Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

येत्या १५ जानेवारी रोजी मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी- निवडणूक अधिकारी रमेश कोळपे

 ग्राम पंचायत निवडणूक घेण्यास प्रशासन सज्ज

  येत्या १५ जानेवारी रोजी मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी-  निवडणूक अधिकारी रमेश कोळपे

         

                  राजेंद्र मर्दाने-चंद्रपूर



  राज्य निवडणूक आयोगाने ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून वरोरा तालुक्यातील ८१ पैकी ७८ ग्राम पंचायतीमधील  ७१६ सदस्यांच्या निवडीसाठी येत्या २३ डिसेंबरपासून  उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून १५ जानेवारीला मतदान तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होईल व त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार रमेश कोळपे यांनी  आज तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले.



          श्री कोळपे पुढे म्हणाले की, तालुक्‍यातील दहेगाव, सालोरी व  अर्जूनी ग्राम पंचायत वगळता इतर ७८ ग्राम पंचायतीच्या निवडणूका होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे तेथे प्रशासकाची नियुक्ती करण्याची वेळ आली होती. आता ' कोव्हीड १९ ' चा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. १४ डिसेंबर रोजी  अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आता त्यापुढील प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे जाहीर  करण्यात आला आहे. 



१) तहसीलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्याची तारीख ( १५ डिसेंबर २०२०), २) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात  तारीख २३ डिसेंबर २०२० ( सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून), ३)उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख (३० डिसेंबर २०२० सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत), ४) उमेदवारी अर्जाची छाननी करण्याची तारीख व वेळ (३१ डिसेंबर २०२० सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत ), ५) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आणि वेळ ( ४ जानेवारी दुपारी ३.०० वाजेपर्यंत), ६) निवडणूक चिन्ह नेमून देण्याची तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख व वेळ ( ४ जानेवारी  २०२१ दुपारी ३.०० वाजता नंतर),  ७) मतदान तारीख १५ जानेवारी २०२१( सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत) ८)  मतमोजणी तारीख १८जानेवारी  ९) जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख ( २१ जानेवारी २०२१)

         निवडणुकीच्या काळात  एकूण १३ निवडणूक निर्णय अधिकारी, १३  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, आवश्यक कर्मचारी व पोलीस यांची संख्या जवळपास १५००, ईव्हीएम मशीन २५५  + २० (राखीव)= २७५  इ.च्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येईल. निवडणुकीच्या काळात कोरोना संबधित नियमांचे तसेच आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करुन निवडणूक घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.         

           २०११ च्या जनगणेनेनुसार ७८  ग्राम पंचायतीची लोकसंख्या १ लाख ३९ हजार ३५७ असून मतदार संख्या ९७ हजार ४६६ आहे.  एकूण २४१ प्रभागातून ७१६ उमेदवार निवडून येणार असून यात अनुसूचित जाती पुरुष - ४४, स्त्री - १८, अनुसूचित जमाती पुरुष १५३,  स्त्री - ८७,   इमाप पुरुष - १६४, स्त्री - ८३ व सर्व साधारण गट पुरुष - २५५, स्त्री - १५८  असे एकूण  पुरुष - ३७० व स्त्री- ३४६ चा समावेश आहे. 

      राजकीयदृष्ट्या  संवेदनशील असणाऱ्या  नागरी, माढेळी, वनली, चिकणी, टेंभुर्डा,  खांबाडा, बोर्डा, उखर्डा, खेमजई,   धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असणारे वडगाव व जातीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या  साखराराजा, कोसरसार, चार गाव (बु ), शेगाव( बु.)  या मतदान केंद्रांवर  चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.  

     नामनिर्देशन पत्र  मागविणे, छाननी, चिन्ह वाटप, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्धि  इ. तहसील कार्यालय वरोरा येथे तर मतदान साहित्य वाटप व स्वीकारणे, मतमोजणी मोहबाळा मार्गावरील कृषी  उत्पन्न बाजार समिती येथे होणार असून या सर्व प्रक्रिया  यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती निवडणूक अधिकारी श्री रमेश कोळपे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies