व्हिक्टोरीया क्रॉस विजेते शहीद वीर यशंवतराव घाडगे यांचे माणगांवात स्मारक उभारणार - नाम. आदिती तटकरे
रविंद्र कुवेसकर-उतेखोल/माणगांव
शहीद वीर यशंवतराव घाडगे व्हिक्टोरीया क्रॉस मानचिन्हधारक (मरणोत्तर) यांचा जयंती उत्सव आज शनिवार दि. ९ जानेवारी रोजी प्रांत कार्यालय माणगांव वीर यशवंत घाडगे पुतळा परिसरात पार पडला. यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री व राज्यमंत्री आदिती तटकरे व रत्नागिरी रायगड लाेकसभेचे खासदार सुनिल तटकरे यांनी देखील व्हिक्टोरिया क्रॉस विजेते शहीद वीर यशवंतराव घाडगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पूण मानवंदना दिली.
नाम. आदिती तटकरे यांच्या कारकिर्दीतील सर्वात पहीला आमदार निधी सुमारे १५ लाख निधी हा वीर यशवंतराव घाडगे यांच्या स्मारकासाठी दिला. गतवर्षी मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर याच उत्सवासाठी माणगांव येथे पहिल्यांदा आल्याची आठवण सांगताना या परिसरात भावी पिढीकरीता प्रेरणादायी ठरेल असे भव्यदिव्य स्मारक लवकरच उभारणार व त्या कामाचे भुमीपुजन यावर्षी वीरपत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांच्या हस्ते हाेणार ! असे विश्वासात्मक वक्तव्य नाम. आदिती तटकरे यांनी याप्रसंगी आपल्या मनाेगतात ठामपणे व्यक्त केले आहे.
हा उत्सव सरकारी प्रशासन व माजी सैनिक संघटनेने आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी भूषविले असून शहीद वीर यशवंतराव घाडगे याच्या पत्नी लक्ष्मीबाई घाडगे व त्यांचे कुटुंब, माणगांव नगराध्यक्षा योगीता चव्हाण, पं. स. सभापती अल्का जाधव, प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तालुका रा. कॉ. अध्यक्ष सुभाष केकाणे, संगीता बक्कम, पं. स. सदस्य शैलेश भोनकर, माणगांव नगरपंचायत नगरसेवक, जिल्हा सैनिक आधिकारी शेख व शासकीय अधिकारी, माजी सैनिक व नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमानिमीत्त तालुक्यातील विविध शाळेत चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते व त्याचे बक्षीस वितरणही पालकमंत्री यांच्या हस्ते केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन काप मॅडम तर प्रास्ताविक प्रांत कार्यालयाचे कर्मचारी राकेश सावंत यांनी केले.
व्हिक्टोरीया क्रॉस विजेते शहीद वीर यशंवतराव घाडगे यांचा जन्म माणगांव तालुक्यातील पळसगांव (आंब्रे वाडी) येथे सन १९१९ मध्ये गरीब शेतकरी कुटूंबात झाला. वयाच्या ११ वर्षी पळसगांव येथील मराठी शाळेत त्यांनी ४ थी पर्यंतचे शिक्षण घेतले. वयाच्या १८ व्या वर्षी सन १९३७ साली विरपत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सन १९३८ साली मराठा लाईट इन्फ्रंन्ट्री मध्ये शिपाई म्हणून दाखल झाले. इटलीमध्ये ब्रिटीश सैन्याबरोबर पाचवी मराठा लाईट इन्फ्रंन्ट्री लढतीमधील फौजेत यशवंतराव घाडगे हे नाईक म्हणून काम पहात होते.
इटलीमधील युध्दात आपल्या हाताखालच्या सैनिकांसह जर्मन सैनिकांवर चाल करुन जात असताना, सर्व सैनिकांना वीर मरण आले. शेवटी यशवंतराव घाडगे हे एकटेच उरले. आपल्या प्राणाची पर्वा न बाळगता शत्रुवर गोळीबार चालू ठेवून सर्व जर्मन सैनिक त्यांनी कापून टाकले. दि. १० जुलै १९४४ रोजी लढता-लढता शत्रुची गोळी छातीत लागून त्यांच्या पवित्र प्राणांची ज्योत अनंतात विलीन झाली. यशंवतरावाच्या या कामगिरीचा गौरव करण्यासाठी त्यांच्या पश्चात, लश्करातील अत्युच्य अशा बहुमानाचे प्रतिक म्हणजे ”व्हिक्टोरीया क्रॉस” हिंदुस्तानाची राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यासमोर बाहेरील खुल्या मैदानात हिंदुस्तानचे व्हॉईसरॉय व गव्हर्नर जनरल फील्ड मार्शल लॉर्ड वेव्हेल यांचे हस्ते दि. ३ मार्च, १९४५ रोजी शूर वीर यशवतंराव घाडगे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यशवंतराव घाडगे यांना अर्पण करण्यात आला.
वीर यशवंतराव घाडगे यांची स्मृती कायम रहावी म्हणून रायगड जिल्हयातील माणगांव मामलेदार कचेरी जवळ त्यांचा कायमचा पुतळा उभारण्यात आला आहे. वीर यशवंराव घाडगे यांच्या शौर्यस्मृती चिरंतन रहावी म्हणून माणगांव तहसिल कार्यालयामार्फत दरवर्षी ९ जानेवारी रोजी त्यांचे कुटूंबिय, लोकप्रतिनीधी, प्रतिष्ठीत नागरीक व शाळा-कॉलेज मधील विद्यार्थी तसेच माणगांव, महाड, पोलादपूर, रोहा, म्हसळा, तळा या तालुक्यातील आजी माजी सैनिकांच्या उपस्थितीत मोठया प्रमाणात घाडगे उत्सव साजरा करण्यात येतो.
No comments:
Post a Comment