Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आनंदवनातील डॉ शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूचे रहस्य अजूनही कायम

 आनंदवनातील डॉ शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूचे रहस्य अजूनही कायम


             राजेंद्र मर्दाने (वरोरा)चंद्रपूरमहारोगी सेवा समिती, आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्या डॉ शीतल आमटे- करजगी (वय ३९ वर्षे) यांनी सोमवारी विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन स्वहत्या केल्याचे बोलले जात असताना शव विच्छेदन अहवाल मिळाला असला तरी फॉरेंन्सिक टेस्ट अहवाल न आल्याने पोलीस विभागातर्फे गुप्तता बाळगली जात आहे. ४ दिवसांनंतरही आकस्मिक मृत्यू , आत्महत्या वा अन्य कारण यावर पोलीस विभाग ठाम मत व्यक्त करू शकला नसल्याने याकडे नागरिकांचे लक्ष केंद्रीत झाले आहे तर दुसरीकडे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केल्या जात आहे. डॉ. शीतल यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडल्यास या प्रकरणामुळे निर्माण झालेला धूराळा खाली बसेल.

       सोमवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १२.३० वाजताच्या दरम्यान आनंदवनातील त्यांच्या राहत्या घरी सदर घटना घडली होती. तदनंतर ते शव उत्तरीय तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठविण्यात आले होते. तत्पूर्वी दुपारच्या सुमारास चंद्रपूर व नागपूरच्या फॉरेन्सिंक  तपासणी टीम ने खोलीतून औषधांचा साठा, लॅपटॉप, टॅब, मोबाईल फोन सह कपडे व अन्य साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता पर्यंत जवळपास ११ बयान नोंदविण्यात आले असून अजूनही पोलिसांकडून काही महत्त्वाच्या व्यक्तिंचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. या घटनेबाबत पोलिसांकडून स्पष्ट मत व्यक्त करण्यात आलेले नाही. शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्याचे कळते परंतु फॉरेन्सिंक अहवाल अप्राप्त असल्याने ते निष्कर्षापर्यंत अद्याप पोहचलेले नाही. जबाबामधून काही दिवसांपूर्वीच औषधांसाठी आर्डर संबंधित मुंबई विभागातील डीलरला देण्यात आली होती, त्या मालाची डिलिव्हरी मृत्यूच्या दोन दिवसाआधी आल्याचे कळते.  इंजेक्शन लावण्यासाठी सिरीन अन्य व्यक्तिच्या हस्ते मागविण्यात आली  होती, असेही कळते. ढोबळ मानाने सदर घटनेबद्दल आकस्मिक मृत्यू, आत्महत्या वा अन्य कारण अशा विविध संभावना पोलिसांकडून व्यक्त केल्या जात आहे. लॅपटॉप, मोबाईल व टॅब लॉक आहे.  नागपुरातील तज्ज्ञाला समस्यांचे निराकरण न जमल्याने मुंबई येथील तज्ज्ञाची मदत घेण्यात येणार असल्याचे कळते. तो पर्यंत मृत्यूचे कारण करणे घाईचे होईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. डॉ.शीतल आमटे-करजगी हिने आत्महत्या केल्याच्या बातम्या  विविध वर्तमानपत्रात ठळकपणे प्रसिद्ध झाल्या असून अनेक वाहिन्यांनी त्याचे प्रसारणही केले आहे. परंतु डॉ. शीतल यांच्या मृत्यूमागे काहीतरी निश्चितपणे दडलेले आहे, असा निष्कर्ष सहज लक्षात येण्यासारख्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक पत्रकारांचे फोन स्वीकारण्यास टाळाटाळ करीत आहे. पत्रकारांनी व्हाट्सएपवर संदेश पाठवूनही त्याची दखल घेण्यास कमालीची दिरंगाई पोलीस विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून होत आहे. पोलीसांवर राजकीय दबाव असल्याशिवाय असे घडू शकत नाही, असे बिनधास्तपणे चौका-चौकात चर्चा सुरू आहे. डॉ. शीतल यांच्या मृत्यूकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करण्याची गरज जनता व्यक्त करीत आहे. नेमक्या कोणत्या कारणांमुळे हा प्रकार घडला हे शोधून काढणे पोलिसांसमोर आव्हान तर आहेच शिवाय त्यांच्या  विश्वासार्हतेचाही  गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरीत डॉ. शीतल यांच्या मृत्यूचे रहस्य उलघडण्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies