Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

खेर्डी ग्रा.पं.वर सुखाई परिवर्तन पॅनेलने विरोधकांचा उडवला धुव्वा एकहाती सत्ता मिळवून जयंद्रथ खताते,प्रशांत यादव यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आपले वर्चस्व

 खेर्डी ग्रा.पं.वर सुखाई परिवर्तन पॅनेलने विरोधकांचा उडवला धुव्वा एकहाती सत्ता मिळवून जयंद्रथ खताते,प्रशांत यादव यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आपले वर्चस्व

प्रशांत यादव ठरले खरे ‘किंगमेकर’

ओंकार रेळेकर-चिपळूण



संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या खेर्डी ग्रामपंचायतीवर सुखाई परिवर्तन पॅनलने ११ जागांवर विजय मिळवत एकतर्फी वर्चस्व  मिळवले आहे. तर सुखाई गाव विकास पॅनलला सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्याचबरोबर आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सावर्डे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १७ जागांवर विजय मिळवित विरोधकांना धोबीपछाड दिला आहे. तर उर्वरित ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे तर काही ग्रामपंचायतींवर काहींना पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले आहे.

चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. यामध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये  कौंढरताम्हणे, मुर्तवडे, वडेरु, पालवण, खोपड, फुरूस, दुगेर्वाडी, पिलवलीतर्फे वेळंब, तिवडी, खडपोली, कळवंडे, बोरगाव, पिंपळीबुद्रुक, कोकरे, वीर, ग्रांग्रई, दहिवली खुर्द, ढोक्रवली, तळवडे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

उर्वरित ग्रामपंचायत निवडणुकांकरिता ३२० जागांसाठी मतदान झाले तत्पूर्वी २२ ग्रामपंचायतींमध्ये ३४५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. चिपळुणातील ६१ ग्रामपंचायतींसाठी ७१ टक्के  मतदान झाल्याचे समोर आले. या ग्रामपंचायतींसाठी सोमवारी येथील गुरुदक्षिणा सभागृहात सकाळी १० वाजता कात्रोळी ग्रामपंचायतीपासून मतमोजणीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची १० व्या फेरीला मतमोजणीला सुरुवात झाली. यावी सुखाई परिवर्तन पॅनल व सुखाई गाव विकास पॅनलचे समर्थक कार्यकर्ते दोन्ही बाजूला जमले होते. मतमोजणी दरम्यान सुखाई परिवर्तन पॅनलने ११ जागांवर एकतर्फी वर्चस्व मिळविल्याचे स्पष्ट झाले. तर सुखाई गाव विकास पॅनलला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. खेर्डी ग्रामपंचायतीसाठी मतदान झाल्यानंतर दोन गटात अटीतटीची लढत होईल, अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व सुखाई पॅनल प्रमुख जयंद्रथ खताते, चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शशिकांत कासार, माजी जि. प. सदस्य विजय देसाई, कमलाकर शेंबेकर, माजी सभापती स्नेहा मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखालील सुखाई परिवर्तन पॅनलने गाव विकास पॅनलला धोबीपछाड देत ११ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित खेर्डी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळविली आहे. यामध्ये सुखाई परिवर्तन पॅनलचे  सचिन मोहिते (७३१), अपर्णा दाते (७९१), सुप्रिया उतेकर (८१८), अभिजित खताते (९५१), विनोद भुरण (९३९), वृंदा दाते (८३४), सुगंधा माळी (४०१), अश्विनी पंडित (४५५), विजय शिर्के (९३९), वैशाली मोरे (८९६), प्रकाश पाथरूड (९५८) इतकी मते मिळवून विजयी झाले आहेत.  तर सुखाई परिवर्तन पॅनलचे राकेश दाभोळकर, रियाज खेरटकर, प्रणाली दाभोळकर, राजेश सुतार, ओवी शेट्ट्ये, रशिदा चौगुले असे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. वार्ड क्रमांक सहामध्ये रशिदा चौगुले व अमिना बेबल यांच्यात अटीतटीची लढत झाली. स्व. कमाल बेबल यांची मुलगी अमिना हिला केवळ २० मतांनी पराभव स्वीकारावा लागला. याठिकाणी १७ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारले असल्याचे समोर आले आहे. खेर्डीमध्ये १८७ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय स्विकारला असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांच्यापासून फारकत घेतलेले नितीन ठसाळे यांनी आपली भावजय माधवी ठसाळे यांना प्रभाग दोनमधून उभे केले होते. मात्र, याठिकाणीदेखील ठसाळे यांना यश मिळाले नाही. मात्र, दशरथ दाभोळकर यांनी आपल्या पँनलचे प्रणाली दाभोळकर हिला निवडून आणण्यात यश मिळवले.

