Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पोलीस यंत्रणेच्या माणुसकीचे प्रेरणादायी उदाहरण

पोलीस यंत्रणेच्या माणुसकीचे प्रेरणादायी उदाहरण

गुरुनाथ साटेलकर


आपण नेहमीच पाहतो की, पोलीस यंत्रणेचे काम कोणाला अटक केली तर, चौकशी न करता सोडून दिले तर, काही घेतले तर, काही दिले तर किंवा काहीतरी मसालेदार असेल तरच फक्त चर्चेत येते. एखाद्या अश्या प्रसंगात समाज माध्यमांनी त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष केले गेल्याने यंत्रणेच्या मनात निर्माण  होणारी पोकळी मनाला खंत देऊन जाते.  अश्याच एका घटनेचा परामर्श घेणारा अनुभव.

दिनांक : 7.11.2020

वेळ : सायंकाळी 4.00 वा.

स्थळ : अमृतांजन ब्रिज जवळ. मुंबई पुणे एक्सप्रेस वे.

घटनाक्रम :

मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि जुन्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असताना तो मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील ब्रिजवरून खाली कोसळला, उंचावरून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला, त्याच्या शरीराची हालचाल होत नव्हती. या घटनेचे गांभिर्य ओळखून कोणीतरी खोपोली पोलीस ठाण्यात या संबंधात खबर दिली.

खोपोली पोलीस ठण्याच्या हद्दीतील घटना असल्याने लागलीच त्या ठिकाणी खोपोली पोलीस यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस, आय आर बी पेट्रोलिंग  दाखल झाली. कोणत्याही परिस्थितीत त्या व्यक्तीवर उपचार होणे गरजेचे असल्याने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला ही बाब कळवून ऍम्ब्युलन्सही मागवून घेतली होती. मात्र तोवर काळाने घात केला होता. एवढ्या वरून पडल्यावर डोक्याला टोकदार दगड लागल्याने झालेल्या जखमेमुळे त्या व्यक्तीच्या शरीरातून प्राण पक्षी उडून गेला होता. 

खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनाजी क्षीरसागर, उपनिरीक्षक सतीश आसवर आणि श्रीरंग किसवे यांनी आपल्या कर्मचारी वर्गामार्फत त्या घटनेमागचा क्रम तपासण्यास सुरवात केली. ज्या ठिकाणाहून तो खाली पडला होता तेथे ते पोचले. तेथे त्या व्यक्तीच्या काही वस्तू होत्या. आजूबाजूला केलेल्या चौकशी अंती समजले की, गेले चार पाच दिवस ही व्यक्ती त्या परिसरात वावरत होती. कोणाकडे मागून खात आपलं पोट भरत होती. त्याची कोणतीच स्पष्ट ओळख नव्हती, त्यामुळे ठाव ठिकाणा लागत नव्हता. एकंदर परिस्थितीव वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन मयत व्यक्ती भिकारी आणि मंदबुद्धी असावी हा निष्कर्ष काढला गेला. कारण परिस्थितीजन्य पुराव्यावरून तो ज्या ठिकाणी पुलाच्या कठड्यावर बसला होता तेथे सामान्य माणूस बसूच शकला नसता. तेथून तोल गेल्याने तो कोसळला होता.

तो भिकारी जरी असला तरी तपासकार्य करणं क्रमप्राप्त होतं. कोणी नातेवाईक किंवा संबधित नसतांना त्याची पूर्ण जबाबदारी पोलीस यंत्रणेवर येऊन पडली होती. ती निभावताना ते कमी पडले नाहीत. त्या ठिकाणचा स्पॉट पंचनामा, मृतदेहाचा इंनक्वेस्ट पंचनामा, आजूबाजूच्या लोकांचे जाबजबाब घेतले आणि ते प्रेत खोपोली पालिका रुग्णालयात पुढील तरतुदींसाठी आणले गेले. शवविच्छेदन, बेवारस म्हणून अंत्यविधीसाठीची तरतूद, त्यासाठी असलेल्या किचकट असल्या तरी आवश्यक असलेल्या प्रक्रिया, त्यानुसार करावी लागणारी आर्थिक पदरमोड, अजून काही धागेदोरे भेटतात का ? याचा शोध घेणं,  हे आपसूकच आलं होतं. 



अशा घटनेत निनावी, अज्ञात, फिरस्ता असलेल्या माणसाचे पालक पोलीसच असतात, तसे ते या घटनेतही यत्किंचितही कसूर न करता जबाबदारी निभावताना दिसत होते.

पोलीस यंत्रणेकडून अपवादात्मक चूक झाली तर रान उठवले जाते ही वस्तुस्थिती असताना, त्याच यंत्रणेकडून अश्या अज्ञात व्यक्तीला अगदी नातलगासारखी मदत करतांना माणुसकीचा लागलेला हातभार डोळ्याआड करणं मला पटणारं नव्हतं म्हणून तो घटनाक्रम शब्दांत मांडला.

अपघातात मदत करताना असंच एखादं उदाहरण आम्हाला प्रेरणादायी ठरतं आणि कर्तव्याची जाणीव करून देतं.

हॅट्स ऑफ टू, खोपोली पोलीस स्टेशन, महामार्ग पोलीस टीम, आर बी पेट्रोलिंग अँड ऑल स्पोर्टिंग पर्सनस्.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies