हेलिपॅड उभारण्याकरिता कर्जत तालुक्यातील कडाव येथील जमीन हस्तांतरित करण्याचे आदेश पारित
महाराष्ट्र मिरर टीम-अलिबाग
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दि.25 जानेवारी, 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार, राज्याचे हेलिपॅड धोरण निश्चित करणेत आलेले असून त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी हेलिपॅड धोरणाप्रमाणे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात कायमस्वरुपी हेलिपॅड तयार करण्यासाठी नियोजन करुन जागा निश्चित करणेबाबत तसेच नैसर्गिक आपत्ती अगर आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड असणे आवश्यक असून, त्यानुषंगाने कार्यवाही करण्याबाबतही सूचित करण्यात आले होते.
त्यानुसार पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कर्जत तालुक्याकरिता मौजे कडाव येथील सर्व्हे नं. 132/1/अ क्षेत्र 10.45.00 हे. आर. पैकी 0.80.00 हे.आर. जमीन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड- अलिबाग यांना हेलिपॅड उभारण्याकरिता हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्णयामुळे जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड उभारल्यामुळे नैसर्गिक आपत्ती अगर आपत्कालीन परिस्थितीमध्ये गरजूंना तातडीची मदत मिळण्याच्या दृष्टीने तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींना घटनास्थळाच्या ठिकाणी तात्काळ पोहोचण्यासाठी , यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी उपयोग होणार आहे.