सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा
जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा
प्रतिक मिसाळ-सातारा
सातारा : कोरोना संसर्गाचे सावट असतानाही दरवर्षी प्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष , तुता - यांचा रोमांच उभा करणाऱ्या आवाजात जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला . आज सकाळी जिल्हाधिकारी शेखर सिंह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा , पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचार पुजा बांधण्यात आली . व्यवस्थापक ओंमकार देशपांडे यांनी पौरोहित्य केले . त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते आई भवानीची मनोभावे आरती करण्यात आली . भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी प्रांताधिकारी संगिता चौगुले , महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील आदी उपस्थित होते . त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची मिरवणूक सुरु झाली जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली . पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले . यावेळी ' क्षत्रिय कुलावतंस , राजाधिराज ..... या ललकारीने शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते शिवपुतळयावरील ध्वजस्तंभावर मान्यवरांच्या हस्ते ध्वजांचे पुजन करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते भगव्याचे ध्वजारोहण केले . यानंतर सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली . कोरोना संसर्गाच्याय पार्श्वभूमीवर या वर्षी शिवप्रताप दिन साध्या पद्धतीने व कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शिवप्रताप दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या . या सोहळ्यास विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.