Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

श्रीराम बोट क्लबच्या माध्यमातून चाफळची पर्यटन भरारी...

 श्रीराम  बोट क्लबच्या माध्यमातून चाफळची पर्यटन भरारी...

    कुलदीप मोहिते कराड

महाराष्ट्रातील अनेक तिर्थक्षेत्रापैकी एक असलेले सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील श्री क्षेत्र चाफळ! प्रभू श्री रामचंद्रांचे भव्य मंदिर असलेल्या या भूमीला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. सतराव्या शतकात समर्थ रामदासांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर या भूमीला धार्मिक आणि ऐतिहासिक वैभव प्राप्त झाले. छत्रपती शिवराय आणि समर्थांच्या भेटीने इतिहासाचे आणखी एक सुवर्ण पान लिहिले गेले.  चाफळ या छोट्याशा परंतु टुमदार गावाच्या मधून उत्तर मांड नदी वाहत असल्यामुळे या गावाला नैसर्गिक सधनता प्राप्त झालेली आहे. समर्थ रामदासांनी प्रतिष्ठापना केलेल्या अकरा मारूती पैकी तीन मारूती या परिसरात आहेत. श्री राम मंदिरा समोर सदैव भक्तीभावाने उभा असलेला दास मारुती आणि मंदिराच्या पाठीमागे संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेला विर मारूती, तसेच मंदिराच्या बाजूला समर्थांची ध्यान गुंफा ही धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. नैऋत्येला दिड किमी अंतरावर छोट्याशा टेकडीवर समर्थ स्थापित 'खडीचा मारूती' आहे. जवळच शिंगणवाडी गावाजवळ छत्रपती शिवराय आणि समर्थांच्या भेटीचे प्रतिक असलेले शिव समर्थ स्मारक आहे. या दोन्ही ठिकाणांच्या मधे रस्त्याच्या बाजूला समर्थांचे कुबडी तिर्थ आहे. 

 आणखी पश्चिमेला पच-सहा किमी गेल्यावर डोंगर कपारीत समर्थांची ध्यान धारणेची अत्यंत निसर्गरम्य अशी रामघळ आहे. हे एक मंत्रमुग्ध करणारे ठिकाण असून, विभागातील या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देत असताना इतिहास प्रत्यक्ष जगत असल्याची अनुभूती येते. सतराव्या शतकातील त्या विलक्षण घटना डोळ्यासमोर उभ्या राहतात. भारत हा  शेतीप्रधान देश आहे, इथला बहुतांश समाज हा अत्यंत दुर्गम, डोंगराळ या सदरात मोडतो. परंतु चाफळ आणि पंचक्रोशीत हुंदडताना या समाज जीवनाशी संवाद साधायला मिळतो.  नितळ,स्वच्छ हवामान आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची श्रीमंती जाणवल्या शिवाय राहत नाही. आताशा रस्ते विकास चांगला झाल्याने या विभागाशी हितगुज साधने खुप सुकर झाले आहे. शिवाय पठारावरील हजारो पवनचक्क्या मनाला भुरळ घालतात.


         ऐतिहासिक भूमी असलेल्या चाफळमध्ये आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे गमेवाडी जवळ उत्तरमांड नदीवर झालेल्या धरण प्रकल्पामुळे . पर्यटकांना आणखी एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. चाफळ मधील श्री उमेश पवार यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन 'श्री राम बोटींग क्लब', पर्यटण सहकारी संस्थेच्या वतीने पर्यटकांसाठी बोटींग क्लबची स्थापना केली आहे. स्पिड बोट, पॅंडल बोट तसेच हाऊस बोट ही अत्यंत दुर्मिळ परंतु अबालवृद्धांना हवीशी वाटणारी साधने त्यांनी अगदी माफक दरात उपलब्ध करून दिली आहेत. दिपावलीच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी या सेवेचा शुभारंभ करून चाफळ विभागातील पर्यटण क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. 

    विभागातील  उमेश पवार, काका पाटील आणि राजेंद्र पवार या तरूणांनी एकत्र येऊन हे आनंददायी व्यावसायीक पाऊल उचलले आहे. प्रचंड उपशाने उन्हाळ्यात कोरडी पडणारी मांड नदी.. परंतु निळ्याशार धरण प्रकल्पामुळे इथलं रूपडं पालटलं आहे. 'श्री राम बोट क्लबच्या' माध्यमातून चाफळ पंचक्रोशीच्या पर्यटण प्रक्रियेला 'चार चॉंद' लागले आहेत. ऐतिहासिक, धार्मिक वारसा असलेल्या या भूमीत आबालवृद्धांना परमानंद देणारे बोटींग पर्यटण हा नक्कीच पर्यटकांना आकर्षित करणारा जवळचा आणि सुरक्षित पर्याय आहे. 

         तसेच  श्री राम बोट क्लबने  सुरक्षेच्या दृष्टीनेही  अनेक उपाय योजना केल्या आहेत . स्त्रिया, मुलींना इथे कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे, तसेच व्यसनाधिनतेला त्या परिसरात थारा दिला जाणार नाही.  सुर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत अगदी दररोज ही सेवा सुरू राहणार आहे. निश्चितच जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील पर्यटकांनी ऐतिहासिक, धार्मिक पर्यटणा बरोबरच सुरक्षित जल विहारासाठी चाफळला एकदा आवश्य भेट दिलीच पाहिजे..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies