सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर
जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव, भारताला पहिल्यादाचं मिळाला सन्मान
महाराष्ट्र मिरर टीम
ज्यांच्या हातात उद्याची पिढी घडवण्याचे काम आहे तो म्हणजे शिक्षक, शिक्षकांच्या डोक्यात कल्पकता असेल तर शिक्षकाच्या हाताखालची पिढी तेवढीच कल्पक आणि संस्कारक्षम होते आणि त्याच्या ज्ञानाचा जगभर डंका होतो,असाच जगभर डंका केलाय,सोलापुर जिल्हा परिषदेत शिक्षक असलेल्या रणजितसिंह डिसले या शिक्षकाने त्यांच्या कर्तृत्वाने सोलापूरचच काय पूर्ण देशाचे नाव साऱ्या दुनियेत गाजतय.त्यांच्या रूपाने भारताला प्रथमच हा पुरस्कार मिळाला आहे.
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ आज जाहीर झाला असून सोलापूर च्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला। लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली। असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत। जगभरातील 140 देशांतील 12 हजार हुन शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे। QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल। डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंड करीता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळेल.
ग्लोबल टीचर पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई,
सोलापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनच्या वार्की फाउंडेशनतर्फे संयुक्तपणे दिला जाणारा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. रणजितसिंह डिसले यांना जाहीर झालेला पुरस्कार ग्रामीण भागातील शिक्षकांचा गौरव वाढवणारा तसेच ग्रामीण भागातील शिक्षण चळवळीला बळ देणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
रणजितसिंह डिसले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी केलेले कार्य देशातीलच नव्हे तर, जगभरातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. 'क्युआर कोड'च्या माध्यमातून त्यांनी घडवून आणलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन १४० देशांतील १२ हजार शिक्षकांतून त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी झालेली निवड राज्याचा व देशाचा गौरव आहे. पुरस्कार स्वरूपात मिळणारी ७ कोटी रुपयांची रक्कम इतर देशातील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तसेच 'टीचर इनोव्हेशन फंड'साठी वापरण्याचा त्यांचा निर्धार त्यांचे जगावेगळेपण सिद्ध करणारा आहे. भारताला गुरुशिष्यपरंपरेचा गौरवशाली इतिहास आहे. रणजितसिंह डिसले यांनी ही परंपरा केवळ पुढे नेली नाही तर, या परंपरेचा गौरव वाढवण्याचं काम केलं आहे. त्यांना जाहीर झालेला 'ग्लोबल टीचर पुरस्कार' राज्यातील आणि देशातील शैक्षणिक चळवळीला नवीन दिशा व गती देईल, असा मला विश्वास वाटतो. रणजितसिंह डिसले यांचे मनापासून अभिनंदन, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला आहे.