कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात गर्दी टाळा
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन
मिलिंद लोहार -पुणे
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोरेगाव भिमा (पेरणे फाटा) येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात नागरिकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
कोरेगाव भिमा (पेरणे फाटा) येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील उपस्थित होते.
राज्यमंत्री देसाई म्हणाले, मार्च 2020 पासून आपण सर्वजण कोरोनाचा सामना करत आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी, कार्तिकी वारी, चैत्री यात्रा, दसरा, दिवाळी यासारखे सर्व सण-समारंभ आपण गर्दी न करता साधेपणाने साजरे केले आहेत. जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम देखील प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन साजरा करायला हवा. नागरिकांच्या सोयीसाठी अभिवादन कार्यक्रमाचे दूरदर्शन वरुन थेट प्रसारण करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अभिवादन कार्यक्रमासाठी गर्दी करु नये, असे आवाहन राज्यमंत्री श्री. देसाई यांनी केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवा, अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती नागरिकांना देऊन त्यांच्याशी संवाद ठेवा, अशा सूचना राज्यमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला दिल्या.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखून जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.