनंदाचा ठेवा आहे.दिवाळी सुरू होण्यापूर्वी अनेक घरातून यावर्षी कोणता किल्ला बांधायचा म्हणून चर्चा केली जाते. शिवरायांच्या गडकिल्यांची पुस्तके ,मासिके शोधली जातात.किल्याचा आकार, भव्यता लागणारे साहित्य याचा विचार केला जातो आणि सुरू होतो बालगोपाळांचा उत्साह.अगदी तहान भूक हरवून ,चिखल मातीची पर्वा न करता अनेक चिमुकले हात किल्ला बांधण्यात मग्न होतात .विटा रचणे,चिखल मातीने त्या थापणे ,किल्यातील महत्वाच्या बाबी दर्शविणे व त्याला आकार देणे यामध्ये गुहा ,बुरुज ,महाल अशा बाबींचा समावेश असतो.
रायगडात साधारणपणे तीन प्रकारचे किल्ले बांधले जातात-१)भुईकोट म्हणजे सपाटीवरील किल्ला,२)गिरीदुर्ग म्हणजे डोंगरावरील किल्ला ३)जलदुर्ग म्हणजे पाण्यातील किल्ला होय.सह्याद्रीच्या कडेकपारीत राहणाऱ्या रायगडातील बालगोपाल जास्तीत जास्त डोंगरी किल्ले बांधण्याला पसंती देतात. उपजतच डोंगरदर्यात राहणाऱ्या मुलांना डोंगरांचे आकर्षण नसेल तर नवलच ?रायगडातील नवपिढीला या किल्यांचे आकर्षण आहे आणि ते दिवाळीच्या निमित्ताने दिसून येते.अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिवाळीतील ही किल्ले परंपरा सुरू आहे. आज आधुनिक काळातही तंत्रज्ञानाचे अनेक खेळ आले तरी किल्ले बनविण्याची ही परंपरा कायम अबाधित आहे.
*ऐतिहासिक वारसा जतनाचे काम-दिवाळीतील किल्ले बांधणे म्हणजे नुसता खेळ नव्हे, मनोरंजन नव्हे की कल्पना नव्हे-तर या कृतीतून महाराष्ट्रातील ऐतिहासिक पराक्रमाचा वारसा जतन आणि संवर्धन करण्याचे काम याद्वारे अनेक वर्षे पिढ्यानपिढ्या केले जात आहे.छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील महत्वाचे स्थान असलेले हे किल्ले महाराष्ट्राचा इतिहास कथन करतात आणि त्यातून प्रेरणा देण्याचे घेण्याचे काम सतत होत आहे. लहान मुले ,जेव्हा एखाद्या किल्याची प्रतिकृती उभो करतात तेव्हा त्या किल्याचे भौगोलिक, ऐतिहासिक महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करतात .आपण हाच किल्ला का बांधतोय याची असणारी जिज्ञासा ही लहान मुले पूर्ण करतात. आणि त्यातूनच इतिहासाचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतो.
गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या पराक्रमाची शॉर्याची गाथा आहेत.त्यातील भव्यता मनाला स्पर्श करते .लहानगे जेव्हा हे किल्ले बांधतात तेव्हा जिज्ञासा ,नवलाई आणि भव्यतेचा संस्कार त्यांच्या मनावर आपोआप रुजतो.
किल्ला बांधणे म्हणजे प्रत्येक्ष अनुभूतीचा अनुभव .तन ,मन व श्रम एकत्रित करून केलेली कृती म्हणजे किल्याची बांधणी होय.या बांधणीत जिवंतपणा आणण्याचे काम गेली अनेक शतके रायगडातील अनेक पिढ्या आनंदाने करीत आहेत.किल्ला बांधून झाल्यावर त्यावर केली जाणारी मांडणी ही सुद्धा अत्यन्त महत्वाची असते.यामध्ये विचारपूर्वक सजावट असतेच त्याबरोबर सिंहासनावर छत्रपती शिवरायांना विराजमान करून राजांना दिली जाणारी सलामी म्हणजे इतिहासाचा जिवंत अनुभव होय.याशिवाय मावळे,सैनिक ,तोफा ,जंगली प्राणी आणि किल्यावर केलेली जंगलाची कल्पना म्हणजेच एकाच वेळी ऐतिहासिक वारसा समृद्ध आणि जतन करण्याबरोबर पर्यावरण आणि निसर्गाच्या सुरक्षिततेचा दृष्टीकोन रुजविण्याचा सर्वात मोठा संस्कार होय.आणि तो या दिवाळी सणातील किल्यांच्या कृतीतून होत असतो.
*संस्कारांची बांधणी- दिवाळीतील किल्ले बांधणी करणे म्हणजे संस्कारांची बांधणी असते.रुजवणूक असते.किल्ला बांधताना अनेक मित्र मैत्रिणी एकत्र येऊन बांधकाम करतात.त्यातुन त्यांच्यात एकत्वाची भावना वाढीस लागते.मैत्रीची भावना दृढ होते.समूहमन तयार होते .किल्यावरील कोणती गोष्ट कोठे दाखवावी याचा विचार सर्व मिळून करतात.त्यातून निर्णक्षमता विकसित होते. यानिमित्ताने विविध किल्यांचा अभ्यास केला जातो. चर्चा केली जाते. आधुनिक युगात आंतरजालाचा वापर करून हुबेहूब किल्ला निर्माण करण्याचा प्रयत्न करताना किशोरवयीन दिसतात.यातूनच किल्यांचा इतिहास ,पराक्रम, वीरांची गाथा नव्या पिढीला समजत आहे. किल्यावरची हिरवाई निर्माण करताना घेतले जाणार श्रम धान्याची पेरणी आणि किल्याची काळजी घेणे या कृतीतून आपोआप होणारी व्यक्तिमत्वाची जडणघडण ही कोणत्याही व्यक्तिमत्त्व शिबिरातील उपस्तिथीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.
दिवाळीतील ही किल्ले परंपरा महाराष्ट्र आणि रायगडची गौरवशाली परंपरा आहे. शालेय वयात हा करावयाचा संस्कार आहे.आज पिढी बदलली,आधुनिकता आली तरी दिवाळीतील किल्ले बनविण्याची ही परंपरा अबाधित आहे.तिचे महत्व ना कमी होत आहे ना त्यातील आनंद .प्रत्येक वर्षीच्या दिवाळीत किशोरवयीन त्याच उत्साहाने,जोमाने आणि आनंदाने किल्ले बांधतात आणि इतिहासाचा जिवंतपणा अनुभवतात.छत्रपती शिवराय आपल्या सवंगड्यांसह लुटुपुटूच्या लढाई करीत ,किल्ले बांधणीचा खेळ करीत तीच परंपरा यानिमित्ताने दिवाळीत जतन होते आहे.हा आनंद मागील अनेक पिढ्यानी घेतला आहे आणि येणाऱ्या अनेक पिढ्या घेत राहतील .
आधुनिकतेचा स्पर्श:-काळ बदलला तरी दिवाळीतील किल्यांची परंपरा कायन आहे. आधुनिक युगातील संकल्पना त्यात समाविष्ट होत आहेत तयार मूर्ती ,किल्यांच्या प्रतिकृती आकर्षणाचा विषय होऊन त्यांची खरेदी केली जाते आहे .डिजिटल तंत्रज्ञांन वापरले जाते आहे. कागद पुठयांचा वापर केला जात आहे.विविध रंग आणि बाजारातील विविध खेळणी यांचा सजावटीसाठी वापर वाढला आहे .घरोघरी बांधले जाणारे किल्ले आज आधुनिक युगात स्पर्धेचा विषय होत असून किशोरांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी त्यांच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत .मोठ्या शहरातून अशा स्पर्धाचें आयोजन केले जाते आहे.
बाल तरुणांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी आणि प्रत्येक्ष जिवंत इतिहास मांडणारी ही कला आधुनिक काळातही विरत्वाचा वारसा सांगत आहे.आणि सर्वांच्या आनंदाचा भाग होत आहे. यातच या कलेचे यश आहे.आधुनिक मावळे आणि हिरोजी इंदुलकर या कलेतूनच निर्माण होणार आहेत.
फोटो ओळ - रायगड जिल्ह्यातील बच्चेकंपनीची किल्ले बनविण्याची लगबग सुरू आहे. (छाया - संतोष सुतार, माणगाव)