सर्वसामान्य माणूसाचा उत्कर्ष हाच डाॅ. पतंगराव कदम यांच्या राजकीय कार्याचा केंद्र -प्रा मधुकर पाटील
उमेश पाटील -सांगली
"समाजातील सर्वसाधारण सामान्य माणसाचा सर्वांगीण विकास साधणे, हेच आपल्या कार्याचे केंद्र राहिल याची काळजी घेत डॉ. पतंगराव कदमांनी आपले राजकारण केले आहे. व्यक्तिगत, पक्षीय हेवेदावे, मतभेद बाजूला सारून सर्वसमावेशक राजकारणाचा आदर्श वस्तुपाठ डॉ. पतंगराव कदम यांनी महाराष्ट्रातील राजकारणासमोर ठेवला आहे." असे मत प्रा मधुकर पाटील यांनी मांडले. ते रामानंदनगर येथील आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये स्वर्गीय डॉ पतंगरावजी कदम यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त बोलत होते.
ते पुढे म्हणाले, "पश्चिम महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांतीद्वारे सामाजिक स्थित्यंतर घडवून आणण्याचे कार्य डॉ. पतंगराव कदम यांनी केले आहे. पक्षाने सोपविलेली जबाबदारी असो किंवा सत्तेत असताना दिलेल्या खात्यात विलक्षण कायापालट करण्याचे धैर्य डॉ. पतंगरावांच्या भूमिकेत होते."
राज्यशास्त्र विभागाच्या वतीने स्वर्गीय डॉ पतंगरावजी कदम यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त प्रा मधुकर पाटील (सिनेट, सदस्य शिवाजी विद्यापीठ) यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.डी.कदम होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. पतंगराव कदमांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान विषद केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. पाटील आणि उपप्राचार्य डॉ. के. बी. भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन चव्हाण तर सूत्रसंचालन नम्रता चौगले हिने केले.