Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

"खेलो इंडिया" च्या माध्यमातून केंद्र शासनाने राज्य शासनाला भरीव निधी उपलब्ध करून द्यावा-पालकमंत्री आदिती तटकरे



"खेलो इंडिया" च्या माध्यमातून केंद्र शासनाने राज्य शासनाला भरीव निधी उपलब्ध करून द्यावा-पालकमंत्री आदिती तटकरे



अलिबाग,जि.रायगड


 मागील वर्षी "खेलो इंडिया" च्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने अव्वल स्थान पटकाविले असून केंद्र शासनाने या वर्षी महाराष्ट्र राज्यासाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी क्रीडा राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केली.

       खोपोली येथे कुस्ती महर्षी भाऊ कुंभार संकुलाचे उद्घाटन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.



       यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र शेठ थोरवे, खोपोली नगराध्यक्षा सुमन अाैसरमल, उपनगराध्यक्षा विनिता कांबळे उपस्थित हाेते.

      केंद्र शासनाने सन 2017/18 च्या प्रस्तावांनाच मान्यता देऊ, असे राज्य शासनाला कळविले आहे.राज्यात मागील काही वर्षांत चांगले खेळाडू निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. केंद्राकडून "खेलो इंडिया" अंतर्गत  महाराष्ट्र राज्याला चांगला निधी मिळावा, महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त प्रस्तावांना मंजुरी मिळावी, यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्र शासनाकडे भक्कम बाजू मांडून पाठपुरावा करावा, असे विनंतीवजा आवाहन कु.तटकरे यांनी यावेळी केले. 

        त्या पुढे म्हणाल्या की, राज्यात इतर महसुली विभागांचे क्रीडा संकुल निर्माण हाेत आहेत. मात्र कोकण विभागाचे क्रीडा संकुल नसल्याने याचा पाठपुरावा केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रायगडातील माणगाव येथे कोकण विभागीय क्रीडा संकुल उदयास येत असून तीस एकर जागा हस्तांतरितही करण्यात आली आहे. 

      तसेच तालुकास्तरीय क्रीडा संकुलासाठी या पूर्वीचे शासन एक कोटी रुपये देत होते, त्या निधीमध्ये भरीव तरतूद करीत या वर्षापासून पाच कोटी रुपयांचा निधी तालुका क्रीडा संकुलासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केली. 



       क्रीडा व युवक कल्याण विभाग स्वतंत्र करण्याच्या मागणीलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्याचे कु.आदिती तटकरे यांनी असे सांगून हे शासन ज्या पद्धतीने  निर्णय प्रक्रिया अवलंबित आहे, त्यानुसार राज्य प्रगतीपथावर निश्चित जाईल, असा विश्वास व्यक्त केला. खोपोली नगरपालिकेने विकासासाठी ठराव करून द्यावा,विकास कामांसाठी निधी कमी पडून देणार नाही, अशीही घोषणा पालकमंत्री कु.तटकरे यांनी यावेळी केली.

     मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी कुस्ती महर्षी खाशाबा जाधव व खोपोलीचे भाग्यविधाते भाऊ कुंभार यांच्या कार्याचा गौरव करीत भाऊ कुंभार यांच्याबरोबर माझे व्यक्तीगत मित्रत्वाचे संबंध होते आणि आमची अनेकदा भेटही झाली असल्याचे सांगितले. 

       स्थानिक आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी भाऊसाहेब कुंभार  यांनी आयुष्याचे योगदान रायगडातील कुस्तीसाठी दिले असे सांगत त्यांच्या कार्यातून आज महाराष्ट्र पातळीवर मोठमोठे कुस्तीपटू तयार झाल्याचे सांगितले.



      या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, गटनेते सुनील पाटील व नगरसेवक,पदाधिकारी, स्थानिक खेळाडू, शासकीय अधिकारी-कर्मचारीही  मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies