उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी आमदार संपतराव जेधे यांना श्रध्दांजली
आध्यात्मिक क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तीमत्व हरपले
मिलिंद लोहार -पुणे
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, माजी आमदार संपतराव जेधे अण्णांनी आंबवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर भोर पंचायत समितीचे सभापती ते आमदारकीपर्यंत त्यांनी राजकीय क्षेत्रात भरारी मारली. सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या जेधे अण्णांचा धार्मिक-अध्यात्मिक क्षेत्राकडे विशेष ओढा होता. यातूनच जेधे अण्णांनी चाळीस वर्षापूर्वी रायरेश्वर दिंडीची स्थापना केली. या दिंडीच्या माध्यमातून ते दरवर्षी पंढरपूरची वारी करत. पंढरपूर देवस्थान समितीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी दहा वर्षे काम केले. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तसेच कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात त्यांची निश्चितच उणीव भासेल असे उपमुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.