रिलायन्सचे विरोधातील आंदोलनाचा ३८ वा दिवस
कंपनीच्या प्रस्तावाची चाचपणी सुरू ; आंदोलन चालूच
राजेश भिसे-नागोठणे
येथील रिलायन्स कंपनीच्या प्रलंबित मागाण्यांसंदर्भात ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत रिलायन्स कंपनीकडून काही प्रस्ताव आंदोलनकर्त्यांकडे ठेवण्यात आले आहेत. मात्र, सर्व प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळालीच पाहिजे ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज रविवारच्या ३८ व्या दिवशी आंदोलन सुरूच राहिले आहे.
लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे अध्यक्ष, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघटनेचे राष्ट्रीय संघटक राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित मागाण्यांसंदर्भात २७ नोव्हेंबरपासून कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन छेडण्यात आले आहे. सुरुवातीला शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक खासदार सुनील तटकरे यांनी काही दिवसानंतर यात लक्ष घालून संघटनेचे प्रतिनिधी, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. दूसरी बैठक ३१ डिसेंबरला अलिबागमध्ये घेण्यात आली. यावेळी खा. तटकरे यांचेसह जिल्हाधिकारी निधी चौधरी, पो. अधीक्षक दुधे, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, डीवायएसपी किरणकुमार सुर्यवंशी, पो. नि. दादासाहेब घुटुकडे, लोकशासन आंदोलन समितीचे राजेंद्र गायकवाड, शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे यांचेसह पदाधिकारी, तर रिलायन्सचे वतीने चेतन वाळंज, विनय किर्लोस्कर, रमेश धनावडे आदी उपस्थित होते. पावणेसात तास चाललेल्या या बैठकीत ३५१ प्रमाणपत्र धारकांना ठेकेदारीत नोकरी देण्यात रिलायन्स तयार असल्याचे सांगितले गेले. मात्र, संघटनेला हा प्रस्ताव मान्य नसून ६४० प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी असे सांगण्यात आले अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांनी दिली.
३१ डिसेंबरच्या बैठकीनंतर शनिवारी सायंकाळी आंदोलनस्थळी प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, डीवायएसपी किरणकुमार सूर्यवंशी, पो. नि. दादासाहेब घुटुकडे, समितीचे पुणे येथील कायदेविषयक सल्लागार अॅड. संतोष म्हस्के, मुख्य संघटक राजेंद्र गायकवाड, शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे यांच्यात पुन्हा चर्चा झाली असून चर्चेचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र, आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठामच असल्याने ही चर्चा सुद्धा असफल झाली असल्याची कुजबुज होत आहे. या बैठकीनंतर अॅड. संतोष म्हस्के यांनी उपस्थित असलेल्या शेकडो आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अॅड. म्हस्के यांनी तुमच्या वज्रमुठीमुळे तुम्हाला आता दाद मिळायला सुरुवात झाली असल्याचे स्पष्ट केले. कोणावरही दोषारोप न करता आपसात चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा असा सल्ला दिला. अध्यक्ष कोळसे पाटील यांनी विश्वास ठेवून राजेंद्र गायकवाड, शशांक हिरे आणि गंगाराम मिणमिणे यांचेकडे येथील नेतृत्व दिले असून त्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी अॅड. म्हस्के यांनी उपस्थितांसमोर विविध प्रश्नांसंदर्भात कायदेविषयक माहितीचे विश्लेषण केले.