खेर्डी पाठोपाठ सावर्डे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, तेथे देखील बिनविरोधचा प्रयत्न अयशस्वी ठरला. दरम्यान, आ. शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर उर्वरित ९ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये सोमवारी झालेल्या मतमोजणी दरम्यान आ. निकम यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने ९ जागांवर विजय मिळवित विरोधकांना धोबीपछाड दिला आहे.  एकंदरीत सावर्डे ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवण्यात यश मिळवल्या आहे.   

शहरानजीकच्या कळंबस्ते येथे माजी सभापती शौकत मुकादम यांच्या नेतृत्वाखालील श्री देवी काळेश्वरी गाव पॅनलने ९ पैकी ७ जागांवर विजय मिळवित निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. मतमोजणीदरम्यान प्रणिता शिगवण व अन्विता जाधव यांना समसमान १७२ मते मिळाल्याने टॉस करण्यात आला. यामध्ये अन्विता जाधव यांच्या बाजूने कौल गेला. माजी सभापती शौकत मुकादम यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने ७ निवडणुकांमध्ये यश मिळवत मतदारांची मने जिंकली आहेत. तब्बल पंधरा वर्षे एकहाती शिवसेनेची सत्ता असणाऱ्या कोंडफणसवणे ग्रामपंचायतीवर प्रवीण कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने झेंडा फडकावत शिवसेनेच्या चंद्रकांत सुवार याना जोरदार हादरा दिला आहे. कोंडफणसवणे ग्रामपंचायतीमध्ये तब्बल पंधरा वर्षे शिवसेनेची सत्ता होती. या ठिकाणी शिवसेनेचे चंद्रकांत सुवार हे याचे नेतृत्व करीत आहेत. मात्र, यावेळी या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीचे तरुण कार्यकर्ते प्रवीण कदम यांनी राष्ट्रवादीचे पॅनल उभे केले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी पॅनलमध्ये थेट लढत झाली. प्रचारही टोकाचा करण्यात आला होता. मात्र, या ठिकाणी प्रचारात राष्ट्रवादीची आघाडी दिसत होती. मात्र, दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे बलाढ्य नेते चंद्रकांत सुवार, जिल्हा परिषद  सदस्या सौ. सुवार, मधु इंदुलकर हे राजकारणात कसलेले नेते असल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळताना मोठे परिश्रम घ्यावे लागणार होते. आणि एवढे घेऊनही यश मिळण्याची खात्री नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रवीण कदम यांनी नियोजनबद्ध प्रचार आणि गावाच्या विकासाच्या योजना या माध्यमातून ७ पैकी ५ जागांवर विजय मिळवला तर विरोधकांना दोन जगावर समाधान मानावे लागले. पंधरा वर्षाची शिवसेनेची सत्ता उलटवल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला तर गावात फटाके वाजवून विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या निवडणुकीत अत्यंत महत्वाची भुमिका पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांनी बजावली होती. त्यांचे मार्गदर्शन राष्ट्रवादीला विजयापर्यंत घेऊन आले असून यावेळी अप्पा इंदुलकर, शिरीष इंदुलकर आदींचेही सहकार्य मिळाल्याचे प्रवीण कदम यांनी सांगितले. 

तुरंबव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आ. भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव व जि. प. सदस्य बाळकृष्ण जाधव  पॅनलच्या माध्यमातून काका-पुतणे आमने सामने आले होते. काका-पुतण्या यांच्यात कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, विक्रांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनलने ५ जागांवर विजय मिळवत काकांना शह दिला असल्याचे समोर आले आहे.

अलोरे, पेढांबे, कोळकेवाडी येथेदेखील निवडणुका प्रतिष्ठेच्या मानल्या गेल्या. यामध्ये अलोरे येथे जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने पेढांबे येथे तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने तर कोळकेवाडी येथे गेली काही वर्षे एकहाती सत्ता मिळवणारे माजी पंचायत समिती सदस्य रमेश राणे यांच्या वर्चस्वाला धक्का मिळाला आहे. याठिकाणी विरोधकांनी ५ जागांवर विजय मिळवण्यात यश मिळवले आहे. येगाव येथे माजी सभापती संतोष चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने यश संपादन केले आहे. मिरजोळी येथे कमलाकर आंबरे, खालीद दलवाई यांची एकहाती सत्ता असलेल्या वर्चस्वाला कासम दलवाई यांच्या नेतृत्वाखालील गाव विकास पॅनेलने धक्का दिला असून निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. रामपूर ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदाकरता रिंगणात उतरलेले माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांना पराभवाचा धक्का बसला आहे. चिवेली ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के यांनी विजय मिळण्याबरोबरच त्यांच्यासोबत असलेल्या अन्य उमेदवारांनीदेखील विजय संपादन केल्याने चिवेली ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. चिंचघरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश डॉ. राकेश चाळके आपल्या पॅनल समवेत रिंगणात उतरले होते. या ठिकाणीदेखील राष्ट्रवादीच्या या युवा कार्यकत्यार्ने विजय मिळवलाच, शिवाय  ९ पैकी ८ जागा निवडून येऊन पॅनल विजयी झाले आहे. मुंढे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी जिल्हाध्यक्ष मयुर खेतले यांनी विजय मिळविला आहे. एकंदरीत राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत आपला करिश्मा दाखवला आहे. कुंभार्ली येथे महाकाली  विकास गाव पॅनलने ९ पैकी ५ जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. तर सेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी उभ्या केलेल्या पॅनलला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. नायशी ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच किशोर कदम यांना पराभवाचा धक्का बसलाच, शिवाय सत्तादेखील गमवावी लागली आहे. याठिकाणी संदीप घाग यांच्यासह सहकाऱ्यानी नायशी ग्रा.पं.वर सत्ता मिळवली आहे. एकंदरीत चिपळूण तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का तर काही ठिकाणी सत्तांतर झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. आहे तर काही ठिकाणी गाव विकास पॅनलने यश संपादन करून मतदारांची मने जिंकली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सुर्यवंशी, नायब तहसीलदार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाने ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. तर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ व अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यानी चोख बंदोबस्त ठेवला होता.

*चौकट*

खेर्डी ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी नळपाणी योजनेच्या मुद्यावरून जयंद्रथ खताते एकाकी पडले असल्याचे चित्र भासवले गेले होते. अबू ठसाळे व दशरथ दाभोळकर यांनी श्री. खताते यांची साथ सोडून अनिल दाभोळकर गटाशी जुळवून घेतले होते. निवडणुकीदरम्यान जयंद्रथ खताते यांनी चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह भाजप युवा कार्यकर्ते विनोद भुरण आदींशी जुळवून घेऊन सुखाई परिवर्तन पॅनलची मोट अधिकच घट्ट केली. याचबरोबर सेनेचा बहुतांशी एक गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने-जाणते व भाजप कार्यकर्ते अशी सर्वांची यशस्वी मोट बांधून विरोधकांसमोर तगडे आव्हान उभे केले होते. या विजयात सर्वांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळे सुखाई परिवर्तन पॅनलला एकहाती सत्ता मिळविण्यात यश आले असल्याची खेर्डीत जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत प्रशांत यादव ‘किंगमेकर’ ठरले असल्याचेदेखील बोलले जात आहे. सुखाई परिवर्तन पॅनलप्रमुख जयंद्रथ खताते यांनी विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सुखाई देवीने आशीर्वाद दिला असून खेर्डीवासियांना विश्वासात घेऊन गावाचा विकास साधला जाईल सांगितले.

*चौकट*

*सुखाई परिवर्तन पॅनलचा विजय खेर्डीच्या जनतेला अर्पण- प्रशांत यादव* 

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुखाई परिवर्तन पॅनेलने अकरा जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. हा विजय खेर्डीतील जनतेला समर्पित करत आहोत, अशी भावना परिवर्तन पॅनलमधील प्रमुख नेते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी व्यक्त केली आहे. पॅनलमधील सर्व प्रमुख, कार्यकर्ते, उमेदवार यांच्या मेहनतीचा हा विजय आहे. खेर्डीतील जनतेने ज्या विश्वासाने आम्हाला सत्ता दिली आहे, तो विश्वास सार्थ ठरवू. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान आम्ही जी आश्वासने दिली होती, ती सर्व पूर्ण करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल, असेही प्रशांत यादव यांनी निकालानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies