Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

............... तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत -- बी. जी. कोळसे पाटील

 ............... तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत -- बी. जी. कोळसे पाटील

राजेश भिसे - नागोठणेमृताच्या कुटुंबियांची परवानगी घेऊनच पोलिसांच्या सल्ल्यानुसार मृतदेह शवागृहात ठेवण्यासाठी पनवेलला स्वतः घेऊन जात आहे. आमच्या लेखी मागण्या रास्त असून रिलायन्स कंपनी जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही असे लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. जी. कोळसे पाटील यांनी स्पष्ट केले. 

         येथील रिलायन्स कंपनीच्या विरोधात २७ नोव्हेंबरपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर लोकशासनच्या वतीने प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी जगदीश वारगुडे या आंदोलनकर्त्या तरुणाचे निधन झाले होते. मृतदेह रात्री उशिरा आंदोलनस्थळी आणण्यात येऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना कोळसे पाटील बोलत होते. अंबानी अजून किती जणांचा बळी घेणार आहेत असा सवाल व्यक्त करताना राज्यकर्त्यांना मी दररोज इमेल करीत आहे. सरकारला जर काही शरम वाटत असेल तर त्यांनी राजधर्म निभावतानाच २५ दिवस चालू असलेल्या नागोठण्यातील आंदोलनाकडे सुद्धा लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. येथे तीन तीन हजार महिला आंदोलनात सहभागी झाल्या असल्या तरी, रायगडच्या जिल्हाधिकारी बाईंनी येथे येण्याचे अद्यापी सौजन्य दाखवले नसल्याची खंत कोळसे पाटील यांनी व्यक्त केली. माझे स्वतःचे प्रेत येथून निघाले तरी चालेल ! मात्र, मागण्या झाल्याशिवाय येथून कोणी उठणारच नसल्याची भीष्मप्रतिज्ञा त्यांनी यावेळी केली व सोमवारी रात्री रुग्णवाहिकेबरोबर ते पनवेलकडे रवाना झाले. 

 आज मंगळवारी सकाळी आंदोलनस्थळी भेट दिली असता, शेकडो आंदोलनकर्ते, वारगुडे यांच्या अकाली मृत्यूमुळे गंभीर परंतु यश मिळविणारच या इर्षेने २६ व्या दिवशी सुद्धा त्याठिकाणी उपस्थित होते. संघटनेचे राष्ट्रीय संघटक राजेंद्र गायकवाड यांची भेट घेतली असता, ही आरपारची लढाई असून निर्णय झाल्याशिवाय वारगुडे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वारगुडे यांचा लहान भाऊ सध्या आसाम येथे भारतीय सैन्यात कार्यरत आहे. त्यांची तसेच आईवडील आणि बहिणीची परवानगी घेऊनच मृतदेह पनवेल येथे शवगृहात ठेवण्यात आला आहे. रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने काल सोमवारी सायंकाळी याठिकाणी भेट देऊन गेले आहेत. आंदोलनाची पुढील दिशा आमचे मुख्य नेते बी.जी. कोळसे पाटील यांचेकडून लवकरच जाहीर केले जाईल असे गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले. 

          संघटनेचे स्थानिक सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांच्या म्हणण्यानुसार वामन पाटील आणि उमाजी घासे हे दोन वृद्ध पहिल्या दिवसांपासून येथे उपस्थित होते. मात्र, त्यांना अर्धांगवायू चा झटका आल्याने कालपासून तसेच ताई घासे ही वृध्द आंदोलनकर्ती, हे सर्व विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. मयत जगदीश वारगुडे हा पहिल्या दिवसांपासून सोमवारच्या पहाटे सहापर्यंत येथेच राहात होता. येथील कडाक्याच्या थंडीने त्याला त्रास झाल्याने सहा वाजता तो येथून त्याच्या वेलशेत येथील घरी गेला होता. मात्र, त्याला सकाळी अकरानंतर जास्त त्रास होऊ लागल्याने त्याला नागोठण्यातील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याला मृत्यूने गाठले होते. त्याचा अकाली मृत्यूमुळे आंदोलनाचे ठिकाणी आंदोलनकर्त्यांमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले व सोमवारी सकाळी व रात्री येथे कोणीही भोजन केले नसल्याचे त्यांनी सांगितले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नागोठणेतील कामत गोविंदा हॉटेलच्या परिसरात का नेला होता याबाबत मिणमिणे यांना विचारले असता, मयताचे गाव पश्चिम दिशेला असतानाही रुग्णवाहिका दक्षिणेकडे महामार्गावर असणाऱ्या हॉटेलमध्ये का नेली याचा आम्हा सर्वानाच त्याचा उलगडा झाला नव्हता, परंतु त्यानंतर संघटनेचे पदाधिकारी तसेच आंदोलनकर्ते तेथे उपस्थित झाल्यानंतर सर्वांच्या दबावानंतर रात्री सव्वा नऊच्या दरम्यान मृतदेह तेथून हलवून आंदोलनस्थळी नेण्यात आला असे त्यांनी सांगितले. या अकाली मृत्यूबाबत रिलायन्सचे व्यवस्थापनच जबाबदार असून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी संघटनेमार्फत लवकरच मागणी करणार असल्याचे मिणमिणे यांनी यावेळी स्पष्ट केले. जगदीश वारगुडे याचे आईवडील तसेच बहिण सोमवारपासून याठिकाणीच उपस्थित असून त्याच्या आईची तब्येत बिघडल्याने आंदोलनातील काही महिला कार्यकर्त्या त्यांना सकाळी साडेअकरा वाजता उपचारासाठी नागोठणेतील रुग्णालयात घेऊन गेल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies